पीक विमा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी मुदतवाढ शेतकऱ्यांना दिल्याने
किरण भलकार यांनी केंद्र व राज्य सरकारचे मानले आभार
महेंद्र खोंडे
त-हाडी: यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेसाठी अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने पीक विम्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. या मागणीवरून केंद्र सरकारने पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवली असून, या निर्णयाबद्दल किरण भलकार ग्रामपंचायत सदस्य त-हाडी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
यावेळी बोलतांना सांगितले की, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांचा प्रादुर्भाव व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू करण्यात आलेली आहे. पेरणी ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. महाराष्ट्रात २०१६ च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठा बदल केला असून, पुढील तीन वर्षांसाठी ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे.
यंदाच्या खरीप हंगामापासून या नवीन पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यापूर्वी पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा काढून मिळणार आहे. या पीक विमा योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही. कारण, सरकारच आता पीक विम्याची रक्कम भरणार आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकांसाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार आहे.
सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित बँक किंवा संकेतस्थळ व आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत ऑनलाईन नोंदणी करून पीक विम्यासाठी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती; परंतु शिरपूर मतदारसंघासह राज्यात अनेक भागात इंटरनेटची समस्या आहे. तसेच सर्व्हर सतत डाऊन राहत असल्यामुळे अनेक शेतकरी अद्याप पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज व नोंदणी करू शकले नाहीत. शिरपूर मतदारसंघासह राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उशिरा पेरणी केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकर्यांना सहभागी होता येणार नाही.
त्यामुळे शिरपूर तालुक्यातील त-हाडी ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार यांनी तांत्रिक कारणांमुळे कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.
राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून ऑनलाईन पीक विमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य करून ऑनलाईन पीक विमा अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची म्हणजे ३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.