• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
June 13, 2025
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती ७……महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

आयुष्यातले सांगाती ७

महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मिराशी..

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

महामहोपाध्याय या पदवीला पोहोचलेला माणूस हा खरोखरीच विद्वान असतो. ही उपाधी प्रदान करताना तावून-सुलाखूनच अशी व्यक्ती निवडली जात असते. अशा विद्वान व्यक्तीला भेटण्याचा आणि आयुष्यातले काही क्षण त्याच्याबरोबर घालवण्याचा योग फार कमी वेळा येतो. असा योग फक्त तुमच्या कुंडलीत ग्रह उच्चीचे असले तरच येत असतो.

माझ्या आयुष्यात माझ्या सुदैवाने असा योग एकाच व्यक्तीच्या बाबत आला. ती व्यक्ती म्हणजे भारतातील विख्यात प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू उपाख्य नानासाहेब मिराशी. त्यांच्या अखेरच्या काही वर्षातच त्यांचा माझा संपर्क आला आणि जवळजवळ पाच वर्ष त्यांचा माझा संपर्क राहिला हे विशेष.

ही १९८० सालच्या जुलै महिन्यातली घटना होती. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. एक दिवस दूरदर्शन कडून तिथे निर्माते असलेले आकाशानंद उपाध्य आबा देशपांडे यांचे पत्र हातात पडले. त्यात त्यांनी कळवले होते की सुमारे दोन महिन्यांपूर्वी आबा नागपुरात दूरदर्शनची पूर्ण टीम घेऊन आले होते. तिथे त्यांनी डॉ. वा. वि. मिराशींवर “प्रतिभा आणि प्रतिमा” साठी एक तासाचा कार्यक्रम शूट केला होता. त्यात बॅकग्राउंडसाठी त्यांना अजून काही मिराशींवरचे चित्रिकरण हवे होते. कोणकोणते शॉट्स किती वेळाचे घ्यायचे याची सविस्तर यादी त्यांनी मला पाठवली होती. हे काम लवकरात लवकर करून पाठवावे असे त्यांनी सुचवले होते.

त्यावेळी डॉ मिराशी नागपुरात कुठे राहतात इथपासून माझी तयारी होती. मग त्यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर मधुकर आष्टीकर यांना फोन केला. त्यांनी मिराशींचा धरमपेठ येथील पत्ता सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मी मिराशींच्या घरी पोहोचलो. बेल वाजवल्यावर दरवाजा उघडला. समोर एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते. मी माझी ओळख केली दिली दिली आणि त्यांना भेटीचे प्रयोजन सांगितले. सोबत आकाशानंदांचे पत्रही दाखवले. त्यांनी आपली ओळख दिली “मी सतीश मिराशी, डॉ मिराशींचा मुलगा, थांबा मी वडिलांना बोलावतो” त्यांनी वडिलांच्या खोलीत जाऊन निरोप दिला. तसे एक पांढरे शुभ्र धोतर नेसलेले उघड्या अंगाचे वयोवृद्ध गृहस्थ माझ्यासमोर येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर सुरकुत्या होत्या. मात्र तिथेही त्यांच्या विद्वत्तेचे तेज ओळखू येत होते. “बोला काय म्हणता?” असे त्यांनी कापऱ्या आवाजात विचारले. मग सतीश मिराशींनीच त्यांना माझी ओळख करून दिली आणि माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच पासून त्यांच्या घरी चित्रीकरण करायचे असे निश्चित केले. डॉ. मिराशींचे घरचे नाव नानासाहेब आहे हे मला त्यावेळेसच कळले.

नानासाहेबांनी महत्त्वपूर्ण संशोधने केली होती. त्यात कवी कालिदासाने ज्या शिळेवर बसून मेघदूत हे काव्य लिहिले, ती शाळा शिळा रामटेकच्या टेकडीवर आहे असाही शोध लावला होता. त्यामुळेच मग त्या टेकडीवर कालिदास स्मारक उभे झाले होते. त्याचबरोबर नगरधन येथे नंदीवर्धन राजाची असलेली राजधानी आणि तिथला महाल याचेही त्यांनी संशोधन केले होते. त्या दिवशी सकाळी मी स्कूटरने जाऊन रामटेक आणि नगरधन परिसरातील चित्रीकरण पूर्ण केले. घरी येऊन भोजन केले आणि अडीच वाजता नानासाहेबांच्या घरी पोहोचलो.

