*घ्या समजून राजेहो…**महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.भारतीय जनता पक्ष हा सध्या तरी जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो आहे.
पक्षाचा जसा जसा विस्तार होतो आहे, तसे तसे इतर राजकीय पक्षांमध्ये मधून तिथले कार्यकर्ते आणि नेते कधी भाजपची ध्येयधोरणे पटली म्हणून तर कधी काही व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत आहेत. त्यातले काही नेते मोजक्या काळासाठी आपला स्वार्थ साधावा म्हणून ऑन डेफ्युटेशन इतर पक्षातून भाजपमध्ये येतात आणि स्वार्थ संपला की निघून जातात, असेही दिसून आले आहे. मात्र त्यामुळे भाजपमध्ये आता अंतर्गत संघर्ष वाढलेला दिसत असून असेच सुरू राहिले तर या पक्षाला भविष्यात पीछेहाटीला सामोरे जावे लागू शकते अशी भीती व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पक्ष १९८० साली स्थापन झाला. त्यापूर्वी या पक्षाचे नाव भारतीय जनसंघ असे होते. भारतीय जनसंघाची स्थापना १९५२ मध्ये झाली होती आणि त्यात त्या काळातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील तरुणच मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत होते.
अन्य समाजातील प्रमाण त्या तुलनेत कमी होते. त्यामुळे भारतीय जनसंघात देखील त्या काळात ब्राह्मणांचे वर्चस्व जास्त राहिलेले दिसून येत होते. नंतरच्या काळात महाराष्ट्रात लक्ष्मणराव मानकर, महादेव शिवणकर, उत्तमराव पाटील, मोतीराम लहाने असे काही ब्राह्मणेतर कार्यकर्ते सक्रिय झाले होते खरे. तरीही भारतीय जनता पक्ष हा भटजी आणि शेटजींचा पक्ष म्हणूनच महाराष्ट्रात ओळखला जात होता. मात्र मधल्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील सामाजिक समरसतेचे धोरण स्वीकारल्यामुळे ब्राह्मणेतर जातीच्या तरुणांना संघाकडे आकर्षित केले जाऊ लागले. तसेच भारतीय जनता पक्षात देखील ब्राह्मणेतर जोडले जाऊ लागले.
१९८० नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे, प्रा. ना.स.फरांदे, भाई गिरकर, पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत दादा पाटील, अण्णा डांगे असे अनेक ब्राह्मणेतर नेते सक्रिय झाले. परिणामी शेठजी आणि भटजींचा पक्ष ही प्रतिमा हळूहळू पुसली जाऊ लागली. मात्र असे असले तरी मुंडे, फरांदे, गिरकर, पाटील, डांगे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवण्यासाठी नितीन गडकरी, गंगाधरराव फडणवीस, गिरीश बापट, प्रकाश जावडेकर, असे संघाच्या मुशीतून घडलेले कार्यकर्ते सोबत होतेच. त्यामुळेच पक्ष वाढत गेला आणि त्याला आजचे विशाल स्वरूप प्राप्त झालेले आहे. आज गत १२ वर्षापासून केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे,
तर देशातील अर्ध्या राज्यांमध्ये देखील भाजप सत्तेत आला आहे. हळूहळू त्यांची ताकद वाढतेच आहे असे चित्र दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी मूळचे संघाच्या मुशीतून भाजपमध्ये आलेले “असू आम्ही पत्थर पायातील” असे म्हणणारे कार्यकर्ते आणि नव्याने इतर पक्षातून आलेले नेते यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असलेला दिसून येतो आहे. अर्थात आज त्याला उघड स्वरूप आलेले नसले तरी अंतर्गत धुसफूस ही सुरूच आहे. त्यातच आता जुने ब्राह्मण कार्यकर्ते आणि नव्याने आलेले ब्राह्मणेतर कार्यकर्ते यांच्यात देखील मोठे कोण यावर वादावादी सुरू असल्याचे जाणवते आहे. एकूणच “घरची म्हणते देवा देवा अन शेजारणीला चोळी शिवा” असा प्रकार सुरू झाल्याचा आरोप केला जातो आहे.सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाची किंवा १९८० नंतर भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात तरी खरी वोट बँक ही ब्राह्मण समाजच होती.
