कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचे ‘नमो’चे पैसे बंद होणार ? ग्रामीण भागात चर्चांना उधाण; शेतकरी संभ्रमात
केसरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे हप्ते बंद होणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाकडून याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांवर कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचे नमो योजनेचे पैसे थांबविले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या खात्यांची, लाभार्थी यादीची तसेच कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. या चर्चेमुळे ग्रामीण भागात संभ्रम आणि चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कर्जमाफी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजना वेगवेगळ्या उद्देशाने राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ कर्जमाफीचा लाभ घेतला म्हणून नमो योजनेचा लाभ बंद होणार असेल, तर शासनाने त्याबाबत स्पष्ट निकष जाहीर करावेत. तसेच शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने तातडीने अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करावे, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.