चित्रीकरण करताना आपण ज्या व्यक्तीसंदर्भात हे चित्रीकरण करतो आहोत ती व्यक्ती किती मोठी आहे याचा हळूहळू परिचय मला होऊ लागला. सर्वसाधारण पद्मश्री ही पदवी मिळाली तरी आम्ही गगनाला हात टेकले सर्व असे समजतो. मात्र नानासाहेबांना एकदा पद्मश्री मिळाली होतीच. पण त्याचबरोबर पद्मविभूषण या नागरी सन्मानाने देखील राष्ट्रपतींनी त्यांना सन्मानित केले होते. त्याचे फोटो त्यांच्या बंगल्यात भिंतीवर झळकत होते. त्यांच्या अभ्यासिकेत त्यांनी लिहिलेले मोठमोठे ग्रंथ तसेच ते अभ्यासत असलेले देखील ग्रंथ हे बघूनच मला घाम फुटायला लागला होता. पदवी परीक्षेपर्यंत शंभर दोनशे पानांची चार पुस्तके वाचताना आपल्याला दम लागतो. या माणसाने इतके मोठे ग्रंथ कसे अभ्यासले असतील आणि कसे संशोधन केले असेल हा प्रश्नच पडला. त्यांनी फक्त कालिदास किंवा नंदीवर्धन राजा यांच्याबाबतच संशोधन केले होते असे नाही, तर वाकाटककालीन संस्कृतीचेही संशोधन त्यांनी केले होते. त्यासाठी ते ठीक ठिकाणी फिरले होते. त्या काळातील मोडी भाषेतील दस्तावेज त्यांनी अभ्यासले होते. तसेच उत्खननात सापडलेल्या शिळांवरील शिलालेख देखील त्यांनी वाचून त्याचे अर्थ लावले होते. त्या विषयावर त्यांचे प्रकाशित ग्रंथ देखील होते.

ज्यावेळी मी हे चित्रीकरण करत होतो तेव्हा नानासाहेबांचे वय जवळ जवळ ८७ वर्षांचे होते. एकूणच सर्व शरीराला कंप सुटलेला असल्यामुळे त्यांचा आवाजही कापरा होता. काप-या हातानेच ते लेखन देखील करायचे. त्याचेही मी चित्रीकरण केले होते. त्या दिवशी मी त्यांचे विविध शॉट्स घेतले. ते अभ्यासिकेत अभ्यास आणि लेखन करताना, नातवंडांना घेऊन रामनगर चौकात फिरायला जातांना, तिथे समवयस्क वृद्धांसोबत गप्पा मारताना, घरी जेवताना, रात्री नऊ वाजता रेडिओच्या बातम्या ऐकताना, असे वेगवेगळे छायाचित्रण केले. आकाशानंदांचे पत्र आल्यावर मी त्यांच्याबाबत काही व्यक्तींकडून माहिती घेतली असल्यामुळे हा माणूस किती मोठा आहे याची मला कल्पना आली होती. त्यामुळे चित्रीकरण करताना त्रास होऊ शकतो अशी भीती मनात होती. मात्र या वयोवृद्ध विद्वान व्यक्तीने मला इतके सहकार्य केले की त्यामुळे काम अतिशय सोपे तर झालेच, पण त्याचबरोबर त्यांच्या बाबतचा माझ्या मनात असलेला आदर अधिकच वाढला.

चित्रीकरण पूर्ण करून मी मुंबईला रवाना केले. आठ-दहा दिवसांनीच हा कार्यक्रम मुंबईत प्रक्षेपित झाला. वृद्धत्वामुळे नानासाहेब कार्यक्रम बघायला जाऊ शकणार नव्हते. (त्यावेळी नागपुरात दूरदर्शन केंद्र नव्हते) मात्र सतीश मिराशी आणि त्यांच्या पत्नी स्मिता मिराशी हे दोघेही मुंबईला जाऊन दूरदर्शनचा कार्यक्रम बघून आले होते. ते दोघेही मुंबईहून परत आल्यावर त्यांनी नानासाहेबांना कार्यक्रमाबाबत संपूर्ण अहवाल कथन केले. दुसऱ्याच दिवशी नानासाहेबांकडून एक माणूस एक चिठ्ठी घेऊन धरमपेठेत माझ्या स्टुडिओत आला. नानासाहेबांनी आपल्या हस्ताक्षरात मला कार्यक्रमाबाबत धन्यवाद देणारे पत्र पाठवले होते. आणि एकदा येऊन भेटून जावे अशी विनंती केली होती. त्या मोठ्या व्यक्तीची विनंती ही आज्ञाच समजून मी दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना भेटून आलो. त्यावेळी माझे वय जेमतेम २५ वर्षाचे तर नानासाहेब ८७ वर्षाचे. मात्र नानासाहेब माझ्याशी खूप मोकळे बोलले.

