विकतच्या भाडोत्री गर्दीला शक्ति प्रदर्शन म्हणणारे उमेदवार !
*शज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
निवडणूकीची उमेदवारी मिळालेले भाग्यवान जोमात तर नाकारलेले कोमात गेलेत. “हेची फळ कायमम तपाला ?” म्हणत निष्ठावंत कपाळ बडवून घेत आहेत,आपला संताप- बंडखोरी, पत्रकार परिषदांतून व्यक्त करीत आहेत.पुर्वीपण बंड व्हायचे परंतू श्रेष्ठींंचा धाक असल्याने बंडोबा थंडोबा होत व दिलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला लागत. आजची परिस्थिती वेगळी आहे. राजकारणात १००% अर्थकारण शिरले आहे.पुर्वी राजकारण हे समाजसेवेच्या भावनेने केले जायचे.त्यात स्वार्थ नसायचा तर सेवाभाव असायचा.८०टक्के समाजकारण करता यावे म्हणून २० टक्के राजकारणात सहभाग असायचा. पक्ष निष्ठा त्याची ध्येय्य धोरणं व तत्वांसाठी वाट्टेल तो त्याग करणारे राजकारणी होते.
अलिकडचे उदाहरण म्हणजे बाळासाहेबांच्या एका ओळीच्या चिठ्ठीवर मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणारे मनोहरपंत कुठे आणि मुख्यमंत्री पदासाठी भाजपासारख्या पक्ष द्रोह्यांची विष्ठा चाटणारे कुठे ?
पुर्वी समाजसेवक राजकारणात भाग घेत व व्यावसायिक वा सधन लोक त्यांना आर्थिक मदत करीत. कार्यकर्ते पगारी वा बिनपगारी रजा घेऊन आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत. जणू काही ते स्वत:च उमेदवार आहेत, अशी त्यांची भावना असायची. वडा पाव अथवा मतानाच्या दिवशी बटाट्याची पिवळी भाजी व पु-या याने ते समाधानी असत. विजया नंतरचा जल्लोष थरारक असे त्याकाळी डिजे तर नव्हताच. गुलालाची उधळण व ढोल ताश्याच्या नादावर थिरकणारे पाय सर्व आसमंत दुमदुमुन टाकत असे. माता भगिनी विजयी वीरांप्रमाणे त्याची ओवाळणी करीत. पैसे वाटून मतं मिळविण्याची गरज नसे. उमेदवाराची सचोटी,त्याचे कर्तृत्व व पक्षनिष्ठा यावरच मतदार मतदान करीत असत.
या सुवर्ण काळाचा मी साक्षिदार आहे. मुंबईच्या महापौरांच्या निवडणूकीचा निकाल ऐकण्यासाठी परळच्या गल्लीतील फुटपाथवर रात्रभर प्रतिक्षा करणारे आम्ही, लोकसभा निवडणूकीत वा विधान सभा निवडणूकीत तन-मनाने झटणारे आम्ही धनाच्या बाबतीत मात्र आम्ही कंगाल होतो. विनातिकिट प्रवास करून रेल्वे स्टॉलवरील ( लुटलेला ) वडा वा खारी खाऊन फुकटचे पोटभर पाणी ( त्यावेळी बिसलरीच्या नावाने पाण्याचा बाटलीबंद व्यापार नव्हता तर ठिकठिकाणी पाणपोई असत ) पिऊन निवडणूक प्रचारातल भाग घेत असू. उमेदवार जिंकला तर जल्लोष व पराभूत झाला तर सुतकी वातावरण ! पराभव पचवणे जड जात होते.
