खातवळ (ता. खटाव) येथे भीषण दुर्घटना: म्हारकीचा तलाव परिसरात अचानक १७ शेळ्यांचा मृत्यू. कारण अस्पष्ट.लाखोंचे नुकसान
मायणी :- प्रतिनिधी,दत्ता कोळी.
पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्या खातवळ (ता. खटाव) येथील दोन शेतकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. म्हारकीचा तलाव परिसरात चरण्यासाठी नेलेल्या एकूण १८ पैकी तब्बल १७ शेळ्या आणि बोकडांचा अचानक व आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तर एकमेव शेळी गंभीर अवस्थेत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेत नुकसान झालेले शेतकरी *खंडेराय मल्हारी मदने (रा. खातवळ) यांच्या १४ शेळ्या व बोकड व रामचंद्र गणपत मदने*(रा.खातवळ): ४ शेळ्या व बोकड असे एकूण मृत शेळ्या ,बोकड १७ व एक गंभीर अवस्थेत ,असे आहेत
.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे संबंधित आपल्या शेळ्या-बोकड चरावयास म्हारकीचा तलाव परिसरात घेऊन गेले होते. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास अचानक एक-एक करून शेळ्या व बोकड जमिनीवर कोसळू लागल्या. काही कळण्याच्या आतच मोठ्या प्रमाणावर जनावरे जमिनीवर तडफडून मरण पावल्याने शेतकऱ्यामध्ये एकच हहाकार उडाला.
घटना लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.या घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, शेळ्या जमिनीवर मृत अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. जनावरे नेमक्या कशामुळे दगावल्या याचे प्राथमिक कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृत शेळ्या-बोकडांचे जागेवरच शवविच्छेदन (Post-mortem) करण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.या दुर्दैवी घटनेबाबत शासनाकडून *”
पशुवैद्यकीय विभागाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. अहवालानंतर संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. असे म्हणण्यात आले आहे.अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मदने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, शासनाने तातडीने भरीव मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.फोटो ओळी – खातवळ ता.खटाव येथील दोन शेतकऱ्यांच्या १७ शेळ्या अचानक मृत झाल्याची घटना घडली. याठिकाणी मृत अवस्थेतील शेळ्या…


