आठवणीतील हौसाताई
तारीख होती 9 नोव्हेंबर 2014, आणि माझे चळवळीतील साथीदार कॉ.दिलीप सव्वाशे व मी विट्याला गेलो होतो.विट्यात गेलो की आम्ही हमखास काहीजणांना भेटायचंच हा शिरस्ता ठरलेला असायचा.त्यात कॉम्रेड राजाराम तळेकर,कॉ.सदाशिव पवार,कॉ.प्रभाकर दुगम आणि क्रांतिसिंह नाना पाटलांची लेक हौसाताई पाटील या स्वातंत्र्यलढ्याची संबंधित असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा समावेश असायचा.ही ज्येष्ठ मंडळी म्हणजे डाव्या पुरोगामी चळवळीतील अनेक वर्षापासूनची आम्हा कार्यकर्त्यांची प्रेरणास्थान होती.त्यामुळे या मंडळींच्या बद्दल कमालीची आस्था असायची.
म्हणतात ना की रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचे नाते ही खूप मोठे असते आणि ते टिकाऊ असते याचा अनुभव आम्ही घेत होतो.त्यामुळे जिथ जाऊ तिथे चळवळीतील साथीदारांची भेट घेणं व्हायचच. म्हणुनच त्या दिवशी आम्ही विट्यातील या चळवळीच्या शिलेदारांची आवर्जून भेट घेतली.विटा कराड रोडलगत विटा हायस्कूल पासून काही अंतरावर असलेल्या प्रा.विलास पाटील सर यांच्या घरी गेलो.तिथं हौसाताई पाटील होत्या.हौसाताई म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या.वय वर्षे 88 .पार वृद्धत्वाकडे झुकलेल्या पण मनातला क्रांतिकारी विचार अजूनही उफाळून येऊन मोठ्या खणखणीत आवाजात आपलं मत मांडणार्या ताई भेटल्या म्हणजे मला खूप आनंद वाटायचा. कारण ताई म्हणजे एक प्रेमळ पण परखड व्यक्तिमत्त्व होतं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रतिसरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या होत्या.त्या कधी विट्यात भेटायच्या तर कधी हणमंतवडीयेमध्ये भेटायच्या.
तशी त्यांची भेट विविध कार्यक्रम प्रसंगी होतच होती परंतु आज भेटायला गेल्यानंतर निवांतपणे ताईंशी बोलत बसलो.ताई सांगायला लागल्या की आरं मारुती,स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या घरात बसायला सुद्धा परवानगी नव्हती इतकी भयानक परिस्थिती होती. माझ्या अण्णांचा म्हणजे माझ्या वडलांचा जन्म सुद्धा रानात झालायं. तरीही माझ्या वडलांचे बालपण हे शैक्षणिक दृष्ट्या चांगलंच गेलं म्हणायचं बघ.कारण ते सातवीपर्यंत शिकलवतं. स्वातंत्र्यलढ्यात माझ्या वडलांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांना घेऊन जी चळवळ उभा केलीवतीं त्यात एकजूट फार मोठ्ठी हुती. मतभेद कमी हुतं.एखादा सहकारी पोलिसांना सापडला तरी दुसऱ्याचं नाव कधीच सांगायचं न्हाय हा अलिखित ठरावच झालेला असायचा.
त्यामुळेच आंदोलनातली एकजूट कधीच मोडत नव्हती.माझं लगीन क्रांतिवीर भगवानराव मोरे बप्पा यांच्याशी झालं.मी ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा ,सीमालढा यात महिलांच्या तुकड्यांचं नेतृत्व केलं. बेळगाव, हिंडलगा ,येरवडा अशा तुरुंगात मलाही जावं लागलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मी दिल्लीला सत्याग्रह केला बघं.आरं, सत्याग्रहातील महिला पुरुषांना पोलीस न्यायचे पण तुरुंगात नेऊन टाकण्याऐवजी जंगलात अनोळखी भागात नेऊन सोडायचे. इतकी वाईट अवस्था असायची. आरं तरीबी लोक कुठं ना कुठं एकमेकाला भेटून व्यवस्थित आपल्या भागात परतायचे बघ. इतकी चिकाटी, इतकं धाडस आंदोलनकर्त्या कडे असायचं आणि स्वातंत्र लढा असो संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो सीमा लढा असो त्यात सांगली सातारा भागातले लोकच जास्त असायचे. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रतापगडावरील पं.नेहरूच्या कार्यक्रमावेळी जास्तीत जास्त आंदोलक सांगली सातारा भागातीलच होते. लोकांच्या प्रश्नावरील चळवळीत मी व राजूताई बिरनाळे नी लय मोठं काम केलयं.गावोगावी फिरलोय.
