दहिवडी : ता.२३
दहिवडी ता.माण येथील रयत शिक्षण संस्थेच्या परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडी या ठिकाणी शरद पवारांच्या आगमना प्रित्यर्थ या शाळेने चक्क झाडांचे बलिदान दिल्याचे समोर आले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांचा मान मध्ये महाराष्ट्रातील राजकीय सत्तानाट्यानंतर प्रथमच दौरा होत आहे. कन्या शाळेमध्ये शरद पवार यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात येणार आहे. तसेच दहिवडी कॉलेज दहिवडी च्या वतीने उभारण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या नूतन इमारतीचेही उदघाटन खा. पवार करणार आहेत. यासह कन्या शाळेच्या पाठीमागे असलेल्या दहिवडी कॉलेजच्या मुलांच्या वस्तीग्रहाचे उद्घाटन ही शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे .मात्र त्यांच्या स्वागतासाठी पर्यावरणाचा ऱ्हास हा रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतूनच होत असल्याने अनेकांनी या बाबीमुळे भुवया उंचावल्या आहेत.
एकीकडे पर्यावरण संवर्धन काळाची गरज आणि माणमध्ये सध्या पावसाची मोठी कमतरता हे दोन मुद्दे विचारात घेतले असता अशाप्रकारे वृक्षतोड होणे ही बाब नक्कीच निंदनीय आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजने रयत संकुल फुलवण्यासाठी सर्वत्र वृक्षारोपण केले आहे, मात्र कन्या शाळेने वृक्षतोड करत दहिवडी कॉलेजने केलेल्या कामाला शह दिला आहे.
रयत शिक्षण संस्थेचे प्रतीक चिन्ह हे वटवृक्ष असून त्यातून वृक्ष संवर्धनाची शिकवण दिली जाते. वृक्षसंवर्धनाची गरज ओळखून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वटवृक्षाची प्रतीक चिन्ह म्हणून निवड केली. वटवृक्षाप्रमाणे बहरत जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्याच शाखेमध्ये झालेल्या वृक्षतोडीने कर्मवीर अण्णांचे विचार पायदळी तुडवले आहेत.
या एकंदरीत प्रकाराबाबत वन विभागाने चौकशी करत कारवाई करण्याची मागणी माजी विद्यार्थिनींच्या माध्यमातून होत आहे. त्या मागणीचा विचार करून आणि वृक्षसंवर्धनाची गरज ओळखून वनविभाग कन्या शाळेत ने केलेल्या या प्रकाराबाबत काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.