मोफत रिचार्जच्या फेक मेसेजने त-हाडीसह परिसरातील तरुणाईची उडवली झोप…ऑनलाइन लुटीचा फंडा. ….एका क्लिकवर डाटा हॅकची शक्यता
ऑनलाइन लुटीचा फंडा
एका क्लिकवर डाटा हॅकची शक्यता
त-हाडी : मागील आठवडाभरापासून त-हाडीसह परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुपवर एका कंपनीचा ५५५ रुपयांचा रिचार्ज मोफत मिळणार असून त्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. हा फेक मेसेज असल्याची बाब पुढे आली आहे. या मेसेजबद्दल काहीही माहिती नसलेली तरुणाई मित्रमंडळींशी संपर्क साधून खात्री करून घेण्याचा उपद्व्याप करीत आहेत. मोफत रिचार्जच्या लालसेपोटी तरुणाईची झोप उडाल्याचे चित्र आहे.
सध्या सर्वत्र तरुण पिढीसह शाळकरी मुलांमध्ये मोबाइलचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच मागील आठ दिवसांपासून एका मेसेजने तरुणाईला वेड लावले आहे. हा मेसेज व्हॉट्सॲप ग्रुपवरही फिरत असून त्यात तीन महिन्यांसाठी ५५५ रुपयांचा रिलायन्स जिओ रिचार्ज मोफत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी संबंधित कंपनीच्या अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नाची पार्श्वभूमी, व अध्यक्षांचा वाढदिवस सांगितला जात आहे. मोफत रिचार्ज मिळणार असल्याने तो पदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर लगेच मोफत रिचार्ज मिळणार असल्याचा हा फेक मॅसेज येत आहे. मात्र, या लिंकवर क्लिक केल्यावर तुमचा सर्व डेटा चोरी होण्याची तसेच मोबाईल हॅक होण्याचीच शक्यता अधिक आहे.
कशी आणि काय काळजी घेणार?
जर तुम्हाला कोणताही फेक मेसेज आला असेल तर तो ओळखणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला कोणत्याही मेसेजमध्ये काही मोफत देण्याचे आमिष दाखवले जात असेल तर तो फेक मेसेजच आहे, हे समजून घेतले पाहिजे, अशा मेसेजमध्ये तुम्हाला लिंक दिलेली असते. चुकूनही या लिकवर क्लिक केल्यास तुमच्या खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात, असे मेसेज ओळखण्यासाठी, तुम्हाला मेसेज कसा लिहिला आहे, अर्थात मेसेजच्या भाषेकडे देखील लक्ष द्यावे लागेल. जर मॅसेजच्या भाषेत काही चूक असेल व तुम्हाला त्या मॅसेजकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही, कारण हे संदेश फेक असल्याचे कळून येते. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मॅसेज – मधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
कुणीही या फसवेगिरी करणाऱ्या मॅसेजवर विश्वास ठेवू नका. हा मॅसेज खोटा असून तुमची आर्थिक माहिती मिळवून फसवणूक करण्याची शक्यता असते. अशा मॅसेजला कुणीही भाळून जावू नये.
देविदास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिरपूर