*माझंही मत* *विदर्भ साहित्य संघात आता सर्व व्यवहार पारदर्शी पद्धतीने व्हावे..*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.अखेर विदर्भ साहित्य संघाची या वर्षाची वार्षिक आमसभा रविवार दिनांक २६ जुलै रोजी पार पडली.
ही सभा वादळी होणार असे भाकीत एका स्थानिक वृत्तपत्राने केले होते. मात्र वादळ तर सोडा पण साधी हवेची झुळूकही तिथे आली नाही, हे विशेष. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली. साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांची तब्येत ठीक नसल्यामुळे कदाचित ते बैठकीला उपस्थितही राहणार नाहीत अशी शक्यता कार्यकारणीतीलच एक सदस्य बोलून दाखवत होते.. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक पत्रकारांनाही ती शक्यता वाटत होती.
मात्र सर्वांचे अंदाज खोटे ठरवत गिरीश भाऊ बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये धडाकेबाज बॅटिंग करावी तसे सर्व विरोधकांचे प्रश्न सहज टोलवले. माझी तब्येत बिघडली होती हे मलाच माहीत नव्हते, असा दावाही गिरीशभाऊंनी या बैठकीत बोलताना केल्याची माहिती आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी गिरीश भाऊंनी मला फोन करून देखील माझी तब्येत बिघडलेली नाही अशी माहिती दिली, आणि माझी तब्येत बिघडली हे तुला कोणी सांगितलं हे देखील विचारले. मात्र पत्रकाराला बातमीचा स्त्रोत विचारू नका आणि मी ते सांगणार नाही असं उत्तर मी त्यांना दिले होते.
त्यावर आमचा प्रेमळ वादही झाला. तो इथे सांगत नाही.मात्र सभेतील एकंदरीत वातावरण बघता आता साहित्य संघातील दहशतीचे वातावरण संपून खेळीमेळीचे वातावरण सुरू झाले आहे, आणि नवे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी यांना एकूणच आता सहमतीचे राजकारण करायचे आहे हे स्पष्ट झाले. त्यांच्या या सहमतीच्या भूमिकेबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.विशेष म्हणजे २००२ साली साहित्य संघाचे वादग्रस्त संकुल पूर्ण न झाल्याबद्दल आवाज उठवणाऱ्या सहा सदस्यांवर निष्कासनाची जी कारवाई केली होती ती कारवाई रद्द केली असल्याची घोषणा डॉ. गिरीश गांधी यांनी केली. त्या सर्वांना सन्मानाने साहित्य संघात पुन्हा स्थान दिले जाईल असेही त्यांनी जाहीर केले.
२००२ साली डॉ. कुमार शास्त्री, डॉ. वि.स.जोग, योगेश बऱ्हाणपुरे, दिनकर देशपांडे, अनिल शेंडे आणि अविनाश पाठक म्हणजेच अस्मादिक अशा सहा आजीवन सदस्यांना तत्कालीन कार्यकारिणीने निष्कासित केलेले होते. तेव्हापासूनच साहित्य संघात एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर २००७ साली यातील डॉ. वि.स.जोग आणि योगेश बऱ्हाणपुरे यांना नव्याने सदस्यता देण्यात आली होती. उर्वरित चौघांमध्ये ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि पत्रकार दिनकरराव देशपांडे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता डॉ. कुमार शास्त्री, अनिल शेंडे आणि अविनाश पाठक यांना जुनी सदस्यता बहाल करण्यात येणार असे अध्यक्षांनी जाहीर केल्याचे वृत्त वृत्तपत्रात आले आहेत. अर्थात तसे स्वतः गिरीशभाऊंनी मला फोन करून देखील कळवले आहे.
मात्र अद्याप साहित्य संघाच्या सरचिटणीसांकडून जसे २००२ मध्ये निष्कासित केल्याचे पत्र आले होते, तसे ते निष्कासन रद्द केल्याचे अद्याप पत्र आलेले नाही. त्यामुळे जोवर पत्र येत नाही तोवर हे खरे कसे समजायचे हा प्रश्नच आहे. कारण लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते म्हणतात.तीन निष्कासितांना पुन्हा सदस्यता देणार ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र या प्रकरणात जे आज हयात नाहीत, त्या दिनकरराव देशपांडेंवर मात्र अन्याय झालेला आहे. दिनकररावांचे बालसाहित्यिक म्हणून तसेच वऱ्हाडी भाषेतील साहित्यिक म्हणून मराठी वाङ्मय विश्वात मोठे योगदान आहे. अखिल भारतीय मराठी बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले आहे. ही बाब लक्षात घेत गिरीशभाऊंनी आता साहित्य संघात दिनकरराव देशपांडे यांचे चिरंतन स्थायी स्मारक उभे होईल याबाबत पुढाकार घ्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. इथे दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी या सहा सदस्यांना निष्कासित केले, त्यावेळी त्याचा निषेध म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या आजीवन सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
द. भि. सरांचे देखील मराठी वाङ्मय विश्वात मोलाचे योगदान आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. मात्र या प्रकरणानंतर साहित्य संघाने त्यांना कायम दुर्लक्षितच ठेवले होते. ही बाब लक्षात घेत गिरीशभाऊंनी द.भि. सरांचे देखील साहित्य संघात स्थायी चिरंतन स्मारक उभारावे अशी माझी त्यांना आणखी एक नम्र विनंती आहे. गिरीशभाऊ सध्या सकारात्मकतेचे राजकारण करण्याच्या मानसिकतेत आहेत असे दिसते. त्यामुळे ते या सूचनांवर विचार करतील अशी आशा करायला हरकत नाही.
