सुरांच्या मैफिलीत गुरूंना मानवंदना! लक्ष्मी कराओके स्टुडिओत गुरुपौर्णिमा सोहळा दिमाखात संपन्न..!
मुंबई, परेल (प्रतिनिधी):
भारतीय संस्कृतीत गुरूला परब्रह्माचे स्थान दिले जाते. याच परंपरेचे आणि मूल्यांचे जतन करत, परळ येथील ‘लक्ष्मी कराओके स्टुडिओ’मध्ये गुरुपौर्णिमा सोहळा अतिशय उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. संगीताच्या सुरांनी सजलेल्या या सोहळ्यात गुरुतुल्य व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली.
प्रतिभावान गायक हसमुख सोलंकी आणि शारदा मॅडम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि अधिपत्याखाली या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संगीत आणि कला क्षेत्रातून आलेल्या अनेक नामवंत गायक-गायिकांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. समाजातील गुरुतुल्य व्यक्तींनी केलेल्या निस्वार्थ कार्याचा आणि मार्गदर्शनाचा सन्मान म्हणून, उपस्थित दिग्गजांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अत्यंत सन्मानाने यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. रामजी डोडीया, सौ. लक्ष्मी डोडीया, काफिल अन्सारी, शरद तावडे, महेश्वर तेटांबे आणि राजगुरू सर यांसारख्या एकापेक्षा एक नामवंत आणि दिग्गज कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
त्यांच्या उपस्थितीने स्टुडिओतील नवोदित कलाकारांना एक नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा हा सूत्रसंचालक असतो. या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी डॉ. मंगेश पेडामकर यांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलली. आपल्या मधाळ, ओघवत्या आणि प्रभावी वाणीने त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रे अशी काही बांधून ठेवली, की उपस्थित रसिकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
त्यांच्या उत्कृष्ट निवेदनामुळे कार्यक्रमात वेगळीच रंगत आली. संगीत, कला आणि गुरुप्रति असलेला आदरभाव अशा या त्रिवेणी संगमाने परळचा हा गुरुपौर्णिमा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.


