ढगाळ वातावरणाचा दुहेरी फटका; शेती धोक्यात,पिकांवर रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव; नागरिकांचे आरोग्यही संकटात… डेंग्यू, मलेरिया, व्हायरल तापाचा धोका वाढला
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात सततचे ढगाळ वातावरण, हवेत वाढलेली आर्द्रता आणि अधूनमधून पडणारा हलका पाऊस यामुळे राज्यातील अनेक भागांप्रमाणेच ग्रामीण भागातही शेती आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सूर्यप्रकाशाचा अभाव आणि दमट हवामानामुळे पिकांमध्ये विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून नागरिकांमध्येही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कृषी व आरोग्य विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ढगाळ वातावरणामुळे मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग, कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी, डाळिंब, द्राक्ष, केळी यांसारख्या पिकांना मोठा धोका निर्माण होतो.
मका पिकात लष्कर अळी, सोयाबीनमध्ये खोडमाशी, चक्रभुंगा, पाने गुंडाळणारी अळी, कापसात मावा, तुडतुडे, पांढरी माशी व बोंडअळी, तर भाजीपाला पिकांमध्ये करपा, भुरी, डाऊनी मिल्ड्यू, फळकूज यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. सततच्या ओलाव्यामुळे मुळांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, फुले व फळगळ वाढते आणि उत्पादनात घट येते. कृषी तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी दररोज शेताची पाहणी करून रोग किंवा किडीची सुरुवातीची लक्षणे दिसताच कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची फवारणी करावी.
शेतात पाणी साचू देऊ नये, तण नियंत्रण करावे आणि संतुलित खत व्यवस्थापनावर भर द्यावा. ढगाळ आणि दमट वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. अशा हवामानात सर्दी, खोकला, व्हायरल ताप, घसा दुखणे, न्यूमोनिया, दमा वाढणे, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉईड, अतिसार, त्वचारोग व डोळ्यांचे संसर्ग वाढण्याची शक्यता असते.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने स्वच्छ पाणी पिणे, शिळे अन्न टाळणे, परिसरात पाणी साचू न देणे, डासांपासून संरक्षण करणे, हातांची स्वच्छता राखणे आणि ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
ढगाळ वातावरणात धोक्यात येणारी प्रमुख पिके – मका- सोयाबीन- कापूस- तूर- मूग, उडीद- भुईमूग -कांदा- टोमॅटो, मिरची, भेंडी- डाळिंब, द्राक्ष, केळी. संभाव्य आजार – व्हायरल ताप- सर्दी-खोकला- डेंग्यू- मलेरिया- चिकुनगुनिया- लेप्टोस्पायरोसिस- टायफॉईड- अतिसार- त्वचारोग – श्वसनाचे आजारही होऊ शकतो.


