युवकांनी जंगली रमीचा नाद सोडावा -ॲड. चैतन्य भंडारी
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई – मित्रांच्या सोबतीने ऑनलाईन जंगली रमी खेळण्याची सवय आता बहुतेक युवकांना लागली आहे. आजच्या महागाईच्या युगात सध्याचा रोजगारातून मिळणारे उत्पन्न हे अत्यल्प असून आपल्या उत्पन्नात आणखी वृध्दी व्हावी म्हणून आजची तरुण पिढी ही वेग- वेगळया मार्गांचा अवलंब करीत असते. कुठल्या मार्गाने ईजी मनी येईल, शॉर्टकटच्या माध्यमातून आपल्याला लवकर करोडपती कसे होता येईल हा विचार त्यांचा मनात सतत येत असतो. त्यात ऑनलाईन जुगार हा त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय अत्यंत सोपा वाटतो.
सुरुवातीला जंगली रमी खेळणा-याला एक ते दोन हजार रुपये सहज भेटतात त्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो. हळूहळू जंगली रमी खेळणारे लोक हे त्यात गुंतत जात आणि जंगली रमी खेळत असतांना ते कसे जाळयात अडकतात हे त्यांना समजत देखील नाही. हा खेळ करणारे लोक हे नंतर पैसे हरल्यावर ते आपल्या कुटुंबियांकडून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून उधारीवर पैसे घेवून हा जीवघेणा खेळ खेळत असतात आणि त्याचा अंत हा भयानक पध्दतीने होत असतो. जंगली रमीचा आहारी गेलेल्या कित्येकांनी आत्महत्या केलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि याच्या बचावापासून सायबर तज्ञांकडे कित्येक पालकांनी सल्ला मागितला आहे व खेळातील धोक्यांबद्दल जनतेला जागृत व जागरुक करा अशी विनंती सुध्दा केली आहे.
आता तसे पाहिले तर हा खेळ खेळणे कायद्याने गुन्हा कारण हा खेळ व्हच्युअल आहे, पण आता बहुतांशी लोकांची अशी मानसिकता बनत चालली आहे की, हा खेळ कधीतरी एकदा खेळलाच पाहिजे आणि इथेच तर सगळयात मोठा धोका आहे. कारण एकदा कुठलीही सवय लागली की ती लवकर सुटत नाही. यातून एक पिढी संपुर्णतः उध्दवस्त होत आहे, कारण ऑफलाईन लॉटरी काय किंवा जुगार काय किंवा ऑनलाईन जंगली रमीचा खेळ काय यात कुठल्याही प्रकारचा जुगार खेळणा-या व्यक्तीचे आयुष्य हे बरबाद होतच असते. म्हणुन आपल्या मुलांना प्रामाणिक पणे कष्ट करुन पैसे कमवण्याचे संस्कार लहानणापासूनच आपल्या मुलांवर करावे व त्यांना अशा प्रकारच्या ऑनलाईन जुगार, खेळ पासून वेळीच सावध करावे, असे कळकळीचे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.