महादेव जानकर यांच्या एका निर्णयाने 432 जणांच्या घरी दिवाळी साजरी
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी या पदाचा निकाल 8 ऑक्टोबर 2021 रोजी लागलेला आहे. सदर भरती मध्ये एकूण 432 पशुधन विकास अधिकारी यांची निवड झालेली आहे. खरे तर या भरतीचे श्रेय माजी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री महादेव जानकर यांना जाते. जानकर यांनी 2019 मध्ये पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेऊन रिक्त पदाचा अहवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवलेला होता, यामध्ये 435 पशुधन विकास अधिकारी यांची पदे तात्काळ भरण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2019 मध्ये पशुसंवर्धन विभागाची 435 पदाची जाहिरात प्रसिद्ध केली व लगेच लेखी परीक्षा ही घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर युतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडी चे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये पशुसंवर्धन विभागा मध्ये कुठल्याही स्वरूपाची नवीन भरती केलेली नाही
परंतु जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती तिचा निकाल ही वेळेवर लावला जात नव्हता कालांतराने स्वप्नील लोणकर या हुशार विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस विलंब होत असल्याने आत्महत्या केले व मोठ्या संख्येने विद्यार्थी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत होते.त्याच कालावधीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री मा. महादेव जानकर यांनी मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रलंबित असणाऱ्या परीक्षांचे निकाल तात्काळ लावण्यात यावे असा विनंती वजा इशाराही दिलेला होता.
शासन दरबारी वाढत असलेल्या रेट्यामुळे महाविकास आघाडी सरकार खडबडून जागे झाले व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रलंबित असलेल्या सर्व परीक्षांचे निकाल तात्काळ लावण्याचे आश्वासन मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची प्रसिद्ध करण्यात आलेली 2019 सालची प्रलंबित जाहिरातचा निकाल ही 8 ऑक्टोंबर 2021 रोजी लागला आहे. आज 432 लोकांच्या घरी आनंदित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्या वेळीचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्री श्री महादेव जानकर यांनी केलेला आहे याची प्रचिती आता येऊ लागलेली आहे. पशुसंवर्धन विभाग हा ग्रामीण भागातील शेतकरी गोरगरीब यांच्याशी जोडलेला असल्यामुळे गोरगरिबांचा आशीर्वाद नक्कीच जानकर यांना मिळालेला असणार यात काही दुमत नाही.
काही नवनियुक्त अधिकाऱ्यांनीही मान्य केलेले आहे की 2019 ला जानकर यानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एक प्रकारे संधी देण्याचे काम केलेले आहे. जानकर यांच्या काळामध्ये पशुसंवर्धन विभागा मध्ये अमुलाग्र असे बदल झालेले आहेत. त्याच काळामध्ये भारत सरकारने देशामधील उत्कृष्ट विभाग म्हणून पशुसंवर्धन विभागास पुरस्कारही प्रदान केलेला आहे. तसेच नवीन काही योजना सुरू ही करण्यात आलेल्या आहेत ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळांमध्ये ही सुरू आहे त्यामध्ये महामेष योजनेसारखी महत्त्वपूर्ण योजनाही आहे.
सर्व नवनियुक्त पशुधन विकास अधिकारी यांचे खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.