‘हजामती’ शब्दावर नाभिक समाजाचा उद्रेक!
जयंत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा काळे फासण्याचा इशारा
महाराष्ट्र राज्य नाभिक सेना थेट इशारा; संयमाची सीमा संपली
त-हाडी ( प्रतिनिधी )
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील नाभिक समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘पोलीस हजामती करत होते का?’ असा उल्लेख करत जयंत पाटील यांनी वापरलेला शब्द नाभिक समाजाचा अवमान करणारा आणि आक्षेपार्ह असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेने तीव्र निषेध नोंदवला आहे.
जयंत पाटील यांनी राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना ‘हजामती’ हा शब्द वापरला. हा शब्द केवळ असंसदीय नाही तर परंपरागत नाभिक समाजाच्या व्यवसायाची अवहेलना करणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, सभागृहात मंत्री संजय सावकारे यांनी या शब्दावर आक्षेप घेतल्यानंतरही जयंत पाटील यांनी तो शब्द मागे घेण्यास नकार दिला आणि ‘मंत्री झाला म्हणून लय कळत नाही’ असा टोला लगावला. यामुळे प्रकरण अधिक चिघळले आहे.
‘हे पहिल्यांदाच नाही’– महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेचा गंभीर आरोप
महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश मोरे यांनी तीव्र शब्दातील प्रतिक्रियेत म्हटले आहे की, जयंत पाटील यांनी याआधीही नाभिक समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. यावरून हे वक्तव्य चुकून नाही, तर जाणीवपूर्वक आणि सातत्याने नाभिक समाजाचा अपमान करण्याच्या मानसिकतेतून केलेले दिसते, असा आरोप गणेश मोरे यांनी केला आहे.
जाहीर माफी नाही तर आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की,
जयंत पाटील यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी तसेच त्यांच्या पक्षातील कोणताही नेता किंवा पदाधिकारी यापुढे नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरणार नाही, याची लेखी व जाहीर कबुली द्यावी.
जर ही मागणी मान्य केली नाही, तर जयंत पाटील यांचा तीव्र निषेध करत सार्वजनिक ठिकाणी काळे फासण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) विरोधात राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवली जाईल, असा थेट इशारा महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेने दिला आहे.
‘संयम सुटला आहे’ – नाभिक समाजाचा इशारा
सभागृहात प्रशासनावर टीका करताना वापरले जाणारे शब्द समाजघटकांच्या आत्मसन्मानावर घाव घालू शकतात, याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे, असा सूर नाभिक समाजाने लावला आहे. ‘मंत्री झाला म्हणून लय कळत नाही’ या विधानावर जितका राजकीय गदारोळ झाला, त्याहून अधिक ‘हजामती’ शब्दामुळे सामाजिक असंतोष उफाळून आला आहे.नाभिक समाज हा मेहनती, स्वाभिमानी आणि शांतताप्रिय समाज आहे.
मात्र आमच्या व्यवसायाची आणि अस्तित्वाची वारंवार टिंगल सहन केली जाणार नाही. आता संयमाची मर्यादा संपली असल्याचे स्पष्ट करत जयंत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेचे अध्यक्ष गणेश मोरे , राज्य उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड , प्रसिद्ध प्रमुख महेंद्र खोंडे त-हाडी
महाराष्ट्र राज्य नाभिक सेना .चंद्रशेखर जगताप . किरणजी भांगे .सुधिरभाऊ गाडेकर . कृष्णा आतकर . सचिन गायकवाड . समाधान राऊत .सुनिल कावरे .गणेश खामकर लक्ष्मण माठे .वनिताताईं भालेकर .सावित्री सुर्यवंशी .कमल गायकवाड
उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष सोनल खोंडे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांचा महाराष्ट्र भर जाहीर निषेध वक्त होत असून सोशल मिडीयावर त्यांना ट्रोल केले जात आहे. लवकरच नाभिक समाजातर्फे नवा कोरा वस्तारा जयंत पाटील यांना भेट दिला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेने जाहीर केले आहे.


