घ्या समजून राजेहो
वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ नेते… आजच्या राजकारणाची गरज
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या “संघाचे मानवी व्यवस्थापन” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आत्ताच नुकताच नागपुरात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक विवेक घळसासी यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. घळसासी असे म्हणाले की पूर्वी राजकीय पक्षांमधील नेते सांस्कृतिक आणि साहित्यिक बाबींचा मागोवा घेणारे असायचे. त्यांचे सर्वांकष वाचन असायचे. त्यामुळे त्यांच्या राजकीय सामाजिक आणि व्यक्तिगत विचारांमध्ये प्रगल्भता होती. आज मात्र ती अभावाने दिसती आहे. आज अभ्यास करून बोलणारे नेते क्वचितच आढळतात. पूर्वी सर्वच पक्षांमध्ये असे अभ्यासू नेते दिसायचे. आज भाजपमध्ये देखील तशा नेत्यांचा अभाव आहे, ही माझी खंत आहे. नितीन गडकरींनी पक्षस्तरावर याचा विचार करावा. पूर्वी जुन्या जनसंघात कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग घेतला जायचा. तसे प्रयोग व्हावे अशी सूचना देखील घळसासींनी यावेळी बोलताना केली.
घळसासींची सूचना कोणत्याही संवेदनशील सुजाण नागरिकाला विचार करायला लावणारीच आहे. एक पत्रकार म्हणून बघताना मला ही बाब आज प्रकर्षाने लक्षात येते की, आज राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये अभ्यास आणि वैचारिक प्रगल्भतेचा अभाव आढळतो. जर आपण इतिहासात डोकावलो तर जुन्या पिढीतील सर्वच राजकीय नेते हे अभ्यासू होते, आणि घळसासींनी नमूद केले तसे व्यापक वाचन करणारे आणि साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत अशा सर्वच सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये रस असणारे होते, हे वास्तव नाकारता येत नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यात अगदी पहिल्या टप्प्यातील नेते लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य नामक ग्रंथ रचला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या काळकोठडीत असताना आपल्याला सुचलेले काव्य तिथे कागद पेन उपलब्ध नव्हता, म्हणून खिळ्याने भिंतीवर कोरले होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, यांनी देखील तुरुंगात असताना आणि तुरुंगाबाहेर असतानाही साहित्यनिर्मिती केली आहे. ही काही मोजकी उदाहरणे सांगितली. इतरही अनेक उदाहरणे सांगता येतील.
नंतरच्या काळात महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, बॅरिस्टर शेषराव वानखेडे, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, या.सु.गवई, बाळासाहेब ठाकरे अशी अनेक नावे सांगता येतील. शंकररावंचा उर्दू साहित्यावरही गाढा अभ्यास होता असे सांगितले जाते. तसाच बाळासाहेब भारदे यांचा संत साहित्यावर गाढा अभ्यास होता. रा.सु.गवईंना विमानतळावर बुक स्टॉलमध्ये आवडीची पुस्तके निवडताना मी स्वतः बघितले आहे. त्यावेळी नवे साहित्य कोणते या विषयावर त्यांची माझी चर्चा देखील झाली आहे. त्याच काळात वसंतराव साठे, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचाही उल्लेख करावाच लागेल. अगदी काल परवाचे उदाहरण सांगायचे झाल्यास शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर अशी उदाहरणे सांगता येतील. आजही नितीन गडकरी, देवेंद्र, फडणवीस, शरद पवार, डॉ .नीलम गोऱ्हे अशी काही नावे आहेत. मात्र ती बोटावर मोजण्याइतकीच आहेत. बाकी सर्वच पक्षात आलेले नेते हे कुठेतरी वैचारिक प्रगल्भता हरवलेलेच असल्याचे दिसून येते.
त्यामुळेच आज संसदेत किंवा विधिमंडळात काय किंवा मग जाहीर सभांमध्ये काय होणाऱ्या भाषणांचा किंवा मग सभागृहात किंवा वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या सवाल-जबाबदांचा वैचारिक दर्जा कुठेतरी घसरलेला दिसून येतो. परिणामी मग पातळी सोडून व्यक्तिगत टीका टिपणी करणे,” एकतर तू राहशील किंवा मग मी राहील” अशी एकेरीवर येऊन टीका करणे, एकमेकांची लाज काढणे, कोणतेही वैचारिक किंवा सांस्कृतिक दाखले न देता रटाळ भाषण करणे असे प्रकार वाढत चाललेले आहेत. परिणामी पूर्वी राजकीय नेत्यांच्या भाषणाला देखील अलोट गर्दी लोटायची. अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषण इतके विनोद प्रचुर आणि विविध दाखल्यांनी परिपूर्ण असायचे, की फक्त त्यांचे समर्थकच नाही तर विरोधक देखील अशी भाषणे ऐकायला गर्दी करायचे. शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देखील विसरता येणार नाही. बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी मुंबईचा शिवाजी पार्क अपुरा पडायचा.
