कर्तव्यदक्ष पोलिसांच्या भावना न दुखावता त्यांचा आदरपूर्वक सन्मान करा. .!
-प्रासंगिक-
महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे आणि महत्वाचे राज्य असून महाराष्ट्रातील पोलिस दल देशातील सर्वात मोठ्या पोलिस दलातील एक आहे. “ ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलिस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा. नायनाट करण्यास बांधील आहेत
पण दिवस रात्र जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसाना सध्या खूप नामुष्की पत्करावी लागत आहे. सण, उत्सव म्हटलं की बंदोबस्त हा आलाच मग तो उत्सव कोणताही असो दहीहंडी, मोहरम, ईद, गणेश चतुर्थी, नवरात्र यांत प्रामुख्याने महत्वाची भूमिका असते ती पोलिसाची, ज्याप्रमाणे घाण्याला जसा एखादा मजूर जुंपतो तसा पोलिस नामक सुरक्षारक्षक दिवसरात्र डोळ्यात तेल घालून नागरिक सुरक्षेतीततेची हमीपुर्वक आपली भूमिका इमानेइतबारे बजावत असतो, ध्येय एकच की उत्सवाला कुठे गालबोट लागू नये यासाठी तो प्रामाणिकपणे झटत असतो,
पण या उत्सव काळात मंडळाचे काही महाभाग विघ्नसंतोषी कार्यकर्ते असे असतात की ते उत्सवातील आनंदात विरझन टाकण्याचा कुटील प्रयत्न करून उत्सवाला गालबोट लावण्याचा घाणेरडा प्रकार करतात. शिवाय दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या गणेशभक्तांना सुद्धा उद्धट आणि असभ्यतेची वागणूक देतात तेव्हा कार्यकर्त्यांनी गणेशभक्तांची भाविकता लक्षात घेऊन त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे पण तसे न होता धक्काबुक्की, चेंगराचेंगरी इत्यादी अनुचित प्रकार घडताना दिसतात प्रसंगी भाविकांची लूटमार, कुणाचे पाकीट, कुणाचा मोबाईल, कुणाचे दागिने तर कुणाची पर्स इत्यादी प्रकारांना उधाण येते रांगेतील गणेश भाविक ही त्याला तितकेच जबाबदार आहेत. कारण आज अंधश्रद्धा इतकी बोकाळली आहे की बाप्पा नवसाला पावतो म्हणून बाप्पांच्या दर्शनासाठी पंधरा ते वीस तास रांगेत उभे राहणाऱ्या गणेशभक्तांना आपण नक्की कोणत्या शतकात वावरतो आहे याचेही भान नसते.
आणि ह्या गोष्टी इतक्या सराईत पणे घडतात की पोलिसांना देखील याची अंमलबजावणी करणे कठीण जाते शिवाय त्यांनाच या गोष्टीत टार्गेट केलं जातं तेव्हा संपूर्ण हयात जनतेसाठी खर्ची घालणाऱ्या पोलिसांच्या पदरी निराशाच का ? जनतेच्या रक्षणासाठी अनेक संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या पोलिसांना ना कसल्या सुविधा, ना कसल्या सोयी, कठपुतली प्रमाणे राज्यकर्ते नाचवतील तसे नाचायचे, कधी वेळेवर पगार नाही, कधी वेळेवर जेवण नाही, कुटुंब सोबत कधी फिरणे नाही.. धार्मिक उत्सवात तर पोलिसांना खूप वाईट प्रसंगांशी सामना करावा लागतो त्यात प्रामुख्याने श्री गणेश पाटपुजन, श्री गणेश आगमन, मौहरम, देवी उत्सव, दहीहंडी, रास्ता रोको आंदोलन, संप, मोर्चे, जातीय दंगली या माध्यमातुन कुठे काही
अनुचित गैर प्रकार घडू नयेत यासाठी डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत असतो इतक्या हाल अपेष्टा सोसून सुद्धा त्यांना समाजातून, उत्सव कार्यकर्त्यांकडून हीन दर्जाची वागणूक दिली जाते, सोशल मिडीया, प्रिंट मिडिया, सार्वजनिक उत्सवमंडळ कार्यकर्ते, राज्यकर्ते हे पोलिसांच्या नावानेच शंख करतात, दूषणं लावून मोकळे होतात आपण नुसते वर्षांतील ८ ते १५ दिवस सामाजिक आणि सार्वजनिक उत्सवातील कार्यकर्ते म्हणून मिरवतो पण वर्षातील ३६५ दिवस आपल्या साठी राब-राब राबणाऱ्या पोलिसाला मात्र आपण तुच्छ लेखतो.
खरंतर पोलिस जागा असतो म्हणून तर आपण सुखाने झोपतो हेही आपण विसरतो. तेव्हा उत्सवातील कार्यकर्त्यानी एक दिवस पोलिसी खाकी अंगावर चढवून पहावी आणि बंदोबस्तात ड्यूटी बजवावी म्हणजे कळेल की खाकी अंगावर चढवल्यावर किती महत्वाच्या जबाबदाऱ्या पाळाव्या लागतात, किती जणांच्या आदेशाचे पालन करावे लागते, कर्तव्य बजावताना किती संयम पाळावा लागतो ते.. पण ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी” तेव्हा ह्या गोष्टी आवाक्याबाहेरील असल्यामुळे आपण त्या टाळतो पण आपल्या सदसद्विवेकबुद्धीला ताण देऊन आपण महाराष्ट्रातील सुजाण नागरिक म्हणून पोलिसांना सन्मानपूर्वक आदर देऊन त्याच्या कर्तव्याला सलाम करून त्याला मानाचे स्थान दिले पाहिजे.
महेश्वर भिकाजी तेटांबे
(लेखक, चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार)
मोबाईल – 9082293867