निवृत्त ज्येष्ठ: समाजाची विस्डम बँक,
ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
एकदा अंगावर पंचाहत्तरीची शाल पडली की माणसाने हळूहळू निवृत्त व्हायला हवं असे स्वर्गीय मोरोपंत पिंगळे सांगायचे अशी आठवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वसाधारण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना सांगितली. भागवतांनी हे विधान केल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी त्यांचे हेच वक्तव्य वारंवार दाखवत आता संघ नरेंद्र मोदींना तर निवृत्त व्हायला सांगत नाही ना असे अंदाज लावायला सुरुवात करून खळबळ उडवून दिली आहे.
नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. दीर्घकाळ ते संघाचे प्रचारक देखील राहिलेले आहेत. नरेंद्र मोदी येत्या सप्टेंबर महिन्यात वयाचे ७५ वर्ष पूर्ण करीत आहेत. त्यामुळे संघ आता मोदींना निवृत्त करणार आणि देशात दुसरा पंतप्रधान येणार असे आडाखे या वृत्तवाहिन्यांनी बांधायला सुरुवात केली आहे.
हिंदू संस्कृतीनुसार माणूस वृद्ध झाला आणि त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यातून तो मुक्त झाला की त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असे म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुळातच देशातील हिंदूंचे ऐक्य घडवून आणण्यासाठी कार्यरत राहिला आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीतील तत्त्वावर आधारितच संघाचे काम चालते. साधारणपणे वयाची पंचाहत्तरी येईपर्यंत माणसाच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. त्यामुळे तो वानप्रस्थाश्रमाकडे वळू शकतो हेच तत्व डोळ्यासमोर ठेवत संघाने गेल्या काही वर्षांमध्ये वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या आपल्या प्रचारक आणि अधिकाऱ्यांना कोणतेही दायित्व द्यायचे नाही असे धोरण ठरवले आहे.
त्यामुळेच आता संघातील बरेच वयोवृद्ध प्रचारक निवृत्त झालेले आहेत. त्यात यांची प्रकृती साथ देत नाही ते कोणतेही काम करीत नाहीत. मात्र ज्यांची प्रकृती साथ देते ते आपल्या इच्छेनुसार अजूनही सामाजिक कार्यात सक्रिय दिसतात. स्वतः मोहन भागवत हे देखील यावर्षीच वयाची ७५ वर्ष पूर्ण करीत आहेत. त्यामुळे भागवत देखील यंदा निवृत्ती स्वीकारतील आणि संघातही नवे सरसंघचालक सक्रिय होतील अशाही अटकळी काही माध्यमे बांधतांना दिसत आहेत.
साधारणपणे वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली की माणसाची गात्रे हळूहळू शिथिल होऊ लागलेली असतात. त्यामुळे कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्या तो पेलू शकत नाही. म्हणूनच आपल्याकडे वानप्रस्थाश्रमाची संकल्पना पुढे आली असावी. त्यामुळेच म्हणूनच संघाने हा निर्णय घेतलेला असू शकतो. तसे असले तरीही या ज्येष्ठांचा अनुभव दुर्लक्षिता येत नाही. त्याचा फायदा नव्या पिढीला होत असतोच. त्यामुळेच या जुन्या पिढीला थिंक टॅंक असे म्हटले जाते. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांनी त्यांच्या आनंदवनात ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण नामक प्रकल्प सुरू केला होता. हा एक प्रकारचा वृद्धाश्रमच होता. मात्र इथे समाजातील विविध क्षेत्रातील जाणकार असलेले ज्येष्ठ नागरिक येऊन राहिले होते. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा समाजाला कसा देता येईल हा बाबा आमटेंचा प्रयत्न असायचा. त्यामुळेच बाबा आमटे यांनी या सर्व अनुभवी ज्येष्ठांना समाजाची विसडम बँक असे म्हटले होते.
असे विस्डम बँक असलेले ज्येष्ठ नागरिक आजही समाजात मोठ्या संख्येत आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या असल्याने ते कोणतेही अर्थार्जन करत नसले तरी आपल्या ज्ञानाचा फायदा ते समाजाला देत असतातच. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विचारवंत मा.गो.वैद्य हे वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत नियमित लेखन करीत होतेच ना. त्यांनी जे लेखन केले ते आजही समाजासाठी दिशादर्शक ठरलेले आहे.
त्यामुळेच वयाची पंचाहत्तरी पार करत अंगावर पंचाहत्तरीची शाल पडली म्हणजे पूर्णतः निवृत्त व्हायला हवे असे नाही, तर आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला देता येऊ शकतो. ज्या मोरोपंत पिंगळ्यांवरील पुस्तक प्रकाशन समारंभात मोहन भागवत हे बोलले ते पिंगळे देखील अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला देत होतेच ना. त्यामुळेच भागवतांनी एखादे वक्तव्य केले म्हणून संघ परिवार आता मोदींना निवृत्त व्हायला सांगणार असे कयास वृत्तवाहिन्यांनी बांधणे म्हणजे उगाचच साप समजून भुईला धोपटणे ठरते हे लक्षात घ्यायला हवे. वृत्तवाहिन्या, वृत्त माध्यमे आणि न्यूज पोर्टल याच्या पत्रकारांनी देखील हे भान ठेवायला हवे इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.


