शासनाचे नियम ध्याब्यवर ठेऊन गुरुजी राजकीय व्यासपीठावर….
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील उत्तम गुरुजी ने पंढरपूर येथील माजी मंत्री छगन भुजबळ व महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार भाषण एक तर प्राथमिक शिक्षकांना राजकीय व्यासपीठावर जाण्यासाठी बंदी असते परंतु या गुरुजींनी अगदी दणदणीत अशा प्रकारचे भाषण ठोकले आहे. उत्तम गुरुजींना जिल्हा परिषदेने केलेल्या सहकार्याबद्दल तालुक्यांमध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषद शाळा लिंगेवस्ती येथे नेमणूक असणारे सहशिक्षक उत्तम जाधव म्हणजेच यु.टी. जाधव मागील अनेक वर्षापासून शिक्षक नेते म्हणून स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने बनवलेले सर्व नियम गुरुजींनी मोडण्याचा विक्रमच केला आहे. . परंतु जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड हे या शिक्षकाच्या अनेक चुकांवर दुर्लक्ष करीत आहेत. उत्तम गुरुजीवर जिल्हा शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांचे असणाऱ्या प्रेमाची तालुकाभर चर्चा आहे .
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 अनुसार कलम 4/1 प्रमाणे कोणत्यही जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात भाग घेता येणार नाही, परंतु हे गुरुजी नेहमी राजकारणामध्ये व्यस्त असतात. 6 जानेवारी रोजी ओ.बी.सी. आरक्षण संदर्भामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ,माजी मंत्री महादेव जानकर इत्यादी नेते मंचावर उपस्थित असताना उत्तम गुरुजी या मंचावर हजर राहून पुढे जमलेल्या हजारोच्या जनसमुदायासमोर जाहीर भाषण करीत होते. या भाषणाची चित्रफीत समाज माध्यमावर अनेक दिवसापासून फिरत आहे. मात्र या चित्रफितीकडे शिक्षण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच उत्तम गुरुजी राजकारणामध्ये उत्तम मुरब्बी नेत्याप्रमाने वक्तव्य करतात.
कलम 6/3 (अ) अनुसार कोणत्याही मंत्र्याला प्रत्यक्ष भेटता येत नाही परंतु हे महाशय नेहमी राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला पाहायला मिळतात.
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील कलम 8/2 प्रमाणे वृत्तपत्र प्रसारमाध्यम यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही किंवा प्रसिद्धी करता येणार नाही असे असताना हे गुरुजी नेहमी वृत्तपत्रांमध्ये चर्चेत असतात. तसेच कलम 19 /1 प्रमाणे कार्यकारी अधिकाऱ्याच्या पूर्व मंजुरी शिवाय प्रतिकूल टिकेचा किंवा मानहानिकारक स्वरूपाच्या आक्रमणाचा विषय असेल अशा कोणत्याही अधिकृत कृत्याच्या समर्थनार्थ कोणत्याही न्यायालयाचा किंवा वृत्तपत्राचा अवलंब करणार नाही परंतु हे गुरुजी नेहमी वृत्तपत्रांमध्ये व विवादामध्ये शिक्षक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पत्रव्यवहार करतात.
या शिक्षकांवर जिल्हा परिषद शिक्षण विभाग का मेहरबान आहे. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. शिक्षकाचा हा प्रताप प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर या शिक्षकावर शिक्षण विभाग काय कारवाई करणार किंवा नाही याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.







