कोरोनाच्या संकटकाळात जीवावर उदार होऊन काम केलेल्यांच्या कथा लोकांसमोर आल्या पाहिजेत – भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
कोरोनामध्ये सेवा भावनेतून समाजातील अनेकांनी जीवावर उदार होऊन काम केले. त्या सर्वांच्या कथा, अनुभव लोकांसमोर आले पाहिजेत, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. पुणे शहर भाजप च्या वतीने अभिमान पुण्याचा उपक्रमा अंतर्गत कोरोनाच्या संकटकाळात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या योद्धांचा प्रतिनिधिक सत्कार व त्यांच्यावरील शॉर्ट फिल्मचे प्रकाशन आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक,भाजपच्या प्रतोद आ. माधुरीताई मिसाळ, आ. भीमरावअण्णा तापकीर, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा प्रदेश चिटणीस धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे शहर भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह इतर प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कर्वेनगर मधील कोविड केयर सेंटर मधे सेवा कार्य करणारे ओंकार अग्निहोत्री,दृष्टी्दोष पत्करून ही अविरत मोफत सॅनिटायझेशन चे कार्य करणारे किरण सावंत व कोरोना मुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वरूपवर्धिनी, सेवा सहयोग व सुराज्य प्रकल्पच्या स्वयं सेविका यांच्यावर आधारित ध्वनीचित्रंफितीचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रतिनिधिक स्वरूपात त्यांचा सन्मानपत्र, शाल, भेटवस्तू व सिंहासनांरूढ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.या तिन्ही ध्वनीचित्रंफितीचे लेखन वरुण नार्वेकर, निखिल खैरे यांनी केले असून, दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले आहे.
यावेळी श्री. पाटील म्हणाले की, कोरोनाने संपूर्ण जगाची झोप उडविली. या काळात इतर देशाच्या तुलनेत आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सेवाकार्य राबविले गेले. संपूर्ण जगानेही याची स्तुती केली. पुणे शहरासह भारतीय जनता पक्ष, आणि रा. स्व. संघ परिवारासोबत विविध संघटनांनी पुढाकार घेत समाजातील विविध घटकांनी आपल्या जीवावर उदार होऊन, विविध मार्गांनी सेवा कार्य केले. कोरोनामुळे निधन झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रा. स्व. संघाच्या माध्यमातून स्वरुप वर्धिनीने जे काम केले, ते अतिशय अमूल्य असे होते. त्यामुळे अशा सर्व घटकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिमान पुण्याचा हा उपक्रम राबविला गेला. याद्वारे सर्व घटकांचे काम शॉर्ट फिल्म द्वारे सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश होता. या फिल्म्स कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.ते पुढे म्हणाले की, आपण सर्वजण स्वामी विवेकानंदांचे वंशज आहोत. त्यामुळे कुणी कौतुक करावं, यासाठी समाजसेवेचं व्रत अंगिकारुन काम करायचं नसतं. पण तरी कोरोनासारख्या कठीण काळातही उत्स्फूर्तपणे ज्या पद्धतीने समाजकार्य झाले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमान पुण्याचा या उपक्रमाचे प्रमुख मनपा तील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले. सूत्रसंचालन शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केले.