झरे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
झरे ता.आटपाडी येथील महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय झरे. ता. आटपाडी व आर.आर पाटील महाविद्यालय सावळज यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. वैभव कारंडे हे उपस्थित होते. कारंडे बोलताना म्हणाले की, माणसाला जशी अन्नाची भूक लागते तशी वाचनाची भूक लागली पाहिजे. मी विद्यालयीन शिक्षण घेत असताना ग्रंथालयातील पाच-पाच वर्तमानपत्र वाचत होतो. त्याने जागतिक घडामोडींविषयी मनामध्ये कुतूहल निर्माण होते व त्यातून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासास मदत होते. आपल्या जीवनात आपण कोणत्या क्षेत्राकडे जातो. यापेक्षा आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे.
याचा विचार करावा. अभ्यास करत असताना आपण किती तास अभ्यास केला हे महत्त्वाचे नसून तो कशा पद्धतीने केला हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात “शासकीय क्षेत्रात नोकरीच्या संधी” या विषयावर बोलताना वैभव कारंडे म्हणाले की, सध्या साध्या साध्या येणाऱ्या संधी आपण घेणे गरजेचे आहे. त्या संधीच मोठ्या यशाला गवसणी घालण्यात शिडी सारख्या सहाय्यभूत ठरत असतात. आपण कागदपत्रांच्या बाबतीत अतिशय जागरूक असणे आवश्यक आहे. कधी कधी त्यामुळेही आपली पात्रता असून अपयशाला सामोरे जावे लागते. एकादी गोष्ट करण्याआधी तिची माहिती घ्या मग ती गोष्ट जोमाने करा. शासकीय नोकऱ्यांमध्ये कुठे कुठे संधी मिळू शकते. त्याची पात्रता काय? त्यासाठी शिक्षण काय?
त्यासाठी अभ्यासक्रम काय? ह्या सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी या सत्रामध्ये केला. आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर.एच.पाटील म्हणाले की, जीवनात स्मार्ट वर्कला अतिशय महत्त्व आहे. एखादं काम करत असताना त्या त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करून ते काम केल्यास यश हमखास मिळेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.आर.व्ही. काळेल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.एन.डी. पाटील यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.एस.डी.मुलाणी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून झरे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री.अंकुश पाटील उपस्थित होते. प्रा.एम.एस. शिंगाडे, प्रा.व्ही.ए.खिलारी, प्रा.डी. एस.देवकुळे, प्रा.सौ.माया माने, प्रा. एस.के.वाघमोडे, प्रा.आर.एच.चौगुले, प्रा.एम.डी खांडेकर, श्री.जे.जे.फकीर, श्री.एम.पी नरळे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.