आटपाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 69 लाखांचे अनुदान मंजूर; पण 439 शेतकऱ्यांच्या खात्यात दमडाही नाही!
मार्चमधील अवकाळी पावसाने बागायती पिके उद्ध्वस्त; पंचनामे, मंजुरी, ई-केवायसी सर्व पूर्ण… तरीही नुकसानभरपाईची प्रतीक्षा कायम
मार्च 2026 मध्ये आटपाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभाग व गावकामगार तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले.
त्यानंतर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने 439 शेतकऱ्यांसाठी तब्बल 69 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. मात्र मंजुरी मिळून अनेक दिवस उलटूनही एकाही शेतकऱ्याच्या खात्यात एक रुपयाही जमा न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
“ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर अनुदान थेट खात्यात जमा होईल,” असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसीची प्रक्रियाही पूर्ण केली. मात्र आजतागायत खात्यात एक रुपयाही जमा झाला नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. अवकाळी पावसामुळे 138 लाभार्थ्यांच्या 126.22 हेक्टर क्षेत्रावरील, तर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या 301 लाभार्थ्यांच्या 212.41 हेक्टर क्षेत्रावरील आंबा, डाळिंब व इतर बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
सर्व पंचनामे पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यानंतर अनुदानालाही मंजुरी मिळाली. मात्र निधी वितरणाच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढून बागायती पिकांची देखभाल करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागले असतानाच मंजूर अनुदान रखडल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
मंजुरीच्या घोषणा आणि पोर्टलवरील नोंदी यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणे आवश्यक आहे, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाने निधी वितरणातील विलंबाचे कारण स्पष्ट करून 439 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 69 लाख रुपयांचे मंजूर अनुदान तातडीने जमा करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
अन्यथा संतप्त शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट : आटपाडी तालुक्यातील मंजूर अनुदान एकूण लाभार्थी : 439 मंजूर अनुदान : ₹69.00 लाख 138 लाभार्थी : 126.22 हेक्टर नुकसान 301 लाभार्थी : 212.41 हेक्टर (33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान) पिके : आंबा, डाळिंब व इतर बागायती पिके साध्यस्थिती : ई-केवायसी पूर्ण; मात्र नुकसानभरपाईची रक्कम अद्याप खात्यात जमा नाही.
चौकट…. जगाचा पोशिंदा असे शेतकऱ्याला म्हटले जाते. परंतु ही म्हण फक्त पुस्तकांमध्येच वाचायला चांगली वाटते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायचे म्हटलं तर शासनाकडून हात आखडता घेतला जातो. मोठमोठ्या कंपन्यांना सवलती द्यायचं म्हटलं तर हात पुढे केला जातो. परंतु शेतकरी म्हणायला फक्त राजा आहे परंतु अक्षरशः तो कंगाल झाला आहे ,आणि शेतीप्रधान देशांमध्ये शेतकऱ्याला वेळेवर मदत मिळू शकत नाही. निसर्गाने पिकांचे हुत्याचे नव्हते केले शेतकरी तोट्यात गेला तरी मदत मंजूर होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झाला नाही. फोटो..पिकांचे अतोनात नुकसान झाले होते..