तेव्हापासून मग अधून मधून त्यांचा माझा संपर्क सुरू झाला. त्यावेळी फोटोग्राफी करायची तर प्रिंटिंग साठी मोठ्या बॉक्समध्ये प्रिंटिंग पेपर येत असे. नानासाहेबांना काही महत्त्वाचे दस्तावेज जतन करून ठेवायचे, तर त्यासाठी प्रिंटिंग पेपरचे रिकामे बॉक्सेस उपयोगी पडायचे. तशी गरज पडली की मग नानासाहेब माणसाच्या हातून मला चिठ्ठी पाठवायचे. माझ्याकडे जे काही चार दोन रिकामे बॉक्सेस असतील ते त्यांच्याकडे मी पोहोचवून देत असे.

या चित्रीकरणाच्या निमित्ताने माझा आणि मिराशी परिवाराचा चांगलाच स्नेह जुळला होता. त्यामुळे कधी मध्ये सतीशराव मला भेटायला यायचे तर कधी ते उभयता मला घरी देखील बोलवायचे. तेव्हापासून दरवर्षी नानासाहेबांच्या वाढदिवसाला मला ते निमंत्रित करत असत.

१९८२ मध्ये नागपुरात दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू झाले. त्यानंतर हळूहळू विदर्भाशी संबंधित जुने चित्रीत झालेले कार्यक्रम दूरदर्शनने नागपुरात दाखवायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईवर मुंबईहून रेकॉर्ड झालेल्या कॅसेट्स नागपुरात येत असत. साधारणपणे आठवडाभर कोणते कार्यक्रम दाखवायचे हे नागपूर केंद्रातील अधिकारी ठरवायचे. तिथे माझा नियमित संपर्क असल्यामुळे आज कोणता कार्यक्रम दाखवणार हे मला थोडे आधी कळून जात असे. मला आठवते मे १९८३ मध्ये नानासाहेबांवर चित्रीत झालेल्या प्रतिभा आणि प्रतिमा ची कॅसेट नागपुरात आली. ती दाखवण्याची ठरलेली तारीख मला कळली. मी लगेचच मिराशींकडे जाऊन निरोप दिला. त्या दिवशी ते प्रक्षेपण स्वतः नानासाहेबांनी बघितले. लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांचे मला स्व. हस्ताक्षरात लिहिलेले पत्र माणसाकरितांनी पाठवले.

त्याच दरम्यान नानासाहेबांच्या नातवाची म्हणजेच सतीश मिराशींच्या मुलाची मुलगी मुंज देखील झाली. नानासाहेबांनी आवर्जून मला निमंत्रण पत्रिका आणि सोबत चिठ्ठी देखील पाठवली. त्यांचे आग्रहाचे निमंत्रण असल्यामुळे मी स्वतः त्या समारंभात गेलो. तिथेही नानासाहेबांची भेट झाली. भेटलो की ते आवर्जून चौकशी करायची वयापरत्वे त्यांच्याने जास्त बोलणे होत नसे. तरीही संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. कधीकधी कोणाच्या मदतीने हातात काठी घेऊन ते रस्त्याने हळूहळू चालताना देखील दिसायचे.