उपासमार विरोधी कृती आंदोलनात तर पाच आंदोलक हुतात्मे झालं व्हतं. त्यामुळे अटकसत्र सुरू झालं व्हत. जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक होत होती.आमचा अण्णा म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील, बप्पा म्हणजे माझे पती अशा सगळ्यांना अटक करून नेलं व्हतं.परंतु नेत्या विना लोकांनी ठरवलं की सात दिवस दररोज मोर्चा काढायचा अन आम्ही त्या आंदोलनात महिलांनीच नेतृत्व केलं.गुप्तहेरांनी कितीही सुगावा काढायचा प्रयत्न केला तरी आम्ही सापडत नव्हतो. आळसंद चे भगवानराव सव्वाशे तसंच सांगलीचे भाई भगवानराव सूर्यवंशी तसं त्यांच मुळगाव पारे या दोघांचं काम सुद्धा खूप मोठ आहे. हे दोघे म्हणजी ,कामाला वाहून घ्यायचं ठरवलं की ते काम पूर्ण होईपर्यंत गप्प बसत नव्हती. कितीही अडचणी आल्या तरी थांबत नव्हती.
ठरवलेलं काम पूर्ण करणारच हा त्यांचा शिरस्ता असायचा. उदाहरणच द्यायचं झालं तर स्वातंत्र्यलढ्यात 42 च्या क्रांतीत जेव्हा रेल्वे स्टेशने, पोस्ट जाळणे ,तारा तोडणे, इंग्रजांच्या बंदुका पळवणे ही कामं क्रांतिकारक करत हुती.तवां आपल्या जवळच्या भवानीनगर रेल्वे स्टेशन वरील बंदुका पळवून नेण्याचा क्रांतिकारकांनी बेत केला. मी त्यावेळी फक्त सात दिवसाची बाळतीनं होती. तरीपण मी त्यात सहभागी झाले. काही अंतरावर भवानराव सव्वाशे आणि भगवानराव सूर्यवंशी यांनी मारामारी करायला सुरुवात केली. ही मारामारी खोटी खोटी होती. मला माहेरी घालवण्यासाठीची. ही खोटी मारामारी बघून लोक गोळा झाले. स्टेशन वरील पोलीसांचे,मास्तरांचे लक्ष विचलीत झाले.
अन तिकडे भवानीनगर स्टेशन वरील बंदुका पळवून नेण्यात क्रांतीकारक यशस्वी झाले. जीवावर उदार होऊन स्वातंत्र्यपूर्वकाळात बायका-माणसं क्रांतिकारक देशासाठी लढत हुतं.देशाबद्दलची निष्ठाही जाज्वल्य होती. गावपातळीवरील इनामदार पाटील मात्र पोलिसांनाच चहाड्या करायची. इतक्या चित्र विचित्र अवस्थेत आपल्याला स्वातंत्र्य मिळालेय.त्यानंतरचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उपासमार विरोधी कृती लढा ,दुष्काळ विरोधी लढा अशामध्ये जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होत होती. परंतु आज स्वातंत्र्यानंतर 67 वर्षे झाली तरी भारतातली गरिबी, विषमता ,भांडवलशाही ही काय बाबा संपलेली नाय बघ.सगळा समाज असुरक्षित जीवन जगतुय. समाजात निष्ठेनं काम करणारी क्रांतिसिंह नाना पाटील, जी डी बापू ,पांडू मास्तर ,बप्पा ,क्रांतिवीर नागनाथ आण्णा,अशी माणसं आज आपल्यात नाहीत.तरीही समाजासाठी आपली हयात घालवणारी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सारखी माणसं देवदूता सारखी समाजाला वाटत होती
.असली माणसं या व्यवस्थेने संपवण्याचा घाट घातलाय याचं मला लय दुःख हुतयं आणि पुन्हा एकदा तळागाळातून दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढायला सुरुवात झाली पाहिजे असं वाटतंय. आज डाव्या पुरोगामी चळवळीने वादळ निर्माण करायला हवं. तरच ही व्यवस्था उलथून पडेल.आणि भगतसिंगांच्या स्वप्नातला समाजवादी भारत उदयाला येईल. असं मनाला उभारी देणारे व प्रेरणा देणारे आणि ऐकतच राहावं असे क्रांतिकारी विचार हौसाताईंचे होते. अशा क्रांतीची स्वप्न उराशी घेऊन सतत लढ्यात उतरणारी ताई आमची प्रेरणा होती.
अनेक वेळा हौसाताईंची भेट झाली .कित्येक वेळा घरी गेलो.त्यांचे सुपुत्र ऍडव्होकेट भाई सुभाष पाटील हे मनापासून विद्यार्थी दशेपासून आजोबांचा,आपल्या आईचा क्रांतीकारी वारसा चालवतात आणि डाव्या पुरोगामी चळवळीशी एकनिष्ठ राहून काम करतात.परवाच ताई गेल्याची बातमी कानावर आली.खूप दुःख झालं.स्वातंत्र्यलढ्यातील, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची संबंधित असणारी माणसं हळू हळू संपत चालली आहेत. आज तर देश फार विचित्र अवस्थेतून जात आहे. खऱ्या अर्थानं दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईची हाक देणारी वयाच्या शहान्नव्या वर्षी आपल्यातून निघून गेली. ताईंच्या स्मृतीस डाव्या पुरोगामी चळवळीच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन व लाल सलाम .
कॉम्रेड मारुती शिरतोडे
वाझर ता.खानापूर जिल्हा सांगली







