पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत
- पाच महिन्यांचे मानधन रखडले
- आर्थिक गणित बिघडले
- पोलीस पाटील संघटना करतेय पाठपुरावा
वरकुटे – मलवडी / वार्ताहर
सातारा जिल्ह्यातील पोलीस पाटीलांना गेल्या पाच महिन्यापासून मानधन मिळालेले नाही . कोरोना संसर्ग काळात कौतुकास्पद काम करणारे पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे पोलीस पाटील यांचे आर्थिक गणित बिघडले असून ते अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांचे मानधन तात्काळ जमा व्हावे अशी मागणी सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष महेश शिंदे यांनी केली आहे.
पोलीस स्टेशन आणि गावातील ग्रामस्थ यांच्या मधील दुवा म्हणून पोलीस पाटील यांच्याकडे पाहिले जाते. गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पाटील सतत प्रयत्नशील असतात कोरोना काळात पोलीस पाटील यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापूर काळात सुध्दा पोलीस पाटील यांनी प्रशासनास सहकार्य केले. पोलीस पाटील हे मानधन तत्वावर काम करतात.
सुरुवातीला पोलीस पाटील यांना दरमहा ८०० रुपये एवढे अत्यल्प मानधन दिले जात होते. त्यानंतर काही वर्षानंतर दरमहा ३ हजार रुपये एवढे करण्यात आले. २०१९ विधानसभा निवडणूक पूर्वी तत्कालीन सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मानधनात वाढ करून दरमहा ६५०० करण्यात आले.
पंरतु मानधन मिळण्यात अनियमितता आढळून आली आहे. दरमहा मानधन मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत २ – ३ महिन्यांंनी मानधन जमा होऊ लागले आहे. एप्रिल २०२१ पर्यंत मानधन मिळाले आहे. मे , जून , जुलै , आँगस्ट , सप्टेंबर या महिन्याचे मानधन अद्याप मिळाले नाही. त्यामुळे पोलीस पाटील बांधव नाराज आहेत. मध्यंतरी काळात अनेक पोलीस पाटील संघटना यांनी दरमहा १५ हजार रुपये मानधन मिळावे यासाठी शासन दरबारी मागणी केली आहे. पंरतु आहे तेच मानधन मिळण्यास विलंब होत असलेले तुर्तास ती मागणी मागे पडली आहे.
लाँकडाऊन काळात पोलीस पाटील यांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना मानधन मिळाले नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर मानधन जमा होईल या आशेत सर्वजण आहेत. मानधन मिळावे यासाठी अनेक पोलीस पाटील संघटना पाठपुरावा करण आहेत.
चौकट
थकीत मानदनासाठी पाठपुरावा करणार :- शिंदे
मे महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. कोरोना आणि महापूर या संकटात आम्ही प्रशासनास सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस स्टेशनला सुद्धा वारंवार सहकार्य केले आहे. इतर कर्मचारी वर्गाप्रमाने आम्हाला काम करण्यासाठी वेळेचे बंधन नसते. रात्री , अपरात्री एखादा प्रसंग घडला की कधीही आम्हाला त्या ठिकाणी हजर रहावे लागते . गेली अनेक वर्षे मिंटीग प्रवास भत्ता मिळाला नाही. पोलीस पाटील संघटनेच्या वतीने प्रवास भत्ता , थकीत आणि नियमित स्वरूपात मानधन मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- महेश शिंदे
कार्याध्यक्ष - सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटना







