भिवंडी कोळी आगरी महोत्सवाचे जयेंद्रदादा खुणे यांच्या शुभहस्ते उदघाटन
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ठाणे: भिवंडी येथील काल्हेर गावात ६ व्या ” भिवंडी कोळी आगरी महोत्सव २०२४ ” चा यंदाच्या शानदार सोहळ्याचे उदघाटन मोठ्या धुमधडक्यात आगरी समाज नेते श्री. जयेंद्रदादा खुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कोळी मित्र प्रतिष्ठान, काल्हेर कोळीवाडा आयोजित कोळी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य श्री. विनोद गोपाळ मुकादम व काल्हेर ग्राम पंचायत सरपंच सौ. रेखाताई विनोद मुकादम यांच्या संकल्पनेतून व४ या महोत्सवाचे दि. २१ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत स्थळ : माधवराव पाटील / छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, मराठी शाळेजवळ, ग्रामपंचायत काल्हेर, भिवंडी येथे आयोजन करण्यात आले.
उदघाटनापूर्वी कोळी आगरी समाजाची कुलस्वामिनी आई श्री एकविरा देवी पालखीची काल्हेर गाव व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या उत्साहात वाजत – गाजत, बँड पथकासह , आपल्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभागी झालेल्या हजारो समाज बांधव – भगिनी व एकविरा भक्तांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
पालखी महोत्सवाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर मोठ्या उत्साहात व दैदिप्यमान स्वरुपाने आगरी समाज नेते श्री. जयेंद्रदादा खुणे यांच्या शुभहस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले.
महोत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला जयेंद्रदादा खुणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर एकविरा देवीची पालखी महोत्सवात फिरविण्यात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी विधान परिषद सदस्य आमदार श्री. रमेशदादा पाटील यांचा श्री प्रभू रामाची प्रतिकृती असलेले स्मुर्तीचिन्ह व मानाची कोळी टोपी परिधान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच श्री. छत्रपती पाटील, माजी सरपंच श्री. समीर पाटील, उपसरपंच श्री. दयानंद भंडारी, ग्रामपंचायत सदस्य, श्री. भाऊ केणे, श्री. महेश जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विशाल गोपाळ मुकादम, कु. कौशल मुकादम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ज्ञान, मनोरंजन,प्रबोधन ही त्रिसूत्री अंगीकरून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्थानिक कलाकारांचे संस्कृतिक कार्यक्रम, शालेय संस्कृतिक कार्यक्रम, लोकागीते – कोळीगीते व नृत्य, नाट्य, नाटिका, नृत्य स्पर्धा, महिला मंडळ, महिला बचत गटाचे कार्यक्रम, भिवंडी तालुक्यातील सर्व क्रीडा मंडळे व राष्ट्रीय खेळाडूंचा विशेष गुणगौरव सोहळा, समाजातील सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोळी आगरी सन्मानचिन्ह, मनाची कोळी टोपी परिधान करून सत्कार करण्यात येणार आहे.
महोत्सवात प्रवेशद्वारासमोर अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मोठ मोठे पाळणे, खेळाचे विविध प्रकार तसेच मच्छी मटणाच्या खमंगाचे स्टॉल हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.
या महोत्सवात पारंपारिक समाज आगरी समाजाची परंपरा, रूढी, संस्कृतीचे दर्शन पाहावयाला मिळते.
या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले असून घर बसल्याही प्रत्येकाला महोत्सवाचा आनंद
येणार आहे. दररोज महिलांसाठी लक्की ड्रॉ, आकर्षण पैठणी व नथ, शेवटच्या दिवशी फ्री लक्की बम्पर ड्रॉ, खास महिलांसाठी २१ पैठणी साड्या व नथ, तसेच आकर्षण सायकल व स्मार्ट फोन देण्यात येणार आहेत. दर दिवशी अनेक भरीव कार्यक्रम होणार असून अनेक मंत्री, नेते, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कलावंत आवर्जून उपस्थित राहणार असून सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहून भेट द्यावी असे आवाहन महोत्सवाचे संस्थापक – अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य श्री. विनोद गोपाळ मुकादम व काल्हेर सरपंच सौ. रेखाताई विनोद मुकादम यांनी केले आहे.