मी १९९२ व १९९५ च्या दोन निवडणूका लढलो व जिंकलोही. १९९७ च्या निवडणूकीत अत्यल्प ( २५) मतांनी पराभूत झालो ते घरभेद्यांमुळे. या वेळी तिकिटासाठी स्पर्धा असली तरी ती जीवघेणी नव्हती. उमेदवारी मिळेपर्यंत स्पर्धा नंतर मात्र एकदिलाने निवडणूक लढण्याची मानसिकता होती.मी ज्या प्रभागातून उमेदवारी मागत असे त्या प्रभागातील इच्छूकांना दिघे साहेब सरळ सांगत, अरे तिथे दिलीप आहे, दुस-या प्रभागात माग ! त्याचे कारणही ते सांगत परंतू ते येथे सांगण्यासारखे नाही. हा सिलसिला तिन्ही निवडणूकीत सुरू होता.
१९९७ साली महापालिकेची पहिली निवडणूक होती.OBC प्रवर्गासाठी महापौर पद राखीव होते. मी त्याच प्रवर्गातील प्रभागातून उमेदवार होतो.या पुर्वी दोन वेळा मी निवडून आलो असल्याने व १९९५ ला विरोधापक्ष नेता म्हणून नगर पालिका गाजवल्याने मी निवडून आलो तर प्रथम महापौर होणार ! हे नक्की होते. परंतू माझ्या स्पष्टवक्तेपणाचा व सचोटीचा धसका घेतलेल्या पक्षांतर्गत विरोधकांनी माझ्या विरोधातील अपक्ष उमेदवारास मतदान घडवून व माझी ९३ मतं बाद करून मला पराभूत केले.अशा या एकतर्फी लढतीत मला अवघ्या २५ मतांनी पराभव पत्करावा लागला होता.त्यावेळी विजयी उमेदवारा ऐवजी माझ्या पराभवाचीच शहरात चर्चा होती. संपुर्ण प्रभागात सुतकी वातावरण होते.कित्येक घरात चुली पेटल्या नव्हत्या. सर्वत्र रडारड होती. त्यांची समजूत घालता घालता माझ्या नाकी नऊ आले होते.
त्याकाळी निवडणूका खर्चिक नव्हत्या. माझ्या पहिल्या निवडणूकीत मला अवघे १५ हजार इतका खर्च आला होता. त्यातही माझा अंबरनाथ येथील मित्र कै. राजेंद्र चव्हाण याने बळजबरीने ५ हजार रूपये घरी देऊन गेला होता. दुस-या निवडणूकीत माझा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने मी कोणी घरचा उमेदवार न देता श्रीमती सुलभा परांजपेंचे नाव सुचवले व मी ज्या प्रभागात १९९२ च्या निवडणूकीत शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती त्या प्रभातून निवडणूक लढविण्याचे आव्हान स्विकारले व १९९२ साली ज्याने शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले होते त्याला पराभवाची धुळ चारून दिमाखात विजयी झालो होतो. सदर निवडणूकीत दोन्ही प्रभागांसाठी २५ हजार रूपये इतका खर्च आला होता व मी व परांजपे बाई दोघेही निवडून आलो होतो.
१९९७ पासून निवडणूकीत मात्र पैश्यांचा वारेमाप वापर सुरू झाला. गोपाल राजवानी या कुख्यात डॉनने स्वत:च्या मुलीला महापौर पद मिळावे म्हणून त्या अपक्ष उमेदवारास मॅन व मनी पॉवर दिली व ७ लाखांची खैरात केली. २५० इतके बोगस मतदान घडवून आणले. परंतू ना गोपाल राजवानीची मुलगी महापौर झाली ना मला पराभूत करण्यास कारणीभूत असलेल्या पैकी कोणी आजवर महापौर झाले. ना कधी भविष्यात होतील.
