केलेल्या कामाची पावती मागण्यासाठीच माझी उमेदवारी – सखाराम बोबडे पडेगावकर
प्रतिनिधी
मागील पाच वर्षापासून मतदार संघात एक कार्यकर्ता म्हणून मी केलेल्या छोट्या-मोठ्या कामाची पावती मागण्यासाठीच माझी उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पत्रकारांना दिली.
उमेदवारी अर्ज वैद्य झाल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित पत्रकारांशी उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी चर्चा केली.
पुढे बोलताना सखाराम बोबडे पडेगावकर म्हणाले की मी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे. शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ ,शेतमजूर, विद्यार्थी, व्यापारी आदींच्या प्रश्नासाठी मागील पाच वर्षापासून लढत आहे. कोणत्याही राजकीय पदावर नसताना संपूर्ण मतदारसंघातील बरेचसे प्रश्न सोडविण्यात मला यश आले. पाच वर्षात एकही दिवस घरी न थांबता मी लोकांची सेवा केलेली आहे. निस्वार्थीपणे केलेल्या सेवेची पावती मागण्यासाठीच मी यावेळेस लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे.
2019 च्या निवडणुकीनंतरच 2024 लोकसभा लढवण्याची मी जाहीर केले होते. त्यामुळे मी कोणाच्या तरी विरोधात किंवा कोणाला पाडण्यासाठी निवडणूक लढवतोय असे म्हणण्याला काही अर्थ नाही. ही निवडणूक जातीपातीवरून न होता विकास कामावरच होईल असेही ते म्हणाले.