जरी – मरीचं चांगभलंच्या घोषात पानवण यात्रा संपन्न
दहीवडी प्रतिनिधी :
भंडाऱ्याची उधळण, हलगीचा ठेका, पोतराज नृत्य आणि जरी – मरीचं चांगभलंच्या घोषात पानवणची ग्रामदेवता मरीआई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात मोठ्या झाली.
पानवण ता. माण येथील मरीआई देवीची यात्रा सांस्कृतिक कार्यक्रम, छबीना, कुस्त्या, बैलगाडी अशा भरगच्च कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या शुक्रवारी ही यात्रा भरते. सर्व शाळकरी मुलांना या काळात उन्हाळी सुट्ट्या असल्याने, सर्व परीक्षा संपल्याने पानवण आणि पंचक्रोशीतील भाविक या यात्रेला उपस्थिती लावत असतात.
गुरुवारी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संस्कृतिक कार्यक्रमाने यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी देवीला भक्तांनी दंडस्थान घातले. दिवसभर पंचक्रोशीतील गजी मंडळांनी गजीनृत्य सादर केले. सायंकाळी म्यूजिकल ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भंडाऱ्याची उधळण, हलगीचा ठेका, पोतराज नृत्य आणि जरी – मरीचं चांगभलंच्या घोषात छबीना यात्रा काढण्यात आली.