नाबाद शंभर….
श्री संदिप खर्डेकर यांचे मनाेगत !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा तेव्हा शब्दशः सर्वांग शहारते….
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरात पोहोचविणाऱ्या बाबासाहेबांना दंडवत करताना आपण भाग्यवान आहोत असे वाटणे स्वाभाविकच – बाबासाहेब = वय अवघे 99 , त्यांच्या उपस्थितीत केलेले कार्यक्रम असोत किंवा मित्रवर्य डॉ. मिलिंद भोई यांच्या समवेत त्यांना प्रतीकच्या लग्नाची पत्रिका द्यायला जाण्याचा प्रसंग….बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत शिवमय… ” तुम्ही येणार म्हणून मी गरमागरम भजी मागवली आहे आणि चहा पण मागवला आहे
” बसा जरा ….असे आपुलकीचे बोल, पाठीवर थाप मारून आशीर्वाद देण्याची स्टाईल, टी व्ही वर तुम्हाला बघत असतो, छान बोलता म्हणत कौतुक करणे आणि मग परमेश्वराचे निरोगी व दीर्घायुष्याचे वरदान लाभलेले हे दैवी पुरुषोत्तम – ज्यांच्या नसानसांत, रक्तात ,हृदयात शिवछत्रपतींच्या शिवाय काहीच नाही ,अश्या थोर बाबासाहेबांची ह्या वयातील तल्लख स्मरणशक्ती,विस्मयचकित करणाऱ्या विविध प्रसंगांच्या लाखो आठवणी हृदयात जपून ठेवलेल्या आणि खणखणीत स्पष्ट वाणीत त्या प्रसंगांचे वर्णन म्हणजे शिवचरित्रच डोळ्यापुढे उभे राहते….
खरोखरच बाबासाहेब तुम्हांला देवानेच घडविले आहे ,आमचे उर्वरित वयोमान ही तुम्हांस लाभो !! शतक तर पूर्ण होतेच आहे पण शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा होणार हे आजच्या तुमच्या उर्जेला बघून वाटतय ….
या वयात ही भजी खात खात स्मरणरंजनात बुडालेले बाबासाहेब जेव्हा प्रत्येक किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचे धारदार शब्दात वर्णन करतात तेव्हा स्फूरण चढतेच…. बाबासाहेब महाराष्ट्र भूषणच नव्हे तर राष्ट्रभूषण आहेत ….अश्या पुण्यभूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना त्रिवार वंदन, मानाचा मुजरा !!