निष्ठावंत कवडीमोल
गद्दार रिटर्न अनमोल!
ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
प्रत्येक पक्षात आयाराम गयाराम असतात. ही संधी साधू माकडं त्यांच्या सोयीनुसार या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. पक्ष सोडताना ते नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहून, अन्याय, दुजाभाव, आडवे येणारे बडवे, अशी सोयीस्कर कारणे सांगून पक्षाला लाथ मारून तंगड्या वर करून जातात. या माकडांचे नव्या पक्षात नवलाईने आगत स्वागत होते. अमक्या पक्षाला खिंडार पडले, तमक्या नेत्याला चित्तपट केल्याच्या बातम्या पेरल्या जातात. त्याचवेळी ज्या पक्षातून ते फुटले ते या माकडांचा उद्धार करतात. गद्दार म्हणून हिणवतात, वडा पाव – सूप पासून सगळे काढतात. काही वेळा फोटोला चपला मारतात, फोटो जाळतात. दुसरीकडे स्वागताच्या कमानी उभारतात, पक्षाची ताकत वाढल्याच्या वल्गना होतात. हे संधीसाधू बगळे आपल्याला हवी ती शिकार ( पद, पैसा, पेटी, खोके व उमेदवारी ) मिळवतात. दुसरीकडे निष्ठेने पक्षासाठी आयुष्य वेचणारे नेत्यांच्या खिजगणतीत ही नसतात.
एकनाथ शिंदेनी गद्दारी केली, पक्ष फोडला, पाठीत खंजीर खुपसला, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, बाप चोरला असा शिमगा करणारे आत्ता त्याच्या सोबत गेलेल्या गद्दारांना वाजत गाजत धूमधडक्यात प्रवेशाचे सोहळे करीत आहेत. गेले तीन साडेतीन वर्षे ज्यांनी गद्दारनाथाची साथ दिली, शिवसेना संपवण्यात हातभार लावला, तेही शिंदे इतकेच दोषी नव्हे गुन्हेगार ठरतात. मात्र ऐन निवडणुकीत निव्वळ तिकिटाच्या लालसेने परत आलेले हे गद्दार एका क्षणात खुद्दार होतात ? “वाट चुकलेले, मोहात अडकलेले, त्यांचे डोळे उघडले!” असे म्हणत पुन्हा शि बंधन बांधून त्यांना प्रतिष्ठा मिळत असेल तर निष्ठावंतांनी मोठी चूक केली असेच म्हणावे लागेल. पक्षावर दुगुण्या झाडून जाताना जे विकले गेले, ज्यांनी निष्ठेची विष्ठा केली, त्या ढोंगी लोकांच्या,पश्चातापाच्या भुलथापांवर विश्वास ठेवून पुन्हा पक्ष प्रवेश दिला जात असेल तर तो गेली साडेतीन वर्षे कोणत्याही अमिषाना बळी न पडलेल्या, अंगारवर केसेस घेतलेल्या व दहशतीला न जुमानता निव्वळ बाळासाहेब व दिघेसाहेबांवरील निष्ठेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिली, पद, पैसा, उमेदवारीची तमा न बाळगता शिवसेना या चार अक्षरांसाठी जीव ओवाळून टाकला, साथ सोडली नाही अश्या निष्ठावंतांचा तों घोर अपमान नाही का? एकीकडे “मला तुम्हाला देण्यासारखे काही नाही” म्हणणारे उद्धव ठाकरे, तर दुसरीकडे मागाल ते मिळेल म्हणणारे एकनाथ शिंदे यातून ज्यांनी उद्धव ठाकरे यांना विनाअट साथ दिली ते आज म्हणतात, हेच फळ काय मम निष्ठेला?
एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात तुम्ही सुरुंग पेरला परंतु या सुरुंगातील दारू फुसकी निघाली तर काय करणार ? बदलापूर निवडणुकीत पाच जणांनी आपला AB फॉर्म घेतला, चिन्ह मिळवले, आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आपण त्यांचे काय उखडले ? अंबरनाथ निवडणुकीत आपल्या दोन अधिकृत उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन शिंदे सेनेचा अडसर दूर केला, काय कारवाई केली? त्यांना उमदेवारी देण्याची शिफारस करणाऱ्या स्थानिक नेत्यांवर कोणती कारवाई केली ? कल्याण उल्हासनगर व अंबरनाथची शिवसेना शिल्लक सेना झाली आहे. काय कारवाई केली हितसंबंधितांवर? गेले ते जाऊ द्या, फरक पडत नाही, हे धोरण कितपत योग्य आहे. आज अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याण मध्ये किती सक्षम उमेदवार शिल्लक आहेत. अंबरनाथ मध्ये आपल्याला ५९ वार्डातून फक्त २५ उमदेवार मिळतात, इतर ३४ वार्ड रिकामे, उल्हासनगर महापालिकेतील २५ पैकी दोनच नगरसेवक शिल्लक उरले आहेत. ७८ वार्डात आमच्याकडे उमेदवारच नाहीत. इतर पक्षातून आयात कराल तरी ७८ उमेदवार मिळणार नाहीत. जे आहेत ते तरी सक्षम आहेत का ? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे.