आज मात्र ती परिस्थिती राहिलेली नाही. कोणत्याही राजकीय नेत्याचे भाषण असले की त्या पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रत्येकी किमान ५०० नागरिक आणण्याची जबाबदारी दिली जाते. मग तो कार्यकर्ता असे गावातगावातून श्रोते पकडून बसमध्ये भरून सभेच्या ठिकाणी आणतो. रस्त्यात त्या सर्वांची नाश्ता पाण्याची सोय करतो, अर्थात हा खर्च तो कार्यकर्ता कुठून तरी खंडणी जमवून उभा करत असतो आणि आपल्याला पक्षाने दिलेले टार्गेट पूर्ण केले की उद्या आपणही मोठा नेता होण्यासाठी आता विधानसभेची उमेदवारी मागायची हे स्वप्न तो बघत असतो. काही वेळा व श्रोत्यांना सभेला येण्यासाठी ठरलेली प्रति व्यक्ती बिदागी देखील द्यावी लागते.
हा प्रकार इतर पक्षांमध्ये तर होतोच, मात्र भारतीय जनता पक्षासारख्या “पार्टी विथ ए डिफरन्स” म्हणवल्या जाणाऱ्या पक्षातही होतो, हे खरे दुर्दैव म्हणावे लागेल. हीच खंत विवेक घळसासी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी भाजपचे मूळ स्वरूप असलेल्या जनसंघात कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग व्हायचे. तिथे त्यांना मार्गदर्शन केले जात होते आणि त्यातून वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ कार्यकर्ता आणि पुढे प्रगल्भ नेता घडवण्याची प्रक्रिया सुरू होत होती. आज ती थांबलेली दिसते असे दुःख घळसासींनी व्यक्त केले आहे.
आज भारतीय जनता पक्षात पूर्वीसारखे प्रगल्भ अभ्यासू आणि सर्वांकष विचार करणारे नेते आणि कार्यकर्ते दिसत नाहीत, हे वास्तव निश्चितच नाकारता येत नाही. त्या मागची कारणे शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा असे मला वाटते. जर इतिहास तपासला तर १९५२ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकांनी एकत्र येऊन तत्कालीन जनसंघाची स्थापना केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सुरुवातीपासून कॅडर बेस्ड संघटना राहिलेली आहे. तिथे एक तासभर संघात फक्त खेळ शिकवले जातात असे नाही, तर वैचारिक जडणघडण कशी केली जाईल यावरही चर्चा होत असतात. संघाच्या सायम शाखेत बाल शिशु आणि तरुण स्वयंसेवक येतात. त्यांना काही वेळ खेळल्यानंतर एकत्र बसवून अनेकदा इतिहासातील चांगल्या गोष्टी ऐकवल्या जातात. चांगली पुस्तके कोणती वाचावी याबाबत प्रसंगी मार्गदर्शन केले जाते. चांगली संघगीते देखील शिकवली जातात. संघाचा शाखेचा एक तास वगळता उर्वरित २३ तास सुद्धा त्या स्वयंसेवकाची संघाला अपेक्षित अशी वैचारिक जडणघडण कशी करता येईल, या दृष्टीने प्रयत्न केले जातात. आणि हे काम आजचे नाही तर संघ स्थापनेपासून केले जाते आहे. मला आठवते आजपासून ५५-६० वर्षांपूर्वी सुद्धा संघाचे काही बाल तर काही तरुण स्वयंसेवक एकत्र येऊन आपल्या घरची सगळी अवांतर पुस्तके एकत्रित करायचे आणि त्याचे वाचनालय सुरू करून इतर स्वयंसेवकांनाही वाचायला देत असत. स्वयंसेवकांशिवाय वस्तीतील इतर समवयस्कांनाही पुस्तके वाचण्याच्या निमित्ताने ते जोडून घेत असत. या वाचनातूनच बालवयापासून वैचारिक जडणघडण व्हायला सुरुवात होत असे. आजही तसे प्रकार सुरू असू शकतात.
