लक्झरीचे चाक डोक्यावरून गेल्याने महाडिकवाडीतील युवकाचा मृत्यू
आटपाडी प्रतिनिधी
दिघंची शेजारील महाडीकवाडी येथील सत्यवान मधुकर महाडीक व पृथ्वीराज सत्यवान महाडीक (वय १८) हे बापलेक म्हसवड येथील एका दुकानातून पाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती पिठाची गिरणी मोटारसायकलींवर घेऊन म्हसवडवरुन महाडीकवाडी येथे आपल्या घरी निघाले असताना म्हसवडनजीक विरकरवाडी रोडवर जामदार वाडा परिसरातील महादेव मंदिरासमोर मोटारसायकल व लक्झरी यांची धडक बसल्याने मोटारसायकलींच्या मागे गिरणी घेऊन बसलेल्या पृथ्वीराज याच्या डोक्यावरून चाक गेल्याने पृथ्वीराज यांच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान घडली.
अपघातात जखमी झालेल्या रुपेश रघुनाथ लुबाळ वय 34 वर्ष धंदा शेती रा. शिरताव ता. माण जि. सातारा यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात सत्यवान मधुकर महाडिक रा. महाडिकवाडी लिंगीवरे ता. आटपाडी जिल्हा सांगली यांचेविरुद्ध तक्रार दिली आहे.
या तक्रारीत लुबाळ यांनी म्हटले आहे की,21/03/2023 रोजी सायं.7.00 वाचे सुमारास मौजे विरकरवाडी ता.माण गावच्या हद्दीत अस्मितानगर येथे मी साईटला गाडी लावून फोनवर बोलत असताना सत्यवान मधुकर महाडिक रा. महाडिकवाडी लिंगीवरे ता.आटपाडी जि. सांगली यांने अंमली पदार्थाचे सेवन करून त्याचे ताब्यातील एचएफ डीलक्स मोटरसायकल नंबर MH 10 DX 2475 ही हायगयीने, निष्काळजीपणाने चालवून माझे गाडीला ठोकर देवून माझे व त्याचे गाडीचे नुकसान करून खाली पडून समोरून येणाऱ्या माणदेश ट्रॅव्हल्सला धडकून स्वतः गंभीर जखमी होऊन त्याचा मुलगा पृथ्वीराज सत्यवान महाडिक यांचे मृत्यूस कारणीभूत झाला आहे.
म्हसवड ता. माण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सपोनि राजकुमार भूजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पो हवलदार जाधव अधिक तपास करत आहेत.