संसदरत्न खासदार डाॅ अमोलदादा कोल्हे यांचे बैलगाडा मालकांच्या ऒझर येथील बैठकीचा आढावा
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठीचे आंदोलन नेमके कोणत्या दिशेने चालले आहे. याची माहिती देण्यासाठी ओझर भक्त भवन येथे अखिल भारतीय बैलगाडा संघटना, जुन्नर तालुका बैलगाडा संघटना व सर्व तालुक्याच्या बैलगाडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक काल (१४ ऑगस्ट) रात्री उशिरा संपन्न झाली. अत्यंत तातडीने बोलाविलेल्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो.
बैलगाडा शर्यतबंदी उठविण्याच्या आंदोलनामध्ये कोणताही श्रेयवाद नको, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामुहीक प्रयत्नातून हा लढा यशस्वी करायचा आहे. त्यासाठी माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना देखील बैठकीला येण्यासाठी फोन करून विनंती केली. त्यांनी पाठपुरावा केला आहे. याबाबतचा प्रदिर्घ अनुभव आहे. तुम्ही मार्गदर्शन करा.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यासाठी ५ न्यायाधिशांच्या सदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी एटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांची वेळ घेऊन भेट घेणार आहे. बैल हा प्राणी संरक्षक प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केंद्रीय पशू संवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. माजी पशु संवर्धन मंत्री गिरीराज सिंह हे माझ्यासमवेत मंत्री रुपाला यांना भेटणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीसाठी वेळ घेत आहे.
संसदेत आणि मंत्री मंडळापुढे बैलगाडा मालकांची भूमिका प्रमुख चार मुद्दे घेऊन मांडणार आहे. शर्यत ही आमची संस्कृती आहे. पाळीव पशू गणनेची आकडेवारीतील तफावत दाखवणार आहोत. देशी गोवंश रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी असताना संख्या का घटतेय. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. तसेच आतंरराष्ट्रीय पर्यटनाची संधी आहे. यासाठी केंद्र सरकारकडे बैल संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळा ही आग्रही मांडणी करतोय.
आंदोलन करायचे आहे पण नेमके कोणा विरोधात करायचे. आपला आवाज नेमका कोणाच्या कानापर्यंत गेला पाहीजे. अचूक वेळ आणि अचूक ठिकाण ठरविण्यासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले पाहीजे. महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीला पोहोचली पाहीजे. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी वाट्टेल ती राजकीय किंमत मोजायला तयार आहे. काहीही झाले तरी चालेल पण जनतेला दिलेल्या शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन हे विघ्नहर्ता गणरायांच्या साक्षीने सांगतो.
या बैठकीला आमदार श्री. अतुल बेनके, आमदार श्री. संजयकाका जगताप, आमदार श्री. सुनील शेळके, श्री. देवदत्त निकम, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेगाव, श्री. विवेक वळसे पाटील (बंटीदादा), जिल्हा परिषद सदस्य, श्री. नवनाथ होले माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, श्री. देवराम लांडे, जिल्हा परिषद सदस्य, श्री. मोहित ढमाले जिल्हा परिषद सदस्य, श्री. विशाल तांबे सभापती, श्री. दत्तात्रय गायकवाड महाराष्ट्र केसरी, श्री. आबाराजे भोसले सांगली, श्री. सत्यशील शेरकर, चेअरमन, विघ्नहर सहकारी साखर कारखाना, श्री. संतोष गव्हाणे, श्री. विश्वास भुजबळ, सर्व तालुक्यातील बैलगाडा संघटनांचे पदाधिकारी प्रमुख गाडा मालक आणि गाडा शौकीन शेतकरी उपस्थित होते.







