फायबर, प्लास्टिक, स्टीलच्या जमान्यात ग्रामीण भागातील तांबटकरी कारागीर होतोय नामशेष!
ग्रामीण भागात पितळी, जर्मन घागरी, हांडे, पातेले दुरुस्त करणारा…
कानी येणारा हा आवाज होतंय कालबाह्य
त-हाडी : पुर्वीच्या काळी तांबटकरी कारागिराचे हातावरचे पोट असल्याने हलक्या आवाजात घागरी, हांडे, पातेलं दुरुस्त करा हो… असे म्हणत तांबटकरी ग्रामीण भागात गल्ली बोळात दारोदारी फिरताना दिसत होता. परंतु काळाच्या ओघात प्लास्टिकच्या, फायबरच्या घागरी, बकेट व स्टिलचे साहित्य आल्याने तांबटकरी कारागिरीवर उपासमारीची वेळ आल्याने तांबटकरी कारागिरांनी पांरपारीक
तांबटकरी व्यावसाय सोडून आता मिळेल त्या कामावर आपला उदरनिर्वाह भागवताना दिसत आहेत.
पूर्वी प्रत्येक गावच्या वेशी बाहेर किंवा रस्त्याच्या कडेला तांबटकरी तांब्याच्या घागरी, जर्मनीचे पातेले, लोखंडी बकेट दुरुस्त करून देण्याचा व्यवसाय करायचे. अलीकडे या व्यवसायाचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही काही ठिकाणी हे परंपरागत व्यवसाय सुरु आहेत.
त-हाडी, वरुळ (ता.शिरपुर) सह ग्रामीण भागात फिरणाऱ्या व तांबटकरी
व्यवसाय करणाऱ्या ७८ वर्षिय वयोवृद्ध वजीर जाफरशा छप्परबंद फकीर या कारागीराने बोलतं केले, तेव्हा या ७८ वर्षीय वयोवृद्ध तांबटकरी कारागिरांनी बोलताना सांगितले की, आपल्या वयाच्या दहा वर्षापासून हा पारंपारिक व्यवसाय करत आहेत. लग्रानंतर त्यांना ३ मुली, ३ मुले झाली, याच व्यवसायावर कुटूंब चालवत सर्व मुला मुलींची लग्न त्यांनी केली. मुलांचा आधार असतो, परंतु आपलं पोट भागविण्यासाठी आपणच होईल तोपर्यंत कष्ट केले
पाहिजेत म्हणून ते या उतार वयातही घागरी ठोकुन दुरुस्तीचे काम करतात. या युगात कमी वेळेत, कमी कष्टात काम कसे होईल याकडे अनेकांचा ओढा असतो. परंतु आमच्या कष्टाकडे पाहिल्यास माझी या वयातही कामावरची निष्ठा समाजापुढे आदर्शच म्हणावी लागेल.
- डोक्यावर ओझे;
‘तांबटकरी, शिकलकरी कुठे तरी पाल ठोकून, त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात. परंतु, मी, मात्र मुक्कामा पुरते पाल ठोकुन दारोदारी
जावून आपला व्यवसाय करतोय साठी व सत्तरी सरली आता ७८ च्या वयातही डोक्यावर साहित्याचे ओझे घेऊन मि दारोदारी फिरतोय. हे साहित्य कुठले तर त्यात दुरुस्तीसाठी लागणारी पक्कड, कात्री, पहार (टामी), जोड व झाळ देण्यास लागणारे पत्रे, कथील (धातू), भाता असे २० किलो वजनाचे साहित्य माझ्या डोक्यावर असते.
एका गल्लीत फिरले तर एखादे काम मिळते. फायबर, प्लास्टिक व स्टिलमुळे आता तांबे पितळ,
जर्मनची भांडे वापरात दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. एखाद्याकडेच असे जुने भांडे असतील तरच हे काम मिळते. त्यामुळे, दिवसभरात कधी १०० तर कधी २०० रुपये मजुरी मिळते. काम करताना काही तुटले, फुटले किंवा जोड व्वस्थित न बसल्यास ग्राहकांचे बोलणेही खावे लागतात.५० रुपये मजुरी मागितली तरी त्यात घासागिस करणारे ग्राहक असतात. परंतु त्याला कष्ट किती लागतात याचे
मोल कोणीच करत नाहीत. अशी व्यथाही ७८ वर्षीय वयोवृद्ध तांबटकरी वजीर जाफरशा छप्परबंद फकीर कारागिर यांनी दिव्य मराठी’शी बोलतांना सांगितली.
काहींना दया येते परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पैसे देऊन एकवेळचे जेवण व चहापाणी करणारेही आजच्या जमान्यात काहीसे आहेत. अशा काही जणांमुळेच या जगात माणुसकी शिल्लक असल्याचा आभास होतो. या माणुसकीच्या बळावरच आपण या वयातही हे काम करतो असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
भात्यावरचा हात थांबेल का?
ऊन, पावसाची तमा न बाळगता मी
या वयातही भाता घेऊन दारोदार फिरतात. जिथे काम मिळेल तिथे आपल्या डोक्यावरचा भाता खाली टेकवायचा अन् काम सुरू करायचे. माझा या भात्यावरचा हात कधी थांबेल याची चिंता ना शासनाला ना या व्यवस्थेला. शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु माझ्यासारख्या पर्यंत का पोचू शकत नाहीत. याचा अर्थ योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नाही असाच घ्यायचा का असे प्रश्न निर्माण होतात.
वरुळ : गल्ली बोळात, दारोदार फिरून भांडे गोळा करतांना ७८ वर्षीय वजीर जाफरशा छप्परबंद फकीर तांबटकरी कारागीर
वरुळ : चमटलेली, फुटलेली, कुजलेले स्टील, जर्मन, पितळी भांड्यांना भात्यावर तापवून आकार देतांना वजीर जाफरशा छप्परबंद फकीर तांबटकरी कारागीर