नंतर हळूहळू ब्राह्मणेतर मतदार त्यांना जोडले गेले हा भाग वेगळा. मात्र ब्राह्मणांचे महत्त्व तिथे नाकारता येत नव्हते. तरीही गेल्या सुमारे २५ वर्ष वर्षात भारतीय जनता पक्षात जुन्या पायातील पत्थर असलेल्या कार्यकर्त्यांना नाकारले जाते आहे आणि नव्याने आलेल्या उप-यांना लगेच संधी दिली जाते आहे, थोडक्यात “पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार” असा प्रकार होत असल्याची टीका पक्षाच्या हार्डकोअर कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. त्याबद्दल नाराजीही दिसून येते आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हे प्रकार प्रकर्षाने दिसून आले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची नाराजी, पक्ष श्रेष्ठीं समोर घोषणाबाजी करणे, त्यांच्या गाड्या अडवणे असेही प्रकार झाले होते. महाराष्ट्रात जनगणनेच्या आकड्यानुसार ब्राह्मण समाज फक्त तीन ते साडेतीन टक्के इतकाच आहे. त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर आम्हाला बहुजन समाजाला हाताशी धरावेच लागेल असा दावा भाजप नेते करतात, आणि त्यातून मग बहुजन समाजाला झुकते माप दिले जाते. मात्र तरीही भाजपला बसायचा तो फटका बसतोच. २०२३ मध्ये पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर कुणीतरी ब्राह्मणाला संधी द्यावी अशी पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती.
त्यातही गिरीश बापट यांच्या कुटुंबातील कुणाला किंवा त्याच वेळी दुर्दैवी अंत झालेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणाला तरी उमेदवारी द्यावी म्हणजे ती जागा हमखास भाजपकडे येईल असा दावा केला जात होता. मात्र भाजप श्रेष्ठींनी ब्राह्मणे तर म्हणून हेमंत रासनेंना उमेदवारी दिली आणि त्याचा परिणाम म्हणून की काय तर हेमंत रासने पराभूत झाले आणि रवींद्र घांगेकर विजयी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार या मतदारसंघात ब्राह्मण मतदार एकूण मतदार संख्येच्या २८ टक्के इतके होते. त्यांची नाराजी येथे भाजपला महागात पडेल हा मुद्दा भाजप श्रेष्ठींना वारंवार लक्षात आणून दिला गेला. तरीही रासनेंना उमेदवारी दिली परिणामी ती जागा हातून गेली होती. ज्याप्रमाणे पुण्यात ब्राह्मण हे निर्णायक मतदार ठरू शकतात. तसेच महाराष्ट्रात एकूण आठ लोकसभा मतदारसंघ असल्याचे आढळून आले आहे. आठ लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकूण ४८ विधानसभा मतदारसंघ होतात, ही बाब लक्षात घेतली तर भाजपासाठी पायाचा दगड म्हणून उभ्या राहिलेल्या जुन्या ब्राह्मणांची नाराजी ही भाजपाला धोक्याची घंटा वाजवणारी ठरू शकते हे लक्षात घेतले जायला हवे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अधून मधून त्यांचे अधिकारी आणि संघ परिवारातील संघटनांचे प्रमुख नेते यांची समन्वय बैठक घेत असतो. २०२३ च्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र स्तरावरील जी समन्वय बैठक मुंबईत पार पडली, त्यात पुण्यातील जागेचा संदर्भात देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यावेळी त्यांनी काहीशी उडवाउडवीचीच उत्तरे दिली होती असे सांगण्यात आले. ब्राह्मण समाज महाराष्ट्रात फक्त तीन टक्के असला तरी तो एक सुबुद्ध समाज म्हणून ओळखला जातो. आज बहुसंख्य बुद्धिवंत विद्वान ज्यांना समाजात ओपिनियन मेकर्स म्हणून ओळखले जाते असे ब्राह्मण समाजातीलच आहेत.
काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात त्यांची थिंक टॅंक ब्राह्मण समाजाचीच होता. डाव्या चळवळीवरही सुरुवातीच्या काळात ब्राह्मण समाजाचेच वर्चस्व राहिलेले दिसून येते. त्याचे उदाहरण म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, भाई बर्धन असे अनेकांचे देता येईल. समाजवादी चळवळीवर देखील ब्राह्मण समाजाचे वर्चस्व राहिलेले दिसून आले. इतकेच काय पण ज्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात सामाजिक समरसतेचा मंत्र देत सामाजिक क्रांती घडवून आणली होती, त्यांचे त्या काळातील डॉ भवानीशंकर नियोगींसारखे अनेक ब्राह्मण सहकारी सक्रिय होते,हे देखील इथे नमूद करायलाच हवे. आज देखील प्रशासनात तसेच समाजात बुद्धिवंत म्हणून ब्राह्मण समाजाचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर समाजाला दिशादर्शन देत समाजाचे मतपरिवर्तन करण्याचे म्हणजेच आजच्या भाषेत नॅरेटिव सेट करण्याचे काम हीच मंडळी करत असतात हे देखील लक्षात घ्यायला हवे.तरीही अजूनही भारतीय जनता पक्ष आणि त्याचे महाराष्ट्रातील नेतृत्व हा मुद्दा लक्षात घ्यायला तयार नाही असेच लक्षात येते. त्यामुळेच आज देखील महाराष्ट्रात जुन्या पायातील दगड असलेल्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या वारसांना भाजप संधी नाकारते आहे असे अनेकदा जाणवते आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असलेला दिसून येतो आहे. आता २०२९ पर्यंत महाराष्ट्रात लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका नसल्या, तरी काही जिल्हा परिषदींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पाठोपाठ ग्रामपंचायतींच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत. यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही जागांवर निवडणुका होऊ घातल्या आहेत. विदर्भात वर्षानुवर्षे भाजपच्या हक्काच्या जागा असलेल्या काही जागांवर २०२० मध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यावेळी तरी भाजप नेतृत्वाने फक्त बहुजन समाज सोबत घेऊन पुढे जात जुन्यांवर अन्याय करत तुमचे काम फक्त सतरंज्या उचलण्याचेच असा संदेश देणे थांबवायला हवे आणि जुन्यांचा तसेच त्यातील बुद्धिवंतांचा योग्य असा आदर करण्याचा धोरण राबवायला हवे. तसे केले नाही तर भविष्यात महाराष्ट्रात तरी भाजपला धोका होऊ शकतो हे निश्चित. इथे एक मुद्दा विशेषत्वाने नमूद करावासा वाटतो. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात ब्राह्मण समाज लक्षणीय आहे. इंदिरा गांधींच्या काळात देखील काँग्रेसचे बहुजन समाजाला जवळ करण्याचे धोरण राहिले होते. मात्र इंदिरा गांधींच्या काळात तब्बल वीस वर्षे त्यांनी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपद हे ब्राह्मणालाच दिले होते. तर मध्य प्रदेशात देखील शुक्ला व्होरा अशा ब्राह्मणांच्या हातात राज्याची सत्ता सोपवली होती. बहुजन समाजाला जवळ करण्याच्या नादात इंदिरा गांधींनी ब्राह्मणांवर अन्याय केला नव्हता. तर ब्राह्मणांना मुख्यपद देऊन चुचकारत सत्ता पक्षाच्या ताब्यात ठेवली होती. नंतर बहुजन समाज पक्षाचे कांशीराम किंवा नंतर मायावती यांनी देखील हेच धोरण राबवले, म्हणूनच तिथे त्यांना सत्ता मिळवता आली होती. त्यामुळे सत्ता मिळवण्याच्या नादात एखाद्या जातीच्या समाजाला दुर्लक्षित ठेवणे, तसेच जे परिवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षाच्या पायाचे दगड राहिले आहेत, त्यांना दुर्लक्षित करणे हे धोरण भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय नेतृत्वाने थांबवायला हवे. तसे केले नाही तर भविष्यात पुन्हा या देशावर काँग्रेसचे राज्य येऊ शकते, किंवा मग दुसरी कोणती समांतर शक्ती पुढे येऊन भाजपला बाजूला टाकू शकते, हा धोका भाजप नेतृत्वाने आजच लक्षात घ्यायला हवा. उद्या कदाचित उशीर झालेला असेल. या विषयावर वाचकांची स्पष्ट आणि परखड मते अपेक्षित आहेत. त्यांचे स्वागतच होईल. वाचकहो पटतंय का तुम्हाला हे………? त्यासाठी आधी समजून तर घ्या लागेल राजेहो……

