*घ्या समजून राजेहो* , *भारत हेच नाव प्रतिष्ठित करण्याचा संकल्प करूया.*, *ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!*
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
भारताला भारतच म्हणा, इंडिया नको, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत यांनी केरळमध्ये “शिक्षणातील भारतीयता” या विषयावर बोलताना केले आहे. आपल्या प्रतिपादनाच्या पुष्ठ्यर्थ बोलताना डॉ. भागवत म्हणाले की जर एखाद्याचे नाव गोपाळ असेल तर इंग्रजीत देखील ते गोपाळच राहील. इंग्रजी भाषेत ते काही बदललेले राहणार नाही. त्याचप्रमाणे भारताचे मूळ नाव भारत आहे मग सर्वत्र ते भारतच रहावे. इंडिया हे इंग्रजांनी दिलेले नाव कशाला, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
भागवतांनी हे प्रतिपादन आज पहिल्यांदाच केले आहे असे नाही. यापूर्वी देखील त्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे. माझ्या आठवणीनुसार २०१६ किंवा १७ मध्ये दिल्लीत प्रबुद्ध नागरिकांची एक बैठक मोहन भागवतांसोबत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संघाला देशाचे संविधान बदलायचे आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मोहनजींनी उत्तर दिले होते की बाकी संविधानाबाबत आमचा काहीही आक्षेप नाही, फक्त संविधानाच्या प्रस्ताविकेत इंडिया दॅट इज भारत असा जो उल्लेख आहे, तो उल्लेख काढून फक्त भारत असाच उल्लेख ठेवावा अशी आमची मागणी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. भारत हेच या भूभागाचे मूळ नाव आहे.
त्यामुळे तेच प्रतिष्ठित राहावे अशी संघाची मागणी असल्याचे ते त्यावेळी म्हणाले होते, असे वृत्त काही वृत्तपत्रांनी दिले होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी गोहत्ती येथे बोलतानाही मोहन भागवतांनी ही मागणी केली होती. त्यांच्या मते हा देश भारत म्हणूनच ओळखला जावा अशी संघाची इच्छा आहे. ही फक्त संघाचीच इच्छा आहे असे नाही तर इतरही अनेक नागरिकांनी या विषयावर वेळोवेळी आपली मते व्यक्त केली आहेत. माजी राज्यपाल राम नाईक लोकसभा सदस्य असताना त्यांनी या विषयावर अशासकीय विधेयक संसदेत दाखल केले होते, आणि त्यावर साधक बाधक चर्चाही झाली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिकाही दाखल झालेल्या आहेत.
आणि माझ्या माहितीनुसार एका याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील असल्यामुळे केंद्राकडेच पाठपुरावा करावा असे सुचवले होते. भारत हा जगातील एक प्राचीन देश म्हणून मानला जातो. वैदिक काळात इथे राजा भरताचे साम्राज्य होते. त्यामुळे या प्रदेशाला भारत असे नाव पडले असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे या भूप्रदेशाला हिंदुस्थान असेही म्हणतात. त्याला कारण हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे म्हणून हा हिंदुस्थान आहे असाही दावा केला जातो. इथे काही पुरोगामी अभ्यासक मात्र वेगळ्या प्रकारचा दावा करतात. भारतात मुसलमानांनी आक्रमण करून इथे राज्य करायला सुरुवात केली. त्यावेळी ते पर्शियन भाषा बोलायचे. त्यांच्या दृष्टीने हा सिंधू नदीचा परिसर म्हणजेच सिंधू नदीचे खोरे म्हणून ओळखला गेला होता. पर्शियन भाषेत स चा उच्चार ह असा होतो.
