जमीन नसताना सचिवाला कर्जमाफी, कर्जमाफीच्या यादीतही पहिल्या क्रमांकावर नाव? सहाय्यक निबंधकांच्या भूमिकेकडे जनतेच्या नजरा; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
माणगंगा न्युज
आटपाडी तालुक्यातील एका विकास सोसायटीच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, स्वतःच्या नावावर शेती नसतानाही एका सचिवाने पीक कर्ज घेतल्याचा आणि त्याच कर्जाला कर्जमाफीचाही लाभ मिळाल्याचा आरोप समोर आला आहे.
विशेष म्हणजे संबंधित सचिवाचे नाव कर्जमाफीच्या यादीत अग्रेसर असल्याची चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणामुळे सहकार विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पीक कर्ज हे केवळ पात्र शेतकऱ्यांसाठी असताना, जमीन नसलेल्या व्यक्तीला कर्ज कसे मंजूर झाले? कर्ज मंजुरीवेळी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी कोणी केली? कर्जमाफीसाठी पात्रता कशी निश्चित करण्यात आली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
याचवेळी अनेक पात्र शेतकरी २०१७ व २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिल्याच्या तक्रारी असताना, जमीन नसलेल्या व्यक्तीला कर्ज आणि त्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा आरोप अधिक गंभीर मानला जात आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणात सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी तातडीने सखोल चौकशी करून कर्ज मंजुरीपासून कर्जमाफीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया तपासावी, संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्याकडून शासनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी संघटनांकडून होत आहे
.दरम्यान, या प्रकरणामुळे विकास सोसायट्यांच्या कामकाजातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सहाय्यक निबंधक या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.


