पटतंय का बघा…
फडणवीसांचे दिल्लीच्या राजकारणात जाणे: एक चिंतन
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
सध्या शिवसेनेचे विश्व प्रवक्ते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे रोज वेगवेगळी भाकिते करत असतात. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात दिल्लीला जाणार आहेत आणि ते धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी देशाचे शिक्षण मंत्री होणार आहेत असे भाकीत ते रोज सकाळी नऊ वाजता अगदी जोर जोरात करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत पाठवण्यासाठी फक्त संजय राऊतच इच्छुक आहेत असे नाही, तर इतरही अनेक त्याच रांगेत बसलेले आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या पक्षातीलही अनेक जण फडणवीस दिल्लीला जावेत म्हणून अक्षरशः देव पाण्यात घालून बसलेले आहेत, असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. मात्र मी २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार, असे सांगून फडणवीस यांनी सर्वच इच्छुकांची गोची करून टाकली आहे.
मुळात फडणवीस दिल्लीला जावे असे संजय राऊत यांना वाटते, यामागे त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे हे नाकारता येत नाही. महाराष्ट्रात १९८७-८८ च्या दरम्यान शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली होती. ती युती २०१४ पर्यंत कायम होती. तोपर्यंत तरी युतीमध्ये शिवसेना हा भाजपवर दबाव टाकणारा पक्ष आणि भाजप दबून राहणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता. ही परिस्थिती २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांनी बदलली, आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धोबीपछाड देत स्वबळावर महाराष्ट्रात विधानसभेच्या १२२ जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर सत्तेत वाटा मिळावा यासाठी उद्धव ठाकरेंना फडणवीसांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या.
नंतर २०१९ मध्ये शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती करून निवडणुका लढवल्या खऱ्या, मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यावर सरड्याने रंग बदलावा तितक्या सफाईने उद्धव ठाकरेंनी आपला रंग बदलला आणि शरद पवारांशी अभद्र शय्यासोबत करत त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवला. अर्थात त्यांच्या दुर्दैवाने कोरोना आला आणि आपल्या कार्यकाळात फक्त दोनदा मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री अशी स्वतःची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात करून घ्यावी लागली. नंतर परिस्थिती थोडी आटोक्यात येते आहे असे वाटत असतानाच त्याच देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आणि त्यांचे सरकार धराशयी केले. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठलीच शिल्लक राहिली नाही. ही परिस्थिती फक्त फडणवीसांमुळेच आली. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस हे डोळ्यातल्या कुसळाप्रमाणे खूपत आहेत. त्यामुळेच संजय राऊत सुद्धा अस्वस्थ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतील सद्य परिस्थिती बघता आता २०२८ मध्ये संजय राऊत पुन्हा राज्यसभेत निवडून जाणे कठीण आहे. त्यावेळी जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले तर ते कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊच देणार नाहीत हे उघडे गुपित आहे. त्यामुळेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस नको आहेत.
फडणवीस हे त्या तुलनेत तरुण आहेत. अभ्यासू आणि तडफदार देखील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात फडणवीसांकडे “लंबे रेस का घोडा” म्हणून बघितले जाते. सध्या नरेंद्र मोदींनंतर देशात पंतप्रधानपदाचे जे काही दोन-तीन दावेदार आहेत, त्यात फडणवीसांचे देखील नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून आज तरी संपवणे ठाकरे आणि राऊत या जोडगळीला कठीण आहे. म्हणूनच फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रात त्यांचा उपद्रव कमी होईल असे संजय राऊत यांचे स्वप्नरंजन आहे. त्यामुळेच ते वारंवार हा मुद्दा उपस्थित करत असतात. अर्थात फक्त तेच नाहीत तर त्यांचे “राजकीय आका” उद्धव ठाकरे यांनीही मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांना थेट पंतप्रधान करण्याची घोषणा केली होती. फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर मराठी माणूस पंतप्रधान होतो आहे म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असेही ठाकरे म्हणाले होते. अर्थात त्यामागे सुद्धा फडणवीस दिल्लीत गेले म्हणजे महाराष्ट्रात त्यांची ब्याद आपसूकच जाईल असा उद्धवपंतांचा होरा होता. त्यामुळेच त्यांनी देखील हे भाकीत केले होते, आणि संजय राऊत देखील हेच भाकीत करत आहेत.
