घ्या समजून राजे हो..
डॉ. भागवतांच्या विधानावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे..
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: समाजात प्रत्येक जोडप्याला किमान तीन अपत्य असावीत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरक संघ चालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केले असल्याचे वृत्त प्राचारित झाले आहे. या त्यांच्या विधानावर सध्या देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
डॉ. भागवत यांचे हे विधान अगदीच तथ्यहीन आहे असे म्हणता येणार नाही. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी आकडेवारीही सादर केली असल्याची माहिती आहे. कोणताही समाज २.१ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्येचा झाल्यास त्या समाजाचे अस्तित्व नष्ट होते. असे अनेक समाज काळाच्या ओघात नष्ट झाले असल्याचे डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
डॉ .भागवत यांनी स्पष्ट म्हटले नसले तरी त्यांना हिंदू समाजाच अभिप्रेत आहे हे उघडे गुपित आहे. आज आपल्या देशात हिंदू समाजाची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे, आणि त्याचबरोबर १९५१ पासून आकडेवारी बघितल्यास मुस्लिम समाजाची संख्या वाढत चाललेली आहे हे दिसून आले आहे. त्यामुळेच त्यांनी हे विधान केले असणार हे निश्चित. त्यांनी अशा आशयाचे विधान यापूर्वीही केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत सरसंघचालक के सुदर्शन यांनीही अशा आशयाचे विधान केले होते. तसेच देशातील चार पिठांपैकी एका पिठाच्या शंकराचार्यांनी देखील अशा आशयाचे विधान केल्याचे वाचकांना स्मरत असेलच. शंकराचार्यांच्या मते हिंदू समाजातील तरुण तरुणी आजकाल करिअरला प्राधान्य देत असल्याने आजकाल तरूण तरूणींचे विवाह उशिरा होतात. त्यामुळे संततींची संख्या कमी झाली आहे. हे लक्षात घेता करिअरच्या मागे न लागता लग्नाचे वयही कमी करावे आणि हिंदू समाजातील संतती वाढवावी असे प्रतिपादन त्यांनी काही वर्षांपूर्वी केले होते.
वरील सर्व विधानांचा गांभीर्याने विचार होणे आज गरजेचे झाले आहे. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर हळूहळू कुटुंब नियोजनाचे प्रस्थ वाढू लागले. आधी “बस दो या तीन” ही घोषणा झाली. नंतर “हम दो हमारे दो” ही घोषणा झाली, आणि आता तर कित्येक कुटुंबांमध्ये फक्त एकच अपत्य आहे, तर काही कुटुंबांमध्ये तर अपत्य होऊ द्यायचे नाही, तर आपण दोघे स्वच्छंद आयुष्य जगायचेअसेही विचार करतांनूआता दिसू लागले आहे. त्यामुळे हळूहळू हिंदू समाज हा संकुचित होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. भागवतांच्या वरील विधानाची गांभीर्याने दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.
आज जगातील अनेक देशांमध्ये मूळ नागरिक हळूहळू संख्येने कमी होऊ लागले आहेत. त्याचबरोबर जगभरात मुस्लिम समाज हा हळूहळू सर्वत्र पोहोचलेला आहे. मुस्लिम समाज हा मुळातच विस्तारवादी असल्यामुळे समाज हळूहळू फोफावतो आहे. आज ब्रिटन सारख्या देशातही मुस्लिम समाजाचे वर्चस्व हळूहळू वाढते आहे आणि तिथला ख्रिस्ती समाज हळूहळू संकुचित होत चालला आहे. परिणामी भविष्यात तिथेही सत्तेत मुस्लिम समाज येईल अशी भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे डॉ. भागवतांची ही चिंता सहाजिकच ठरते.
आपल्या देशात कुटुंब नियोजनाचे प्रस्थ स्वातंत्र्योत्तर काळात वाढले हे खरे. मात्र तिथेही भेदभाव केला गेला. तत्कालीन सत्ताधारी पंडित नेहरूंच्या मुस्लिम लांगुलचालन करण्याच्या धोरणाचा फायदा घेत मुस्लिम समाजाने त्यांच्या धर्माचा दाखला देत त्यातून सूट मिळवून घेतली. त्याचबरोबर आपल्या देशात आधी बहुपत्नीत्वाची प्रथा होती. ही प्रथादेखील कायद्याने बंद करण्यात आली. एक पत्नी असताना दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा ठरवला गेला. मात्र मुस्लिम समाजाला यातूनही धर्माच्या आधारे सूट दिली गेली. आपल्या देशात १९५१ साली हिंदू समाज हा लोकसंख्येच्या ८० टक्के होता तर मुस्लिम समाज हात फक्त १० टक्के होता. आज मुस्लिम समाज ३० टक्क्यांच्या वर गेला आहे अशी माहिती आहे. अजूनही त्यांना या सर्व सवलती आहेतच. त्यामुळेच या समाजाचा झपाटून विस्तार होतो आहे, तर इतर समाज संकुचित होत आहेत.