त्यामुळे त्यांनी सिंध ऐवजी हिंद असा उच्चार करणे सुरू केले आणि मग सिंधू ऐवजी हिंदू आणि मग हिंदू राहतात तो हिंदुस्थान असे नामकरण झाले असा दावा या पुरोगामी अभ्यासकांकडून केला जातो. मात्र प्राचीन इतिहास तपासल्यास इथे प्राचीन काळापासून हिंदूंचीच वसाहत होती, असे पुरावेही सापडल्याचे बोलले जाते. साधारणतः दहाव्या शतकाच्या दरम्यान इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले. सर्वात आधी ते आले ते दक्षिणेत. दक्षिणेत बहुसंख्य लोक काळे असतात. भारतात येण्याआधी इंग्रजांनी आफ्रिकेत आपले साम्राज्य बसवले होते. तिथे आदिवासींची एक रेड इंडियन्स नावाची आदिवासी जमात आहे. भारतात आलेल्या इंग्रजांनाही दक्षिणेतले लोक हे रेड इंडियन सारखेच वाटले. म्हणून त्यांनी इथे इंडियन्स असे म्हणायला सुरुवात केली, आणि त्यामुळे इंडियन्स राहतात तो प्रदेश म्हणून हा देश इंडिया बनला अशी माहिती काही इतिहासकारांकडून दिली जाते.
इथे आणखी एक मतप्रवाह देखील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या एका ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे इंग्रज लोक उद्योगाच्या निमित्ताने सिंधू नदीच्या खोऱ्यात पोहोचले. हा सिंधू नदीचा प्रदेश, त्याला इंग्रजांनी इंडस व्हॅली असे नाव दिले, आणि पुढे त्यांनी या संपूर्ण भूभागाचे नाव इंडिया असे केले. त्यामुळेच इंग्रजांनी आपल्या व्यापाऱ्याचा जम बसवण्यासाठी जी पहिली कंपनी स्थापन केली, तिचे नाव ईस्ट इंडिया कंपनी असे होते. सुरुवातीला भारत हा अतिविशाल देश होता् आजचा सिलोन म्हणजेच श्रीलंका, म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश, बांगलादेश, तिबेट, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे सर्व प्रदेश भारताचेच भूभाग होते. असे म्हणतात की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दिल्लीत बसलेल्या इंग्लंडच्या राणीच्या व्हाईसरॉयच्या ऑफिसमध्ये जो भारताचा नकाशा लावला होता, त्यावर हे सर्व भूभाग अधोरेखित केले होते. मात्र इंग्रजांनीच हळूहळू या देशाचे तुकडे तोडत एकेका भागाला वेगळा देश म्हणून मान्यता देत त्याला आपला अंकित बनवणे सुरू केले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य दिले. तेव्हा देखील भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे तोडून दिले. परिणामी जो शिल्लक राहिला तो आजचा भारत म्हणजेच इंडिया म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची मनोमन इच्छा होती की भारत अखंड व्हावा. ते अखंड हिंदुस्थानचाच ध्यास धरत होते. आज भारत इतक्या तुकड्यांत देश विभागला गेला असताना त्यांना पुन्हा एकत्र आणणे कितपत शक्य होईल हे सांगता येत नाही. मात्र काही वर्षांपूर्वी सरसंघचालक डॉ. भागवत यांनी एका सभेत बोलताना या सर्व देशांना एकत्र आणून ब्रिटन किंवा अमेरिकेच्या धर्तीवर भारतीय समूह तयार केला जावा, या सर्व देशांचे सरकार वेगवेगळ्या असावे मात्र या समूहात कुठेही कोणत्याही नागरिकाला जाण्याची मुभा असावी, तसेच इथे सर्वत्र एकच चलन चालावे आणि सर्व देशांचे मिळून एक सैन्यदल असावे जेणेकरून सीमा प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि सैन्यावरील खर्चही वाटून घेता येईल अशी भागवतांची सूचना होती. अर्थात या सूचनेवरही फक्त विचार पुरेसा नाही, तर व्यापक विचार मंथनच करावे लागेल. ज्यावेळी १९४७ मध्ये देशाचे विभाजन करून इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले, त्याचवेळी भारताचे भारत हे नाव जागतिक स्तरावर प्रतिष्ठित करणे तत्कालीन सरकारला शक्य होते.