हे सर्व आठवण्याचे कारण सद्या तिकिट मिळवण्यासाठी चाललेली साठमारी व पैश्याची सौदेबाजी ! या वर मी “गोलपिठा” हा लेख लिहिलेला आहे. निष्ठेची विष्ठा झाली आहे व ती चाटणारे “यशस्वी” होत आहेत.सर्व पक्षीय निष्ठावंत आज उपेक्षित आहेत. दशकानुदशके निष्ठेने राहणा-या कार्यकर्त्यांवर निवडणूकीच्या तोंडावर बेडूक उड्या मारणारी माकडं मात करून उमेदवारी पळवत आहेत. अगदी निष्ठावंतांना वाकुल्या दाखवत. निष्ठावंतांचा आवाज श्रेष्ठींपर्यंत पोहचू न देण्याचे कर्तव्य या गद्दार संधीसाधूंचे सर्वपक्षीय “भडवे” करीत असतात. त्यामुळे निष्ठावंतांना तोंड दाबून बुक्यांचा मार तोही पार्श्वभागावर सहन करावा लागत आहे.
आजची निवडणूक अफाट खर्चिक झाली आहे. पुर्वी निष्ठावंताना सन्मानाने तिकिट मिळत असे व निवडणूकीसाठी निधीही उपलब्ध करून दिला जात असे. आत्ता उमेदवारी मिळवण्यासाठी २ कोटी ते १५ कोटीची बोली लावली जाते. इ्च्छूक उमेदवारांना देवळा बाहेरील भिक्षुकांसारखे वागवले जाते. आपल्या मतदार संघातील अनभिषिक्त सम्राट, कार्यसम्राट? मुख्यालयाबाहेर कित्येक दिवस याचकासारखे ताटळत असताना दिसतात. शेवटी जास्त बोली लावणा-यांच्या झोळीत उमेदवारीची भीक पडते. मग हे विजयी वीरांप्रमाणे जयघोष करत आपल्या मतदार संघात येतात. सेटिंग बिटींगला सुरूवात होते. मग “चला फॉर्म भरायला” असे फतवे निघतात. वास्तविक फॉर्म भरायला उमेदवार, सुचक, अनुमोदक व पक्षाचे दोन नेते असले तरी पुरेसे असते. परंतू आजच्या राजकारण्यांना शक्ति प्रदर्शनाचा दुर्घर रोग जडला आहे. पाच फुटाचा राजकारणी टॉवर एवढे बॅनर होर्डिंग लावतो. फॉर्म भरायला व सभांना दोनशे ते पाचशे रूपयांची खैरात वाटून गर्दी जमवली जाते. ही भाडोत्री गर्दी हीच यांची शक्ति. विधान सभा निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख असली तरी ती महापालिकेच्या एका प्रभागासही अपुरी पडते.फॉर्म भरायला येणा-या लोकांना दिली जाणारी रक्कम व जेवणावळी यातच लाखो रूपये बर्बाद होतात.
प्रत्येक मतदारासंघात किमान १५ कोटी ते ५० कोटी खर्च केले जातात. ही गर्दी ज्याला हे लोक शक्ति म्हणतात, ती प्रत्येक उमेदवाराच्या रॅलित वा सभेत असते. सद्या माणसं भाड्याने पुरवणा-यांची चलती आहे. वास्तविक हा शक्ति प्रदर्शनाचा फार्सच वांझोटा आहे. पण सत्तांध लोकांना हे कोण सांगणार ? त्यांना हे सांगणारा मी ब्लॅकलिस्टेड होतो व तळवे चाटणारे विष्टावंतांना डोक्यावर घेऊन मिरवले जाते. सद्याची निवडणूक ही लोकशाहीवर बलात्कार करणारी प्रवृत्ती आहे. मी कितीही कंठशोष केला तरी ते उपड्या घड्यात पाणी भरण्याचा मुर्खपणा ठरणारे असेल, हे पक्के ठाऊक असूनही मी तो मुर्खपणा करण्यात स्वत:ला धन्य मानतो. कारण मी चाटुकार नाही तर खराखुरा पत्रकार आहे, याचे मला जे समाधान लाभते ते ५० खोक्यांपेक्षा जास्त मोलाचे आहे.


