क्रिप्टो करन्सीकडून फलटणच्या गुंतवणूकदारांची फसवणूक
प्रतिनिधी – धीरेन कुमार भोसले दहिवडी:
फलटण तालुक्यातील गुंतवणूकदारांची प्लाटीन वर्ल्ड या कंपनीच्या क्रिप्टो करन्सीचा प्रमोटर समीर दस्तगीर काझी कडून कोट्यवधींची फसवणुक झाल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी गुंतवणूकदारांनी फलटणच्या पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
सातारा जिल्ह्यात वेदांतरी,इन्कम रुट सारख्या अनेक घटना घडूनही सामान्य नागरीक यासारख्या कंपनीत गुंतवणूक करताना दिसून येत आहेत.यातच क्रिप्टो करन्सीची भर पडल्याचे दिसून येत आहे.
फलटण,सातारा,बारामती,माळशिरससह अनेक गावातील गुंतवणूकदारांची ८ ते १० कोटीची फसवणूक केल्याचा आरोप गुतंवणूकदारांनी समीर काझी,जमीर काझी,रेश्मा काझी यांच्यावर केला आहे.दिड लाख गुंतवणूकीस दरमहा पन्नास हजार तर तीन लाखास दरमहा एक लाख प्रमाणे बारा महिने परतावा देईन.तसेच या सर्व गुंतवणूकीस मी स्वतः जबाबदार असेल्याचे सांगत होता.त्याच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांनी प्रत्येकी ठराविक रकमेची गुंतवणूक केली.
त्यानंतर त्याने पहिल्या हफ्त्याची परतफेड केली.त्यानंतरच्या हफ्त्यासाठी गुंतवणूकदारांनी संपर्क केला असता त्याचा फोन बंद लागू लागल्याने समीर काझीचा शोध सुरू केला.तो फलटण सोडून गेल्याचे समजले.त्यामुळे फलटणच्या गुंतवणूकदारांनी पोलिस निरीक्षकांकडे आरोपीवर गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सातारचे पोलीस अधिक्षक समीर शेख या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करणार का? याकडे फलटणसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.