ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी
सांगली/प्रतिनिधी
सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रताप मेटकरी यांची निवड करण्यात आली. याबाबत निवडीचे अधिकृत पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना संघटक संजय भोकरे म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सदैव पाठीशी उभा राहील. पत्रकारांनी एकत्र असणे काळाची गरज आहे. राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची चर्चा करून ते सोडवण्यासाठी संघटनेतील पत्रकारांना बळ दिले जाईल.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी म्हणाले, राज्य संघटक संजय भोकरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

भोकरेसाहेबांच्या संकल्पनेतून विटा नगरपालिकेने दिलेल्या 10 गुंठे जागेत राज्यातील रोलमॉडेल आणि सुसज्ज असे पत्रकार भवन विट्यात उभारणीच्या कामाला गती दिली जाईल. भोकरेसाहेबांनी मोठ्या विश्वासाने दिलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनासोबत घेऊन सक्षमपणे पार पाडली जाईल. पत्रकार संघाची सर्व ध्येय धोरणे ग्रामीण भागातील पत्रकारांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.







