महाराष्ट्रातील अतिवृष्टी केन्द्र सरकारकडुन मदत – 2020 व 2021 ?
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
महाराष्ट्रात २०२० साली अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले होते, त्याबद्दल केंद्र सरकारच्यावतीने ७०० कोटींची मदत मंजूर केली असल्याचे काल जाहीर करण्यात आले. २०२० च्या अतिवृष्टीत नुकसान झाले होते, त्यासाठी राज्याने केंद्राकडे ३ हजार ७०० कोटींची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केल्यानंतर ७०० कोटींची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत आणि यावर्षी महाराष्ट्रात आलेला पूर यांचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सांगितले.
यावर्षी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज सध्या राज्य सरकार घेत आहे. सर्व पाहणी झाल्यानंतर राज्य सरकार एकूण नुकसानीचा आकडा ठरवेल आणि केंद्राकडे त्यानुसार मदत मागेल. तसेच केंद्र सरकारचे पथक जर आताच पाहणी करण्यासाठी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करु. गुजरातमध्ये केंद्राने नुकतीच एक हजार कोटींची मदत दिलेली आहे. त्यानुसार जर महाराष्ट्रालाही मदत केली तर चांगलेच होईल, असेही अजितदादा म्हणाले.

