आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
,आटपाडी तालुक्यातील स्वतंत्रपूर येथील मुख्य तलावावरील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या दोन दिवसांत घडलेल्या चोरीनंतर आज पुन्हा मोठ्या प्रमाणात केबल चोरीचा प्रकार घडला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण झाले आहे. सदर तलावामध्ये तालुक्यातील सुमारे २०० ते २५० शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यासाठी मोटारी टाकून व्यवस्था केली आहे.
याच पाण्यावर तलाव परिसरातील शेती अवलंबून असून, डाळिंबासह विविध बागायती पिके, तसेच इतर शेती पिकांची जोपासना केली जाते. एवढेच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील या तलावावरूनच केला जातो. त्यामुळे या तलावाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात केबल चोरीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वीच काही शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीला गेल्या होत्या. याबाबत प्राथमिक तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तरीही आज पुन्हा तोच प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आजच्या घटनेत चोरट्यांनी केबल कटरच्या सहाय्याने मोटारींच्या केबल्स कट करून जवळजवळ ५० ते ६० शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. विशेष म्हणजे या केबल्समध्ये तांबे धातू असल्याने त्यांची किंमत जास्त असून, एका केबलची किंमत सुमारे ३० ते ४० हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये काही संशयत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये पुन्हा बाहेरील राज्यातील काही संशयित व्यक्तींविषयी शंका निर्माण झाली आहे.सततच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, “प्रत्येक वेळी एवढे नुकसान सहन करणे शक्य नाही,” . शेती, बागायती आणि उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या या मोटारींच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
या तलावाच्या पाण्यावर आटपाडी शहरासह आटपाडी तालुक्यातील अनेक गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. विशेषतः बागायती पट्टा, डाळिंब उत्पादक क्षेत्र आणि आसपासच्या गावांतील शेती पूर्णतः या जलस्रोतावर आधारित आहे.
सततच्या चोरीच्या घटनांवर प्रशासन आळा घालणार का? चोरट्यांचा बंदोबस्त होणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.फोटो.. आटपाडी तलावातून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या मोटारी






