पश्चिमेकडिल पूराचे अतिरिक्त पाणी माण – खटावला सोडणे सुरुच ठेवा
-आमदार जयकुमार गोरे
डोंगरी विभागाच्या बैठकीत केली मागणी
सातारा:जोरदार पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणांमधील अतिरिक्त पाणी दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांसाठी यापुढेही सोडण्यात यावे, ते बंद करु नये. या पाण्याने दोन्ही तालुक्यातील तलाव आणि छोट्या, मोठ्या जलसंरचना भरुन घ्याव्यात अशी मागणी आ. जयकुमार गोरे यांनी डोंगरी विभागाच्या बैठकीत केली. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना तशा सुचनाही देण्यात आल्या.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाने धरणे ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आली आहेत. सर्वच धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून द्यावे लागत आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे जिल्ह्याच्या माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावली नाही. जुलै महिना संपला तरी दोन्ही तालुक्यातील येरळा, माणगंगा नद्यांची पात्रे कोरडीच आहेत. मध्यम प्रकल्प आणि तलावांमध्ये पाण्याची आजिबात आवक झालेली नाही. पावसाने ओढ दिल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. यापुढील कालावधीत समाधानकारक पाऊस पडला नाही तर टंचाईचे संकटही गडद होण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पूरपरिस्थितीमुळे धरणांमधील अतिरिक्त पाणी माण आणि खटाव तालुक्यांसाठी सोडण्यात आले आहे. उरमोडी आणि तारळी योजनांच्या कॅनॉलद्वारे हे पाणी माण तालुक्यात पोहचले आहे. अद्यापही दोन्ही तालुक्यांना आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पासह सर्व तलाव भरुन घेण्यासाठी तसेच माण तालुक्यातील माणगंगा नदी प्रवाहीत करण्यासह सर्व तलाव आणि जलसंरचना भरुन घेण्यासाठी हे पाणी यापुढील कालावधीत सुरु ठेवणे गरजेचे आहे. आ. जयकुमार गोरे यांनी डोंगरी विभागाच्या बैठकीत तशी मागणी करताच संबंधित अधिकाऱ्यांना खटाव, माणसाठी पाणी सोडणे सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या.
पश्चिमेच्या अतिरिक्त पाण्याचाच माण, आधार ……
पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी येरळा आणि माणगंगा नद्या कोरड्याच आहेत. दोन्ही तालुक्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. भविष्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिमेकडील अतिरिक्त पाणी या दोन्ही तालुक्यांसाठी सोडण्यात आले आहे. दुष्काळी भागातील छोटे, मोठे तलाव, ओढे, नाले या पाण्याने भरुन घेतले तर परिस्थिती थोडी सुसह्य होणार आहे, त्यामुळे यापुढील कालावधीतही हे पाणी माण, खटावसाठी सोडणे सुरुच ठेवण्याची गरज आहे.