फडणवीसांच्या पक्षात देखील अजून काही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेतच. फडणवीस जर दिल्लीला गेले तर त्यांच्यातील एकाला नक्की संधी मिळणार हे उघड आहे. त्यामुळे मग विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे सर्वच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. फडणवीसांनी दिल्लीत जावे ही या सर्वांचीच इच्छा असणे स्वाभाविक आहे.
फडणवीसांनी दिल्लीत जावे असे विरोधकांकडून वारंवार बोलले जाते. काही राजकीय विश्लेषकांच्या मते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची ही भविष्यवाणी आपण सकारात्मक दृष्टीने का घेऊ नये? फडणवीस दिल्लीला जाणार आणि त्यांना केंद्रात शिक्षण मंत्रीपद मिळणार, मात्र माझ्या मते त्यांना गृहमंत्री करावे असे फडणवीस यांचे राजकीय विरोधक म्हणतात. याला कारण म्हणजे फडणवीसांची दिल्लीत राजकारण करण्याची क्षमता आहे. हे या विरोधकांनी मान्य केले आहे. नमूद केल्याप्रमाणे फडणवीस हे तडफदार अभ्यासू आणि राजकीय चाणक्य नीति चा अवलंब करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे ते जर केंद्रात गेले तर ते जितक्या सक्षमपणे त्यांनी महाराष्ट्राचा कारभार चालवला तितक्याच सक्षमपणे ते केंद्रात देखील कारभार चालवतील यात शंका नाही. अर्थात केंद्रात राहूनही ते महाराष्ट्रात राजकारणाचे सूत्रसंचालन करू शकतात. यापूर्वी देखील यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांची उदाहरणे महाराष्ट्राने बघितली आहेत. त्यामुळे फडणवीस दिल्लीत राहूनही महाराष्ट्राचा कारभार तर सांभाळतीलच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे जे खाते येईल त्याला देखील संपूर्णतः न्याय देतील यात शंका नाही. महाराष्ट्रात यापूर्वी काही मुख्यमंत्र्यांनी फक्त आपला जिल्हा बघत तिथेच विकास कामे केली. शरद पवारांनी फक्त बारामतीचा विकास केला, तर विलासराव देशमुख यांनी फक्त लातूरकडे लक्ष दिले. सुशील कुमार शिंदे फक्त सोलापूरकडे बघायचे, तर अशोक चव्हाण यांनी फक्त नांदेडचाच विचार केला. मात्र फडणवीसांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून संपूर्ण महाराष्ट्राला विकसित कसे करता येईल हाच प्रयत्न केला. त्याच धर्तीवर ते जर केंद्रात गेले, तर महाराष्ट्राला तर न्याय देतीलच. पण त्याचबरोबर संपूर्ण देशातही समतोल विकास कसा करता येईल हा विचार निश्चित करतील. त्यामुळे त्यांना दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी बोलावणे आणि त्यांनी केंद्रात मंत्रिपद घेणे हे सकारात्मक दृष्टीने बघायला हवे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
अर्थात तसे झाले तर मग महाराष्ट्राचे नेतृत्व कोण करणार हा देखील प्रश्न येईल. अर्थात त्याचे उत्तर काळच देणार आहे. शेवटी राजकारणात काय किंवा एकूणच व्यवहारात काय कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. प्रत्येकाचा येणारा नवा वारसदार हा आपली क्षमता सिद्ध करत असतोच, आणि समजा जर एखादा मुख्यमंत्री आपली क्षमता सिद्ध करू शकला नाही, तर त्याला पर्यायही शोधता येतोच. त्यामुळे फडणवीस यांचे दिल्लीला जाणे हे सकारात्मक दृष्टीने बघावे हे राजकीय विश्लेषकांचे मत मलादेखील विचारात घ्यावेसे वाटते.
अर्थात हे माझे मत झाले…..
तुम्हाला हे पटतेय का ते बघा….