त्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आधीचा भारतीय जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष यांनी कायम समान नागरी कायदा या देशात लागू व्हावा अशी मागणी केली आहे. हा कायदा जर आला तर सर्वच धर्मीयांना एक पत्नीत्वाचा कायदा लागू होईल. तसेच कुटुंब नियोजनाच्याही परिघात ते येतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण हे आपसूकच होईल आणि इतर बऱ्याच समस्या कमी होतील. गेली दहा वर्षे देशात भाजपचे सत्ता असली तरी राज्यसभेत त्यांना स्पष्ट बहुमत नव्हते परिणामी त्यांनी यादृष्टीने पावले उचलली नव्हती आता राज्यसभेतही बहुमत मिळते आहे त्यामुळे या पाच वर्षात ते हा कायदा करतील अशी संघालाही आशा आहे.
आज देशातील बहुसंख्य प्रगत समाजात एकच मूल असावे हा प्रघात रुढ होतो आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. आज प्रगत समाज सुखवस्तू आणि चंगळवादी बनतो आहे. त्यामुळे इतरही समाजाला आपण तसेच सुखवस्तू जीवन जगावे असे वाटणे सहाजिक आहे. त्या परिस्थितीत प्राप्त उत्पन्नात जास्ती मुले का होऊ द्यायची असा विचार प्रत्येक जोडप्याच्या मनात येतो. त्यामुळे नव्या पिढीतील जोडपी एकच मुलं हवे हा विचार करतात. एकाच मुलाला मग तो मुलगा असो किंवा मुलगी त्यांना व्यवस्थित शिक्षण देऊन आणि सर्व सोयी सुविधा देऊन त्यांचे पालन पोषण करता येईल हा विचार ही जोडपी करतात. त्यामुळे एकाच अपत्यावर ते थांबतात. मात्र त्यामुळे डॉ. भागवत म्हणतात तसा समाज हळूहळू संकुचित होतो आहे हा धोका ते लक्षात येत नाहीत. इथे ते एक बाब विसरतात की “जो चोच देतो तो दाणे देतोच”. मूल जन्माला आले की त्याचे पालन पोषण करण्याची शक्ती आई वडिलांमध्ये येतेच. त्यामुळे त्यांनी एकाच अपत्यावर थांबणे हे कुठेतरी चुकीचेच ठरते.
जुन्या पिढीत प्रत्येक कुटुंबात किमान तीन अपत्ये तरी असायचीच. प्रसंगी चारही असायची. त्यात काही परिवारांमध्ये तर अगदी पाच-सहा आणि काही ठिकाणी तर अगदी डझनभर अपत्ये असायची. त्या सर्वांचे पालन पोषण परिवारातील मायबाप करायचेच. आता मात्र तो प्रकार थांबला आहे. असे असले तरी अगदी एका अपत्यावर थांबणे किंवा आम्हाला मुलाबाळांची जबाबदारीच नको म्हणून मूल होऊच न देणे हे कुठेतरी चुकीचे तर ठरतेच, पण निसर्ग नियमाला बाधकही ठरते.
इथे समाज संकुचित होणे आणि भविष्यात नामशेष होणे ही भीती तर आहेच, पण त्याचबरोबर अशा अपत्यांच्या बाबतीत कौटुंबिक समस्याही निर्माण होतात. जुन्या पिढीमध्ये चार पाच भावंडे गुण्यागोविंदाने नांदायची. त्यात या भावंडांना परस्पर सहकार्याची आणि तडजोडीची सवय लागत असे. आज एकच अपत्य असले तर त्याच्या सर्व मागण्या मायबाप पूर्ण करतात आणि त्याला आयुष्यात तडजोडीची सवयच राहत नाही. अशावेळी भविष्यात पुढच्या आयुष्यात तडजोड करावी लागली तर अशा अपत्यांना फार अडचणीचे जाते. आजच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला तडजोड ही करावी लागतेच. त्यामुळे जर डॉ. भागवतांच्या सूचनेनुसार किमान तीन अपत्य असली तर तडजोडीची सवयही लागते. हा मुद्दा ही कुठेतरी विचारात घ्यायला हवा.
पूर्वीच्या काळात मुलगा हवा म्हणून बरेचदा खूप वेळा अपत्यप्राप्तीची संधी घेतली जायची. आणि अशा जोडप्याला लागोपाठ मुलीच व्हायच्या. मग त्या परिवारात पाच-सहा मुलीच असायच्या. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. मुलगा आणि मुलगी हे सारखेच झालेले आहेत. आज मधल्या पिढ्यांमध्ये काही कुटुंबात तिन्ही मुली किंवा दोन मुली आणि आता तर एकच मुलगी असेही चित्र आहे. असे पालकही आज समाधानात आहेत. हा मुद्दाही विचार करण्याजोगा आहे.
इथे आणखी एक बाब विचारात घेतली पाहिजे. पूर्वी चार पाच भावंडे असली की त्या मुलांना मोठ्या भावाचे लग्न झाले की घरात येणाऱ्या वहिनीशीही जुळवून कसे घेता येईल याचे शिक्षण आपसूकच मिळायचे. मोठ्या बहिणीचे लग्न झाले की येणाऱ्या भाऊजीशी कसे जुळवायचे आणि प्रसंगी त्याची थट्टा मस्करी कशी करायची हेही आपसूकच येत असे. पुढे भावाला किंवा बहिणीला होणारे अपत्य म्हणजे आपला भाचा किंवा पुतण्या त्याचे लालन पालन कसे करायचे हा देखील एक वेगळा आनंद असायचा. त्या पिढ्यांमध्ये पुढल्या पिढीतील मुलांना सखे काका मामा मावशी आत्या हे सर्वच असायचे. मग चुलत भावंडे, मावस भावंडे, मामे भावंडे यांच्याशी जुळवून घेत एक नवा स्नेहबंध जोडला जात असे. आज एकच मूल असले तर त्यांना होणाऱ्या आपत्यांना सख्खे नातेवाईक कोणीही राहणार नाहीत ही एक भविष्यातील समस्या ही लक्षात घेतली पाहिजे. कौटुंबिक नातेसंबंध आणि त्यातिल सौहार्द कसे असते हे पुढच्या पिढ्यांना कदाचित कळणारच नाही, ही भीती देखील लक्षात घेतली पाहिजे.
शेवटी समाज संकुचित होतो आहे आणि भविष्यात तो नामशेष होईल ही डॉ. भागवतांनी व्यक्त केलेली भीती ही तर गांभीर्याने घ्यायलाच हवी. हिंदू समाज हा या देशातील नवे विश्वातील प्राचीन समाज आहे. नंतरचे सर्वच समाज हे हळूहळू पुढे आले आहेत. मात्र हिंदू समाजाला प्राचीन परंपरा आहे. डॉ. भागवत ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत, त्या संघटनेने सुरुवातीपासून हिंदूंचे ऐक्य हे धोरण ठेवूनच वाटचाल केलेली आहे. देशात हिंदू समाज हा विभिन्न जाती-जमातींमध्ये वाटला गेलेला आहे. त्यांना एकत्र आणून संघटित करण्याचे काम आणि हिंदुत्वाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गत ९९ वर्षांपासून करत आला आहे. आज संघाची व्याप्ती फक्त संघ स्थानावर राहिली नसून समाजाच्या सर्व घटकांमध्ये संघ विविध संघटनांच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. त्यामुळे हा समाज मृतप्राय होऊ नये ही चिंता डॉक्टर भागवतांना वाटणे सहाजिक आहे. म्हणूनच त्यांनी प्रत्येक जोडप्याला किमान तीन अपत्य असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आज अनेक जोडपी एका आपत्यावरच थांबत आहेत, तर काही जोडपी एकही अपत्य नको असा विचार करत मार्गक्रमण करीत आहेत. अशांना डॉक्टर भागवतांनी आपल्या भाषणातून कानपीचक्याच दिल्या आहेत असे म्हणता येईल. हिंदू समाजातील सर्व समाजधूरीणांनी या संदर्भात गांभीर्याने विचार करायला हवा इतकेच इथे सुचवावेसे वाटते.
वाचक ्हो पटतय का तुम्हाला हे…..? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो…