मनपा खड्ड्यामुळे लालू कांबळे यांचा मृत्यू; पालिका व ढम्पर ची हलगर्जी तर पोलिसांची दिरंगाई ठरली जीवघेणी.
(घटनास्थळी उपचाराअभावी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा मृत्यू, वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध.)
मुंबई | 28 जुलै 2025 | प्रतिनिधी
पवई परिसरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते लालू गंगाराम कांबळे (वय 42) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ढम्परच्या धडकेत गंभीर जखमी झाल्यानंतर तब्बल तासभर कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांच्या मृत्यूबाबत संताप व्यक्त होत आहे.
हादरवणारी बाब म्हणजे, घटनेनंतर ना पोलीसांकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला, ना अंबुलन्सने उचल केला. अखेर सुमारे तासानंतर पोलिस व्हॅनने त्यांना हिरानंदानी हॉस्पिटलऐवजी दूरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन?
घायाळ व्यक्तीस नजीकच्या रुग्णालयात दाखल करणे ही सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट सूचना असताना, पोलिसांनी ते न पाळता दूरच्या रुग्णालयात नेल्याने वैद्यकीय मदतीत अक्षम्य विलंब झाला. यावर संविधान प्रचारक व विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“एक कार्यकर्ता फुटपाथवर विव्हळत असतो आणि व्यवस्था शांत असते, हे केवळ दुर्दैव नव्हे, तर अमानवीय अन्याय आहे,” अशी भावना डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.
या घटनेला बृहन्मुंबई महानगरपालिका, रस्त्याच्या देखरेखीचे ठेकेदार, ढम्पर चालक, तसेच विलंब करणारी पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव चंद्रकांत घाडगे यांनी व्यक्त केले.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या समन्वयक बॉबी जाधव यांनी म्हटले की,
“लालू कांबळे यांचा मृत्यू ही एका कार्यकर्त्याची हत्या असून, यासाठी जबाबदार यंत्रणांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”
या पार्श्वभूमीवर लवकरच आंदोलनाची हाक देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष भरत बेडगेकर यांनी सांगितले.
के. ईश्वर फाउंडेशन (NGO) तर्फे लालू कांबळे यांच्या कुटुंबासाठी
50 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी.
कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे.
ढम्पर चालक, संबंधित ठेकेदार तसेच मानपाच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शनिवार दी 26 जुलै 2025 इमेलद्वारे अधिकृतपणे महानगरपालिका, पोलीस आयुक्त व राज्य सरकारला पाठवण्यात आली आहे.
लालू कांबळे यांच्या अचानक झालेल्या निधनाने मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते, दलित संघटना व आंबेडकरी युवा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करत, #JusticeForLaluKamble या हॅशटॅगद्वारे न्यायाची मागणी केली आहे.
वंचित नेते वैजबाथ गायकवाड यांनी प्रशासनाला खुला सवाल केला आहे,
“एक सजीव व्यक्ती मृत्यूमुखी पडतो, तरी दोष कोणाचा? खड्डा, ढम्पर, पोलीस कि अपयशी व्यवस्था?”
“लालू कांबळे हे केवळ व्यक्ती नव्हते, ते चळवळीचे बळ होते. त्यांच्या जाण्याने जो धक्का बसला आहे, तो व्यथित करणारा असून हा एकट्या लालूचा नाही, तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.”
असे मत आंबेडकरी ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.


