शेटफळेत निवासी शिबारातून होणार ध्येयदिशा पेरणी
माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार शिबिराचे आयोजन
आटपाडी
किशोरवयीन मुलांच्या मनातील हालचालींना योग्य दिशा देण्यासाठी कार्यरत असणारी आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावातील ध्येय दिशा पेरणी प्रतिष्ठानच्या वतीने ध्येयदिशा संस्कार पेरणी निवासी शिबीर आयोजित केल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील गायकवाड यांनी दिली.
25 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधी मध्ये होत असणाऱ्या या संस्कार शिबिरामध्ये किशोर वयीन मुलांच्या मनामध्ये समाजाविषयी, आई-वडील , देशाविषयी मातृत्वाची भावना निर्माण व्हावी. एक सर्जनशील व्यक्ती म्हणून समाजात कसे वागावे याचसह आपल्यापुढील आयुष्यामध्ये नोकरी , व्यवसाय यामध्ये असणारी स्पर्धा याविषयी मुलांच्या मनातील भाव भावनांना योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठाणने निवासी शिबीर आयोजित केले आहे.
माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेटफळे तील ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठान काम करत असून गेल्या तीन वर्षांमध्ये प्रतिष्ठाणने विध्यार्थीसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.
पाच दिवसीय निवासी शिबिरामध्ये मुली व मुलांना मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे.प्रा.संभाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठान काम करत असून गावातील समाजशील अनेक तरुणांनी व जेष्ठ मंडळींनी पुढाकार घेत निवासी शिबिराचे आयोजन केले आहे.
शेटफळे येथील पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूलवर शिबिर संपन्न होणार असून यामध्ये योग ध्यान धारणा साठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे लक्ष्मण कदम मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दाखविणार आहेत. गीत संस्कार मधून देशाविषयी अभिमान निर्माण करणाऱ्या गीतांच्या मैफिलीचा नृत्याविष्कार शिबिरार्थीच्या कडून सादर केला जाणार आहे.यासाठी नृत्यप्रशिक्षक हिमेश हिंगमीरे व सहकारी येणार आहेत.
मुलांच्या मनातील भावविश्व कलेच्या माध्यमातून साकारता येते याच सह कला क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या संधी व मनातील भाव व्यक्त करण्याची कला यासाठी शिवम प्रतिष्ठानचे सुहास प्रभावळे,विनायक माळी, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे कलाशिक्षक प्रमोद तुपे, पेन्सिल आर्टचे जोतिराम काटकर मार्गदर्शन करणार आहेत.
स्पर्धा परीक्षात्मक मार्गदर्शन यांच्यासह उद्योग व्यवसाय यामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, राजश्री पाटील, साहित्यिक सुभाष कवडे, डॉ.सारस्वती गायकवाड, दुग्धव्यवसाय करणारी कु.श्रद्धा ढवण मार्गदर्शन करणार आहेत.सुहास प्रभावळे, वाचन कट्टा चळवळीचे दिनेश देशमुख, जयसिंग देशमुख, पत्रकार कुलदीप माने हे संस्कार मूल्य व असणाऱ्या संधी बाबत मार्गदर्शन करणार आहेत.शिवाजी बंडगर, ज्ञानेश डोंगरे यांचे काव्य दर्शन, प्रा.सुरेश गायकवाड यांचे एकपात्री नाट्य, नितीन तांबडे यांचे अवकाश दर्शन होणार आहे.
पाच दिवसीय निवासी शिबीराच्या माध्यमातून शालेय किशोरवयीन मुली व मुलांच्या मनामध्ये संस्काराचे मोती निर्माण करणे. मुलाच्या मनामध्ये सुसंस्काराची पेरणी करून त्याच्या मनामध्ये सकात्मक ऊर्जा निर्माण करून त्यांच्या मनामध्ये सुरू असणाऱ्या विचारांच्या शितयुद्धाला योग्य दिशा देण्यासाठी ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठान प्रयत्नशील असून सांगली जिल्ह्यात प्रथमच क्रांतीसाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या शेटफळे गावातून संस्कार शिबिराचे आयोजन केले जात आहे.







