देवस्थान वाढू दिले नाही, याच रागातून रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात “नारळ” फिरवला?
जेष्ठ पत्रकार रजनिश राणे यांचे मनोगत
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
युती का झाली नाही? दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर उभे का ठाकले? पूर्वी आम्ही नारायण राणे यांचे कार्यकर्ते, पक्ष नंतर असे हजारोजण अभिमानाने सांगायचे. मात्र आता कार्यकर्त्यांमध्येच दोन गट पडले आहेत. सिंधुदुर्गातील राजकारणाची अशी शकले होण्याची कारणे काय?
याची कारणे रवींद्र चव्हाण पालकमंत्री होते त्या काळात दडलेली आहेत. सिंधुदुर्गातील गावापासून झेडपीपर्यंत बहुतांशी सर्व सत्तास्थाने नारायण राणे यांच्या ताब्यात आहेत, होती. त्यामुळे जिल्हा विकासाचा निधी कुणाला किती द्यायचा याचा निर्णय राणे हेच घेत असत. नारायण राणे कधीकाळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते तेव्हा हक्क आणि अधिकार ही दोन्ही आयुधे वापरून ते कारभार करत असत. मात्र नंतर राजकारण बदलत गेले. सत्तास्थानावरील माणसे बदलत गेली. रवींद्र चव्हाण, उदय सामंत हे पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गात आले आणि तिथेच संघर्षाची ठिणगी पडली.
रवींद्र चव्हाण हे कट्टर भाजपवाले. त्यामुळे त्यांनी आपल्या या जिल्ह्यात आपला पक्ष वाढविण्यास सुरुवात केली. पालकमंत्री म्हणून काही अधिकार गाजवण्यास सुरुवात केली. तशात त्यांचा अनिकेत नामक खास सहाय्यक जिल्ह्यात येऊन बैठका घेत होता, प्रशासनाशी चर्चा करत होता, निर्णय घेत होता. मात्र हीच गोष्ट राणे यांना खटकली. सिंधुदुर्गात त्यांना दुसरे देवस्थान वाढू द्यायचेच नव्हते आणि ते भविष्यातील राजकारणासाठी परवडणारेही नव्हते. त्यातूनच मग उभी राहिली राणे विरुद्ध चव्हाण अशी एक संघर्ष गाथा! उदय सामंत पालकमंत्री असतानाही थोड्याफार फरकाने हाच संघर्ष होता, पण सामंत यांच्यामुळे रत्नागिरीत आपले देवस्थान अधिक ठामपणे स्थापित होत नाही हा राणे यांना राग अधिक होता. राणे विरुद्ध चव्हाण आणि सामंत हा उघड गुपितासारखा सुप्त संघर्ष सुरूच होता…सुरूच राहिला!
चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नगरपरिषद निवडणुकीची संधी साधून त्यांनी डाव टाकला आणि शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांची युती होऊच नये अशी खेळी केली. यामुळे दोन राणे बंधू एकमेकांसमोर उभे ठाकणार, कुणाच्या बाजूने प्रचाराला जावे या विचाराने नारायण राणे घरीच थांबणार, नितेश राणे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार, राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडणार अशी गणिते या राजकीय खेळीत होती आणि त्याबरहुकूम होऊ घातलेली युती झालीच नाही.
भाजप अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनशी (शिंदे) युती करून फक्त २० जागा लढवत आहे. म्हणजे उदय सामंत आणि चव्हाण यांचे कसे राजकीय गॅटमॅट आहे याचा अंदाज येऊ शकतो. शिवाय रत्नागिरीत सामंत यांची ताकद, त्यांचा प्रभाव मोठा आहे हे भाजपने कबूल केल्याची प्रचितीही येते. मग सिंधुदुर्गातच असे काय घडले की युती झाली नाही? जे तेली, ज्यांच्यावर राणे कुटुंबाचा प्रचंड राग आहे, त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी अधिक आग्रही कोण होता? नीलेश राणे कणकवलीत येतात, तेली यांच्या बंगल्यावर जातात, पण समोरच असलेल्या आपल्या घरी जात नाहीत…का? एवढी टोकाची संघर्षरेषा कुणी आखली आहे?
न वाढू दिलेल्या देवस्थानात अशी ढोलार काठी वाजू लागली आहे. सिंधुदुर्गातील एका नव्या राजकीय संघर्षाची ही सुरुवात आहे. जुनी समीकरणे विस्कटणार आहेत, नवी जुळणार आहेत.
थ्री इडियट या सिनेमातील तो संवाद तुम्हाला आठवतो का?…” बोल वोह रहा है, लिखा मैने है!”…
एकनाथ शिंदे यांना चव्हाण यांच्याशी असलेला कल्याण डोंबिवलीचा हिशेब चुकता करायचा आहे. म्हणून निलेश यांच्या निशाण्यावर चव्हाण आहेत. संदर्भ तोच/ थ्री इडियट मधील संवाद.
२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असे बेधडकपणे चव्हाण कसे बोलू शकतात? एकतर त्यांचा तो स्वभाव नाही आणि तेवढी आक्रमक शैलीही नाही. मुंबई आणि दिल्लीहून सांगावा असल्याशिवाय हे असे बोलणे होणार नाही. संदर्भ तोच/ थ्री इडियट मधील संवाद.
मालवणीत एक म्हण आहे…
बाबा पंढरपूराक गेलो आसा. इलो तर गंगापूजनाचे वडे मिळतले…आणि नाय इलो तर त्याच्या तेराव्याचे मिळतले..म्हणजे वडे हे मिळतलेच!
निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार हे महत्त्वाचे नाही… न वाढू दिलेल्या देवस्थानात आता पुन्हा शिवकळा येणार हे पक्षश्रेष्ठींसाठी महत्त्वाचे आहे.
तोपर्यंत आपण फक्त बघत रहायचे धृतराष्ट्रासारखे…फरक इतकाच की आमच्या डोळ्यांवर काळा गॉगल नाही!!







