‘घरोघरी शाळा’ उपक्रमास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट.
‘ग्रेट जॉब’ म्हणून दिली शब्बासकीची थाप.
संपूर्ण जगावर कोणाचे संकट कोसळले असताना आपल्या शाळेतील एक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गेल्या वर्षभरापूर्वी पासून (जुलै 2020) जि. प. प्राथमिक शाळा वडगावचे मुख्याध्यापक श्री.संजय लक्ष्मण खरात यांनी वडगाव ता. माण येथे राबवलेल्या 'घरोघरी शाळा' या उपक्रमास सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. शेखर सिंह साहेब, जि.प.साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा साहेब , जि. प. वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सचिन ओंबासे साहेब यांनी भेट देवून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली.
घरोघरी शाळा या उपक्रमा अंतर्गत खरात सरांनी घर व परिसरामध्ये केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीची पाहणी केली. घर व परिसरात केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मिती मुळे विद्यार्थी घर परिसरामध्ये हसत-खेळत कशाप्रकारे शिकतो याचे प्रात्यक्षिक पालकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना करून दाखवले. विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने सर्व विषयांचा अधिक सराव व्हावा म्हणून विद्यार्थ्याच्या अंगणात तयार करण्यात आलेल्या सापशिडी या खेळाचेही प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. विद्यार्थिनीच्या घरातच विविध शैक्षणिक तक्ते लावून तयार झालेली शाळा पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी संजय खरात यांच्या पाठीवर हात ठेवून ग्रेट जॉब म्हणून शाबासकीची थाप दिली.
भेटीदरम्यान वर्धा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे साहेब यांनी हातात खडू घेवून घर परिसरात निर्माण केलेल्या शैक्षणिक तक्तयावरील अक्षरांना स्वरचिन्हे जोडून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. इयत्ता पहिलीतील चिमुकलीने अचूक व आत्मविश्वासपूर्वक दिलेली उत्तरे पाहून उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी कौतुकाने हसून तिला दाद दिली.
घरोघरी शाळा उपक्रमाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्व मान्यवरांनी घरोघरी शाळा उपक्रमाचा निरोप घेतला.