📰 माणगंगा न्युज | गुन्हे वृत्त…… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
आटपाडी | प्रतिनिधी
करगणी (ता. आटपाडी) येथे पैसे मागण्यासाठी घरी गेल्याचा राग मनात धरून दोघांनी एकास जातिवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष सुधाकर चंदनशिवे (वय ४६, रा. सुलतानगादे, ता. खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी जोतीराम शिवाजी गायकवाड व सागर बालाजी जगदाळे (दोघे रा. करगणी, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१८ ते २०२४ या कालावधीत जोतीराम गायकवाड याने फिर्यादीकडून २ लाख ७२ हजार रुपये घेतले होते. तसेच करगणी येथील पेट्रोलपंपावर १ लाख २२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या पैशांची मागणी करण्यासाठी चंदनशिवे हे गायकवाड यांच्या घरी गेले होते.याचा राग मनात धरून गायकवाड व जगदाळे यांनी २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास करगणी येथील दत्त मंदिराजवळील सावळी बारसमोरील रस्त्यावर चंदनशिवे यांना बोलावून घेतले. ‘पैसे मागण्यासाठी घरी का गेलास?’ असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली.
तसेच धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास विटा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार करीत आहेत.

