रक्षाबंधनाचे महत्व :-
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणुन प्रार्थना करते. तर भाऊ सूध्दा आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत परंतू त्या माहित करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणाच्या उद्देशालाच महत्व देणार आहोत.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री, भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष, राग इत्यादींकडे भावाने आपल्या या तिसऱ्या डोळ्याने पहावे या हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळ्याचा खोल अर्थ आहे.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात अथवा संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.
हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.
एका गरीब बहिणीने आपल्या भावाच्या हातात बांधलेला साधा दोरा काय आणि श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम. असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात.
स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. तूच आमचा त्राता, रक्षणकर्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते.
रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग …. रक्षाबंधन
घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या भावाची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी कुणी जात असेल तर ती असते बहीण ! शाळेतून आपल्या ताईला आणण्यासाठी जाणार्या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनातील रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई आई-वडीलांकडून मिळणारा मार वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो.
शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा ‘बॉडीगार्ड’च बनून जातो. तिच्या आवडी-निवडींची काळजी घेतो तर तिला संकटामध्ये आधार देतो.
ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर असल्याची ग्वाही सुध्दा देतो.
खालील ओळी कुणी लिहील्या असतील माहिती नाही, पण मनाला भावल्या म्हणुन लिहीत आहे.
“बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती.
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती,
रक्षावे मज सदैव, अन् अशीच फुलावी प्रीती.
बंधन असुनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी…”
आपल्या कुटुंबात, समाजात, देशात प्रेम, आपुलकी, बंधुभाव अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे आणि चिरंतर कायम राहील यात शंका नाही.
संकलन-महेंद्र खोंडे
मु पो त-हाडी ता शिरपूर जि धुळे