आपल्या स्थानिक नेतृत्वाकडे माणसं पारखण्याची बुद्धीच नाही. दिपेश म्हात्रेच्या प्रवेशावेळीच मी विरोध व्यक्त केला होता. हा फिरता चषक आठ महिनेही टिकला नाही. उद्धव साहेबांनी त्याचे त्याच्या लावाजम्यासह जंगी स्वागत केले, गुरुनाथ खोत व विनायक राऊत तर नसलेली छाती ५६ इंच फुगवून मोठी शिकार मारल्याच्या अविर्भावात वावरत होते. शेवटी त्याच दिपेश म्हात्रेने टांग दिली, काय उखडले त्याचे? उलट दिपेश म्हात्रेला पक्षात प्रवेश दिल्याने किती तरी निष्ठावंत दुरावले.
उल्हासनगर मध्ये राधाचरण करोतिया या पूर्वाश्रमिच्या काँग्रेस अध्यक्षास प्रवेश देत निष्ठावंताना डावलून थेट महानगर प्रमुख पद बहाल केले. कुलवंतसिंह बैस याला शहर प्रमुख पद दिले, शिवसेनेशी गद्दारी करून गणेश नाईकांसोबत राष्ट्रवादीत २० वर्षे राहिलेल्या भीमसेन मोरेला थेट अंबरनाथ विधानसभेचे उप जिल्हा प्रमुख पद दिले. त्याचवेळी डॉ.
जानू मानकर,सुरेश पाटील, शिवाजी जावळे अनिल भोईर,रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे आदिना डावलले.अखेर करोतिया, भैस हे काही महिन्यातच तंगडी वर करून निघून गेले. आमचे नेते हताशपणे पाहत राहिले.
आज शिवसेनेत निष्ठावंताना कवडीमोल किंमत आहे तर पक्षाशी गद्दारी करून निर्लजपणे परतणाऱ्या माकडांची किंमत अनमोल आहे. मी ५३ वर्षे शिव सैनिक आहे. गेल्या साडेतीन वर्षात मी एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात राहून धारदार लेखणी व वाणीने त्यांचा समाचार घेत आहे. “गद्दारांना क्षमा नाही” हा खळबळजनक लेख संग्रह स्वतः दीड लाख खर्च करून प्रकाशित केला. त्यावरून माझ्यावर गुन्हा ही दाखल झाला. सातत्याने लेखणीने त्यांच्या गद्दारीवर प्रहार करीत असतो. परंतू पक्ष प्रमुखांना मी मागितलेली वेळ द्यायची गरज भासली नाही, त्याच वेळी गद्दारांचे पक्ष प्रवेश सोहळे मातोश्रीच्या दारात होत आहेत. मी या आधीच स्पष्ट केले आहे कि, मला मातोश्रीचे अप्रूप नाही, १९७५ पासून मी मातोश्री पाहत आलो आहे. उद्धव ठाकरे यांना पहिले नाही असेही नाही, ते मला व्यक्तिशः ओळखतात. तरी गेल्या दीड वर्षात त्यांनी मला टाळले. माझा वैयक्तिक स्वार्थ नाही, मागणी नाही, अपेक्षा तर मुळीच नाही. मी माझ्या आयुष्यातील ५३ वर्षे शिवसैनिक म्हणून स्वाभिमानाने जगलो आहे. निष्ठावंतांच्या वतीने त्यांचे मनोदय व्यक्त करीत आलो आहे. त्यांच्या भेटीमागे पक्ष हिताचे काम होते. आत्ता भेटीचे प्रयोजनही उरलेले नाही, गनीमांना जे नुकसान करायचे होते ते करून झाले आहे. मी माझा स्वार्थ कधीच पहिला नाही. पक्ष हिताला महत्व दिले, त्यासाठी अनेकांशी पंगाही घेतला. विनायक राऊत, गुरुनाथ खोत व जिल्हा प्रमुख मला अस्पृश्य मानतात, पक्षाच्या कोणत्याही कामात सामावून घेत नाहीत. मी त्यांना अवघड जागेचे दुखणे वाटतो. मी कंटाळून पक्ष सोडावा हीच त्यांची इच्छा आहे. परंतु त्यांची ही मनोकामना कधीच फलद्रूप होणार नाही. त्यामुळे त्यांची गोची होत आहे. माझे विचार पचत नसतील तर मला काढून टाका, असे मी म्हणतो. मी आहे तो असाच आहे. त्यामुळे गद्दारांना कवटाळण्या पेक्षा हजारो निष्ठावंत शिव सैनिकांची कदर करा. “गद्दारांना क्षमा नाही” म्हणत होतात, आत्ता गद्दारांना जवळ करून संकट काळात निष्ठेने साथ देणाऱ्यांवर (त्यांचे तिकिट कापून) अन्याय करू नका.
कारण जे गद्दार पुन्हा येत आहेत ते उमेदवारीची हमी मिळाल्यावरच पक्ष प्रवेश करीत आहेत. मग संकट काळात निष्ठेने टिकून राहिलेल्या निष्ठावंतांच्या मनोरथांवर नांगर फिरवू नये.