संघाच्या या प्रयत्नामुळेच संघातून वैचारिक जडणघडण झालेली मंडळीच समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत होत होती. १९५२ साली
अशीच वैचारिक जडणघडण झालेली मंडळी एकत्र आली आणि त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी होते. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयाल उपाध्याय, नानाजी देशमुख, बलराज मधोक असे सर्वच संघाच्या मुशीतून घडवले गेलेले विचारावंत होते. त्यामुळे जनसंघाची जडणघडण देखील त्याच मार्गाने झाली. १९७७ साली जनसंघ हा जनता पक्षात विलीन झाला. मात्र संघ स्वयंसेवकांवर दुहेरी सदस्यत्वाचा आरोप झाल्यामुळे १९८० मध्ये जुन्या जनसंघातील मंडळी बाहेर पडून त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात या पक्षात देखील संघ विचारांचीच मंडळी एकत्र आली होती.
मात्र १९८५ नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी इनकमिंग फ्री करून टाकले. त्यातही समाजातील फक्त कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले असेच नागरिक न घेता इतर पक्षातूनही आयारामांना मोठ्या प्रमाणात पक्षात घेणे सुरू झाले. १९९० नंतर तर अशी संख्या व्यापक होत गेली. आजच वृत्तपत्रात एका काँग्रेस नेत्याची टिपणी वाचली की आजच्या भारतीय जनता पक्षात त्यांचे मूळचे लोक आहेत कोण? सर्व तर इतर पक्षातूनच आलेले आहेत. त्यामुळे आज मुळचा भारतीय जनता पक्ष कुठे राहिला आहे? या नेत्याने पुढे जाऊन अशी देखील टिपणी केली की आपल्या मूळ विचाराच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर सत्ता मिळवण्याची भाजपची औकात तरी आहे काय?
ही टिप्पणी थोडी अतिरंजीत वाटेलही, मात्र त्यातील तथ्य नाकारता येणार नाही. आज भारतीय जनता पक्षात इतर पक्षातून आयात केलेल्या आयाराम मंडळींची इतकी गर्दी झाली आहे, की त्यात मूळचे भाजपाई कोण हे अनेकदा दिवा घेऊनच शोधावे लागते. जेव्हापासून भाजप सत्तेत आला तेव्हापासून ही संख्या खूपच वाढलेली आहे.
त्यातही अनेकदा इतर पक्षातून आलेले कार्यकर्ते काहीतरी मिळवण्यासाठी पक्षात आलेले असतात. ते जोवर मिळते तोवर ते पक्षात राहतात. ज्या दिवशी असे फायदे मिळणे बंद होते ,त्या दिवशी आपल्या पक्ष बदलला वैचारिक मुलामा देऊन अशी मंडळी पक्ष त्याग करतात, आणि दुसऱ्या पक्षात जातात. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. मागे भाजपच्या लोक सभा निवडणुकीतील पीछेहाटीवर भाष्य करताना एका लेखात मी अशांना दुसऱ्या पक्षातून ऑन डेप्यूटेशन आलेले कार्यकर्ते असा त्यांचा उल्लेख केला होता. असे ऑन डेफ्युटेशन आलेले कार्यकर्ते आणि नेते भाजपमध्ये मोठ्या संख्येत आहेत. हे कार्यकर्ते भाजपाचे मूळचे कार्यकर्ते नसल्यामुळे “पार्टी विथ
डिफरन्स” ही भाजपची ओळख कायम ठेवण्याची नैतिक जबाबदारी आपली नाही, अशाच भावनेत ते वावरताना दिसतात.
१९८५-९० नंतर भाजपमध्ये हे इनकमिंग करण्यामागे पक्षाच्या तत्कालीन नेतृत्वाचे काही विशिष्ट हेतू होते. जुना जनसंघ किंवा नंतरचा भाजप यावर शेठजी आणि भटजींचा पक्ष असा शिक्का बसलेला होता. हा शिक्का पुसून काढण्यासाठी आणि पक्षाला नवा बहुजन चेहरा देण्यासाठी त्यांनी हे इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू केले. त्यामुळे पक्षाला हा नवा चेहरा तर मिळाला. मात्र पक्ष नेतृत्वाची अपेक्षित वैचारिक प्रगल्भता कुठेतरी हळूहळू कमी होऊ लागली. भाजपमध्ये बहुजन समाजाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते पूर्वीपासूनही होतेच. त्यात उत्तमराव पाटील, ना स फरांदे, बळवंतराव ढोबळे, अर्जुनराव वानखेडे, अरुण अडसड, मोतीराम लहाने अशी अनेक नावे सांगता येतील. वस्तुतः या जुन्या प्रगल्भ नेत्यांचा उपयोग करून घेत या नव्या कार्यकर्त्यांना तयार करता आले असते. मात्र तसे घडले नाही हे वास्तव दुर्दैवाने मान्य करावेच लागते.
