गोंदवले, – : तब्बल तीस वर्षाहून अधिक काळापासून एकदाही वापरात न आलेली व खिंडार बनलेली कृषी विभागाची इमारत अखेर पाडण्यात आल्याने गोंदवल्यातील परिसर स्वच्छ झाला.ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या जागी विकास सेवा सोसायटी स्वमालकीची वस्तू उभारणार आहे.
शासनाच्या कृषी मंडल विभागासाठी गोंदवले बुद्रुक येथील मध्यवर्ती भागात १९९२ च्या सुमारास बहुउद्देशीय योजनेंतर्गत भव्य इमारत बांधण्यात आली होती.या सुसज्ज इमारतीत कृषी मंडलाधिकारी कार्यालयासह निवासाची सोय होईल अशी रचना करण्यात आली होती.परंतु इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून येथे कुणी अधिकारी आलेच नाहीत.परिणामी ही इमारत विनावापर पडून राहिली.कालांतराने या दुर्लक्षित इमारतीजवळ घाणीचे साम्राज्य पसरले.तसेच हळूहळू इमारतीची मोडतोड होऊन खिंडार बनले.त्यामुळे या परिसरात घाणीचा,दुर्गंधीचा व डासांचा त्रास येथील नागरिकांना सोसावा लागत होता.या पडीक इमारतीच्या वापराबाबत ग्रामपंचायतीनेही वेळोवेळी उपाययोजना आखल्या.परंतु त्यात यश आले नाही.
अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व निकामी इमारत पाडून त्याजागी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयाची इमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव चेअरमन अमृत पाटील व सदस्यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मांडला. सरपंच जयप्रकाश कट्टे,उपसरपंच संजय माने यांच्यासह उपस्थितांनीही त्याला तात्काळ मंजुरी दिल्याने ही इमारत पडण्याचा मार्ग मोकळा झाला.सोसायटीच्या नव्या इमारतीचा आराखडा तयार करून जुनी इमारत पाडण्यात आली.अनेक वर्षांपासून अस्वच्छ असणारा हा परिसर स्वच्छ झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान या परिसरात सोसायटीसह आरोग्य उपकेंद्र इमारत तसेच बाजारतळाचा विस्तार करण्याचे कामही ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
छाया- जागेची स्वच्छता करताना.