मात्र पंडित नेहरूंच्या इंग्रजधार्जिण्या धोरणामुळे देशाच्या घटनेतच “इंडिया दॅट इज भारत” असा शब्द टाकला गेला.(त्या काळात लॉर्ड माऊंटबॅटन या इंग्लंडच्या व्हाईसरॉयचा नेहरूंवर प्रचंड प्रभाव होता) त्यामुळे जागतिक स्तरावर तर इंडिया हे नाव प्रतिष्ठित झालेच. पण भारतातही अनेक ठिकाणी इंडिया हा शब्दच वापरला जातो. डॉ. भागवतांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी गोहत्ती येथे केलेल्या मागणीचा प्रसिद्ध प्रतिसाद म्हणून की काय पण भारतात झालेल्या g20 शिखर परिषदेच्या वेळी अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया हा शब्द हटवून भारत या शब्दाचाच प्रयोग केला होता. इतकेच काय पण परिषदेला आलेल्या प्रतिनिधींसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांनी जे स्नेहभोजन आयोजित केले होते, त्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेत देखील प्रेसिडेंट ऑफ भारत असाच उल्लेख करण्यात आला होता.
असे असले तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी इंडिया हा शब्दच प्रचलित आहे. अनेक शासकीय संस्थानांना देखील त्याच नावाने ओळखले जाते आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास इंडियन रेल्वे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व बँक ऑफ इंडिया, कोल इंडिया, इंडियन ब्युरो ऑफ माईन्स, स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडिया अशी आज देशात किमान हजार तरी संस्थाने असतीलच. या सर्वांचा बदल करून तिथे इंडिया ऐवजी भारत हा शब्द प्रचलित केला गेला पाहिजे. इतकेच काय पण कित्येक ठिकाणी देशाचा उल्लेख देखील रिपब्लिक ऑफ इंडिया असा केला जातो त्या ऐवजी रिपब्लिक ऑफ भारत असे म्हणायला काय हरकत आहे? सुमारे दोन वर्षांपूर्वी हा मुद्दा समोर आला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे यांनी त्याला विरोध केला होता. त्यांचे म्हणणे असे की ही सर्व नावे बदलायची तर शासनाचा बराच मोठा पैसा खर्च होणार आहे. त्यावेळी त्यांनी काही हजार कोटी रुपयांचा खर्च येईल असा मुद्दा मांडला होता. जो काही खर्च करायचा तो एकदाच करावा लागेल. मात्र त्यामुळे इंडिया हे परधार्जिणे नाव पुसले जाऊन भारत हे नाव घेताना प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयाला अभिमान निश्चित वाटेल. त्याचबरोबर डॉ. भागवतांना अभिप्रेत असलेला भारतीय समूह देखील करणे निर्माण करण्यासाठी वातावरण निर्मिती तर सहज शक्य होऊ शकते.
त्यासाठी प्रयत्न आणि आधी विचार मंथन व्हायला हवे. त्यासाठी आवश्यक आहे ती जबर राजकीय. इच्छाशक्ती. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहका-यांमध्ये ती इच्छाशक्ती निश्चित आहे. त्यांनी आज सत्तेत आल्यावर कितीतरी परकीय खुणा पुसण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. आज मोदींनी ठरवले तर ते पाकव्याप्त काश्मीर आणि प्रसंगी चिनी बळकावलेला अक्साई चीनचा भाग देखील ताब्यात घेऊ शकतील. त्याचबरोबर आज पाकिस्तान आणि बांगलादेशची बिघडलेली अर्थव्यवस्था लक्षात घेता विशेषता पाकिस्तान मध्ये त्यांचे चार देशांमध्ये विभाजन व्हावे असाही एक मता प्रवाह पुढे येत आहे. ज्याप्रमाणे इंदिरा गांधींनी पुढाकार घेऊन बांगलादेशची निर्मिती केली त्याप्रमाणे नरेंद्र मोदी पाकिस्तानचे देखील असे विभाजन करू शकतील.
तसे झाले तर हे छोटे देश भारतीय समूहात सहज सहभागी केले जाऊ शकतील. हे लक्षात घेऊन असे परिवर्तन होणे गरजेचे आहे. हे परिवर्तन मोदीच घडवून आणू शकतील. त्यामुळे त्यांनीच हे परिवर्तन घडवून आणावे. तोपर्यंत तरी प्रत्येक भारतीयाने आम्ही इंडिया हे नाव वापरणार नाही, आम्ही भारत हेच नाव प्रतिष्ठित करू हा संकल्प करायला हवा. ती कदाचित भारतीय समूह स्थापित होण्याची सुरुवातही असेल हे निश्चित.