त्यामुळेच मग घळसासींसारख्या संघाच्या मुशीतून तयार झालेल्या पत्रकार आणि विचारवंताला आपली खंत व्यक्त करण्याची इच्छा होते. आज कदाचित विद्यमान भाजप नेते आपल्या राजकीय शैलीत घळसांसींच्या या टिकेचा प्रतिवाद करतीलही. मात्र तो लटका असेल. यातील वास्तव कोणालाच नाकारता येणार नाही.
त्यामुळेच भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षातील नेत्यांना भविष्यात आपल्या पक्षात असे वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ कार्यकर्ते कसे येतील याचे नियोजन करावे लागेल. आज समाजात वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र अडचण येत आहे की असा वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असणारा माणूस राजकारणात येत नाही. तो राजकारणापासून चार हात दूर राहतो. आपण बरे आणि आपले काम बरे असाच विचार करतो. आज तसही राजकारणाचा तर नको तेवढा घसरलेला आहे त्यामुळे सामान्य माणूस कशाला या राजकारणाच्या चिखलात उतरा आणि अंगावर चिखल उडवून घ्या असाच विचार करतो.त्यामुळेच राजकारणात आज प्रगल्भता राहिली नाही हे वास्तव नाकारता येत नाही.
अशा दृष्टीने अशा प्रकारचे वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असणारे साहित्यिक, कलाकार, पत्रकार, वैज्ञानिक, खेळाडू, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते हे राजकारणात यावे आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा प्रशासनाला मिळावा या हेतूने घटनाकारांनी घटनेच्या १७१/३इ आणि १७१/५ या कलमान्वये देशाच्या राज्यसभेत आणि ज्या राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे तिथे विधानपरिषदेत अशा प्रगल्भ व्यक्तींना राष्ट्रपती किंवा राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करावे अशी तरतूद आहे. मात्र आजवरच्या सर्वच सरकारांनी त्याचा राजकीय वापर करत त्यातील मूळ तत्वाला हरताळच फासलेला दिसून येतो. महाराष्ट्रापुरते बोलायचं झाल्यास महाराष्ट्राच्या विधान परिषदेत १९६० ते २०१४ या काळात ११८ राज्यपाल नामनिर्देशित सदस्य नेमले गेले. त्यातील फक्त बारा लोक १७१/५ या कलमात दिलेल्या चौकटीत बसणारे होते.
बाकी सर्व राजकीय सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते ज्यांना विधानसभेत निवडून आणता आले नाही, किंवा उमेदवारी देता आली नाही, त्यांना सामावून घेण्यासाठी घटनेतील ही तरतूद वापरली गेली, हे लक्षात येते. वस्तुतः या तरतुदींचा उपयोग करून समाजातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षण तज्ञ साहित्यिक कलाकार खेळाडू वैज्ञानिक यांना जर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केले असते,
तर त्यांचा फायदा प्रशासनासाठी तर झाला असताच. पण त्याचबरोबर ज्या राजकीय पक्षाने त्यांची नियुक्ती केली त्या राजकीय पक्षात अशा प्रगल्भ कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी देखील झाला असता, त्याचबरोबर राजकारणाचा दर्जा देखील सुधारता आला असता, हा मुद्दा दुर्लक्षित करता येत नाही. मात्र कसेही करून सत्ता मिळवायची आणि ती टिकवायची हे तत्व डोळ्यासमोर ठेवल्यामुळे या वैचारिक प्रगल्भतेचा विसर सर्वच राजकीय पक्षांना पडलेला दिसतो.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेत फक्त भारतीय जनता पक्षाचेच नव्हे, तर इतर सर्व राजकीय पक्षांनी देखील या मुद्द्यावर गंभीरतेने विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आपल्या देशातील राजकारणाचा आज बिघडलेला पोत जर सुधारायचा असेल तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षात असे वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ कार्यकर्ते कसे येतील आणि त्याचबरोबर जे सामान्य कार्यकर्ते येतील त्यांना वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ कसे बनवता येईल, यावर विचार मंथन करायला हवे. तसे झाले तरच भविष्यात पुन्हा एकदा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेले नेते आणि कार्यकर्ते सर्वच पक्षात सक्रिय होतील आणि भारतीय राजकारणाचा घसरलेला दर्जा सुधारायला सुरुवात होईल.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे…?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…..


