आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
ज्येष्ठ प्रसिद्धी प्रमुख उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
महाराष्ट्र लोकभवनाने आपल्या दोनशे वर्षांच्या वाटचालीत जी स्थित्यंतरे पाहिली त्यांचा एक मूर्त साक्षीदार म्हणजे लोकभवनातील ‘जल विहार’ सभागृह किंवा बँक्वेट हॉल ! या ठिकाणी सुंदर नक्षीकाम असलेली लाकडी मद्रास जाली अभ्यागतांचे लक्ष वेधून घेते. या सभागृहाच्या बाहेर किमान दीडशे वर्षे वय असलेला गोरखचिंच वृक्ष उभा आहे.
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१८१९ – १८२७) हे गव्हर्नर असताना सुरुवातीला या ठिकाणी पब्लिक ब्रेकफास्ट रूम होती. सन १८६९ – १८७५ मध्ये राजे एडवर्ड सातवे (प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड) यांच्या १८७५ साली होऊ घातलेल्या भारत भेटीच्या वेळी या हॉलचा विस्तार करण्यात येऊन त्या ठिकाणी बॉलरूम देखील जोडण्यात आले.
या सभागृहाला स्टेट बँक्वेट हॉल देखील म्हणतात.
ब्रिटिश काळात लोकभवन हे मुंबई प्रांताचे गव्हर्मेंट हाऊस असताना या सभागृहात राजे पंचम जॉर्ज (१९११), एडवर्ड अल्बर्ट ( भावी राजे एडवर्ड आठवे) (१९२१), यांचे सन्मानार्थ रिसेप्शन झाले होते.
राजभवन झाल्यानंतर याच सभागृहात मार्शल टिटो (१९५४), हो ची मिन्ह (१९५९), पोप पॉल सहावे (१९६४), महाराणी एलिझाबेथ (१९६१), मार्गरेट थैचर, वलादिमीर पुतीन (२०००), लेक वालेसा, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग (१९६९), यांसह अनेक विश्वविख्यात लोकांच्या सन्मानार्थ शाही-भोज झाले आहेत.
दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी याच सभागृहातून ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संयुक्त निवेदन दिले होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये राजभवनाचे लोक भवन झाले. वारसा वास्तु मात्र कायम आहे.