याच दरम्यान त्यांना मध्यप्रदेश शासनातर्फे एक सन्मान प्राप्त झाला होता. तो सन्मान स्वीकारण्यासाठी नानासाहेब त्यांचे वृद्धत्व लक्षात घेत स्वतः जाऊ शकणार नव्हते. मग मध्यप्रदेश शासनाचे वरिष्ठ अधिकारी नागपुरात आले आणि त्यांनी मिराशींच्या बंगल्यात आयोजित एका छोटेखानी समारंभात नानासाहेबांना तो सन्मान प्रदान केला. दूरदर्शनसाठी त्याचे चित्रीकरण करण्याकरिता मी उपस्थित होतो. मला आठवते त्या वयातही नानासाहेबांनी अस्खलित संस्कृतमध्ये आपले भाषण केले होते. याच आगेमागे मिराशींच्या घरी नानासाहेबांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला देखील मी उपस्थित राहिलो होतो. तसेच नानासाहेबांना नागपूरच्या धनवटे रंगमंदिरात जिजामाता विद्वत् रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी देखील मी उपस्थित राहिलो होतो. त्यावेळी त्यांच्याचाने बोलणे होत नव्हते. तरीही दोन-तीन मिनिटे ते बोलले होते. नंतरचे त्यांचे लिखित भाषण निवेदकानेच वाचून दाखवले होते.

नंतरच्या काळात नानासाहेब हळूहळू थकत चालले होते. तरीही अधून मधून मी त्यांच्याकडे चक्कर मारत असे. त्यामागे एका मोठ्या विद्वान व्यक्तीला भेटायला मिळते हा माझा स्वार्थ निश्चित होता. माझ्या माहितीनुसार महामहोपाध्याय ही उपाधी मिळवणारे ते बहुदा एकमेव नागपूरकर होते.

माझ्या आठवणीनुसार मी बहुदा जानेवारी १९८५ मध्ये नानासाहेबांना घरी जाऊन शेवटले भेटलो होतो. नंतर कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याकडे जाणे झाले नाही. आणि मार्च महिन्यात अचानक एक दिवस ती बातमीच कळली.

त्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास माझ्या स्टुडिओत एक पत्रकार मित्र आला, आणि तुझ्याजवळ रामटेकच्या कालिदास स्मारकाचा फोटो आहे का म्हणून चौकशी करू लागला. आजच तुला हा फोटो का हवा म्हणून मी चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की उद्या मिराशींची बातमी द्यायची तर हा फोटो तर हवाच. मी त्याला लगेच विचारले मिराशींची काय बातमी द्यायची?. तर तो लगेच उत्तरला, अरे ते आत्ताच दुपारी गेले. हे ऐकताच मला देखील धक्काच बसला. मी लगेच स्कूटर काढली आणि मिराशींच्या बंगल्यावर पोहोचलो. तिथे लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. मी लगेचच त्यांच्या घरात पोहोचलो समोरच सतीशराव होतेच. त्यांच्याशी बोललो आणि आत जाऊन नानासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले. शांत झोपल्यागत नानासाहेब पहुडले होते. त्या स्थितीत देखील त्यांच्या चेहऱ्यावरचे विद्वत्तेचे तेज लपत नव्हते.

दुसऱ्या दिवशी सकाळी नानासाहेबांचा अंत्यसंस्कार नागपूरच्या अंबाझरी दहनुभूमीत आटोपला. त्यावेळी मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. नानासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देऊन बाजूला झाल्यावर उभ्या असलेल्या सतीशरावांजवळ मी गेलो आणि त्यांचा हात हातात घेतला. तेव्हा सतीश राव मला म्हणाले अविनाशराव मला तुमच्याकडचे प्रिंटिंग पेपरचे रिकामे बॉक्सेस देता का? असे आता तुला नाना कधीच सांगणार नाही. त्यांचं हे शब्द ऐकून मी देखील हेलावलो. एका विद्वत् पर्वाची आज अखेर झाली होती.

नानासाहेब मिराशी हे खरोखरीच एक असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांनी केलेल्या संशोधनकार्याची देशभरातच नव्हे तर जगभरात दखल घेतली गेली होती. अखेरच्या क्षणापर्यंत या अभ्यासू व्यक्तीने स्वतःला अभ्यासातच गुंतवून घेतले होते. अशा विद्वान व्यक्तीशी माझा काही काळ का होईना पण संपर्क आला हे मी माझे भाग्यच समजतो. म्हणूनच त्यांच्या आठवणी मी कायम जपून ठेवल्या आहेत.

Views: 76
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
“यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” – समाजाला दिशा देणारे पुस्तक आज खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यात प्रकाशित

“यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” – समाजाला दिशा देणारे पुस्तक आज खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यात प्रकाशित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)