आटपाडी तालुक्यात चाऱ्याचा दर भडकला, दुधाला मात्र कवडीमोलाची किंमत …
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले; दुग्ध उत्पादक आला डपघाईला..
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुका म्हटलं की या तालुक्याकडे दुष्काळी तालुका म्हणून पाहिलं जातं.सध्या तालुक्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. त्याच बरोबर चाऱ्याची सुद्धा भीषण टंचाई भासू लागली आहे.
दूध संघांनी दुधाचे दर पाडले…..
सध्या दुधाचे दर पाहता गुरा ढोरांचा चारा- पाण्याला लागणार खर्च देखील भागात नाही अशी परस्थिती निर्माण झाली आहे.. मग शेतकरी स्वतः राबतो त्याचे कष्ट वेगळेच त्या कष्टाला या दुष्काळात काडीमोल किंमत झाली आहे
दुष्काळाची भयानक परिस्थिती झाली आहे मग अशा परिस्थितीमध्ये जनावरे संभळायाची कशी असा प्रश्न गंभीर आहे . अशातच चारा टंचाई भासू लागल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे, त्यामुळे अनेक शेतकरी जनावरे विकण्याच्या मार्गावर आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जनावरे विकली तर पुन्हा घ्यायची म्हटलं तर त्याच किमतीला मिळत नाहीत त्यामुळे चारी बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे
सद्या ३.५ व ८.५ एस.एन.एफ. चे दुधाचे 26 ते 28 रुपये प्रति लिटर एवढा दर दिला जातो. तालुक्यात 11 दूध संघ आहेत खासगी दूध संघ सोनाई, हॅटसन, बाबासाहेब देशमुख, गोविंद, विराज,प्रभात, गोकुळ, अमुल असे संघ 27 रुपये प्रति लिटर एवढा दर देतात,
दूध संघ एवढा दर देतात, तर डेअरीवाले यापेक्षा एक ते दोन रुपये दर कमी देतात. त्यामुळे वैरणीचा दर पेंडीचा दर स्वतःची मजुरी हे सर्व विचारात घेतले असता सध्या दुग्ध व्यवसाय अडचणीत आहे.
वैरणीचे दर मका 1900 ते 2200 रुपये गुंठा असून वाळलेली ज्वारी कडबा शेकडा 2700 ते 3200 रुपये दर आहेत. मक्याचे केंबाल 1700 ते 2000 मका धान्याचे दर 2200ते 2500 रुपये व्किटल या दराने चारा खरेदी करावा लागत आहे .तसेच ओल्या मकेपासून मूरघास तयार करुन साठवण केली जात आहे.
खपरी पेंड पन्नास किलो २६००ते 2800 रुपये ५० किलोचे पोते, सरकी 13०० ते 14०० रुपये ,तर गोळी पेंड 1700 रुपये 50 किलो अशा दराने पशुखाद्य विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जनावरांच्या खाद्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे तसेच जास्त दूध देणाऱ्या जनावरांना पशुवैद्यकीय दवाखाना व औषधांचा खर्च जास्त प्रमाणात करावा लागतो..
सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे.उन्हाच्या तीव्रतेमुळे बऱ्याच भागात पिण्याचे पण्याची तीव्रता भासू लागली आहे.त्यामुळे जनावरांनासुद्धा पाणी बाहेरुन आणून पाजावे लागतआहे. एवढी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. शासनाने दुधाला प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर केले. तेसुध्दा शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अशी परिस्थिती असताना नेते मंडळी लोकसभेच्या निवडणुकीत मग्न आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या तारा टंचाईच्या विषयाकडे कोणालाच लक्ष द्यायला वेळच नाही.
दूध उत्पादन घटत चालले आहे. त्यामुळे दूध उत्पादक हवालदिल झाला आहे. तसेच चारा छावण्या किंवा वैरणीसाठी अनुदान द्यावे, चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी दुग्ध उत्पादकांकडून केली जात आहे.
चौकट – चारा टंचाई पाणी टंचाई अशी भीषण अवस्था असताना शासनाकडून कोणतीही मदत जाहीर केली जात नाही चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू कराव्यात अशी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु नेतेमंडळी निवडणुकीत गुंतले असल्याने शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे. लवकरात लवकर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावे अन्यथा तालुक्यातील पशुधन वाचणार नाही पशुधनांना चारा विकत घेऊन जगवण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नाही त्यामुळे ताबडतोब शासनाने यावर उपाय काढून चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करावा.