आता आणखी एक मुद्दा, आमसभेनंतर झालेल्या पत्र परिषदेत अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी सध्याचे सांस्कृतिक संकुल आणि त्यात निर्माण झालेल्या भानगडी लक्षात घेत साहित्य संघाने सरकारकडे दुसरी जागा मागितली असून तिथे नवे संकुल बांधण्यासाठी शंभर कोटी रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी केली असल्याची माहिती दिली, आणि या प्रस्तावाला आम सभेने मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आमसभेत असलेल्या आजीव सदस्यांच्या मते या विषयावर सभेत कोणतीही चर्चा झाली नाही. आज एका वृत्तपत्रात आम सभेत उपस्थित असलेले एक आजीव सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी एका लेखात ही बाब नमूद केली आहे.
मग आम सभेला विश्वासात न घेताच डॉ गिरीश गांधींनी हा निर्णय घेतला का हा प्रश्न निर्माण होतो. यामुळे कार्यकारिणीतले देखील एका गटाचे सदस्य नाराज झाले असून त्यांनी गिरीश भाऊंना साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आणण्यासाठी संपूर्ण रणनीती आखणारे आणि ती रणनिती यशस्वीरित्या राबवणारे डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्याकडे तक्रार केल्याची बातमी देखील एका प्रमुख वृत्तपत्राने प्रकाशित केली. इतकेच काय पण कोठेकरांबरोबर या तक्रारकर्त्यांचा फोटो देखील त्या वृत्तपत्राने प्रकाशित केला. त्यामुळे साहित्यिक वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटले आहे.विदर्भ साहित्य संघाच्या भूखंडावर आधीचे धनवटे रंगमंदिर होते. ते पाडून तिथे हे जे व्यापारी संकुल उभे केले गेले त्याबाबत सर्वच नाराज आहेत. तिथे आजच्या परिस्थितीत हे संकुल पाडून नवीन इमारत बांधायची तर प्रचंड भानगडी होतील. ही बाब लक्षात घेऊन डॉ गिरीश गांधींनी मध्यम मार्ग शोधला आणि सरकारला दुसरा दोन एकराचा भूखंड मागितला आणि नवी इमारत बांधण्यासाठी अनुदानही मागितले. त्यात गैर काहीही नाही. उलट त्याचे स्वागतच व्हायला हवे. या प्रकाराने जर लवकरात लवकर दुसरी नवी इमारत उभी होणार असेल तर साहित्यप्रेमींना आनंदच होईल. मात्र ते काम पारदर्शी पद्धतीने सगळ्यांना विश्वासात घेऊन केले जायला हवे. हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. आमसभेत हा प्रस्ताव मांडला असता तर फारसा विरोध झाला नसता हे निश्चित.
तरीही आम सभेत हा प्रस्ताव का मांडला नाही आणि आमसभेत न मांडता परस्पर घोषणा का केली गेली हा देखील प्रश्न विचारला जातो आहे. याचे उत्तर देखील गिरीशभाऊंनी वैदर्भीय साहित्य प्रेमींना द्यायला हवे. आता शेवटचा मुद्दा, साहित्य संघाच्या जागेवर उभारले जाणारे संकुल उभारताना बऱ्याच भानगडी झाल्या. त्यामुळे ते संकुल पूर्ण झालेले नाही, आणि नजिकच्या भविष्यात ते पूर्ण होणे शक्य नाही. पूर्ण झाले तरी ते वापरताना बऱ्याच अडचणी येणार आहेत. म्हणूनच गिरीजीभाऊंनी सरकारला नवी जागा मागितली आहे. याचाच अर्थ संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यापासून तर अगदी काल-परवापर्यंत जे काही प्रकार या संकुल प्रकरणात झाले त्यावर एक श्वेतपत्रिका काढून वैदर्भीय जनतेला नेमके वास्तव काय ते कळावे यासाठी गिरीश भाऊंनी पुढाकार घेतला पाहिजे.
त्याचबरोबर १९९४ ते अगदी आजपर्यंत हे संकुल नसल्याने साहित्य संघाचे आणि विदर्भाच्या साहित्यिक तसेच सांस्कृतिक वर्तुळाचे जे काही नुकसान झाले त्याची जबाबदारी जे हा संकुल उभारण्याचा निर्णय घेणारे आणि त्याला वेळोवेळी मुदतवाढ देणारे पदाधिकारी असतील त्यांच्यावर निश्चित करून त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे. ही फक्त माझीच नव्हे तर सर्वच वैदर्भीय साहित्यप्रेमींना मागणी आहे. गिरीशभाऊ याबाबतही योग्य ते पावले उचलतील अशी सर्वांचेच अपेक्षा आहे.


