दहिवडी नगरपंचायत इमारत आ. जयकुमार गोरेंच्या प्रयत्नांमुळेचःसौ.साधना गुंडगे
………………………….
सौ. साधना गुंडगे ; पवारांच्या हस्ते उद्घाटन झाले तर आम्ही काळे झेंडे दाखवणार
दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे मी नगराध्यक्ष असताना निधी मंजूर झाला होता. आमच्या सर्व सहकाऱ्यांचे त्या कामात योगदान आहे. ज्यांनी जिल्हा नियोजनचा नियमीत निधी सोडून कधी एक रुपयाचे विकास काम दहिवडी शहर किंवा तालुक्यात आणले नाही त्या देशमुखांनी शरद पवारांच्या हस्ते इमारतीच्या उद्घाटनाचा घातलेला घाट चुकीचा असून आम्ही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सौ.साधना सिध्दार्थ गुंडगे यांनी दिला आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये ठराव होवून दहिवडी नगरपंचायतीची नूतन इमारत उभारण्याचे निश्चित झाले होते. मी नगराध्यक्ष असताना आ.जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ / ४ /२०१७ रोजी नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनांच्या निधीतून नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी उपलब्ध झालेल्या एक कोटीहून अधिक निधीला माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मंजूरी देण्यात आली होती. त्या ठरावाला वैशाली कदम सूचक आणि नलिनी काशिद अनुमोदक होत्या. एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या सभेत आम्ही इमारतीचे बांधकाम कसे असावे याबाबत आढावा घेतला होता. ७ जून २०१९ रोजी आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते नगरपंचायत इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
या इमारतीसाठी ज्यांचे काडीमात्र योगदान नाही ते प्रभाकर देशमुख आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते इमारतीच्या उद्घाटनाचा घाट त्यांनी घातला आहे. जिल्हा नियोजन समितीचा नियमीत निधी सोडला तर देशमुख यांनी दहिवडी शहरासाठी किंवा तालुक्यासाठी एक रुपयाचा निधी आणल्याचे ऐकिवात नाही. अडिच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना सांगण्यासारखे एक मोठे विकासकाम त्यांच्याकडून झाले नाही. उलट माण तालुक्यासाठी असणाऱ्या पाणी योजनांची कामे रखडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जिहेकठापूरच्या वाढीव योजनेच्या कामांचे टेंडर रखडविण्याचे पाप त्यांनी केले.
आ. जयकुमार गोरेंनी प्रयत्न केल्याने नगरपंचायत इमारतीला निधी मिळाला. आम्ही केलेल्या कामाचे विरोधकांनी श्रेय घेऊ नये. तुम्ही निधी मंजूर करुन आणा आणि खुशाल त्या कामांची उद्घाटने करा. त्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही, मात्र आमच्या कामाचे श्रेय घेणार असाल तर शरद पवारांच्या कार्यक्रमाचा आम्ही सर्व आजी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून निषेध करु .
…………………………….
आमच्या कामाचे श्रेय खा.पवार घेणार नाहीत …..
आ. जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून नगरपंचायत इमारतीला निधी उपलब्ध झाला होता हे सर्वांना माहित आहे. इमारत कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे २०१९ मधील फोटो आणि माझ्या कार्यकाळात झालेल्या कामांची कागदपत्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहेत. पूर्व इतिहास पाहता खा.पवार आम्ही केलेल्या कामाचे श्रेय कधीच घेणार नाहीत.